पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर
मनमंजुषेतून
☆ – ‘स्क्रेपरबोर्ड’ चित्रकार —श्री. शंकरराव फेणाणी – ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆
30 एप्रिल 2024….. भारतातील ‘स्क्रेपरबोर्ड चित्रकला’ या अत्यंत कठीण विषयातील अग्रगण्य मानले जाणारे चित्रकार – श्री. शंकरराव फेणाणी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या कार्याचा रंजक माहितीपट अवश्य पहावा असाच आहे.
जवळपास ५५ वर्षांपूर्वी वृत्तपत्रांमधील फोटो व जाहिराती उत्तमरित्या छापून येण्यासाठी फोटोग्राफीचे तंत्रज्ञान फारसे विकसित न झाल्याने, ‘स्क्रेपर बोर्ड’ ही अत्यंत कठीण, ब्रिटिश शैलीची चित्रकला वापरली जाऊ लागली.
एका पुठ्ठ्यावर प्लास्टर ऑफ पॅरिसचा जाड लेप देऊन, त्यावर काळी पेलिकन शाई ओतून ती वाळल्यावर, एका अत्यंत सूक्ष्म टोकाच्या ‘निब’ने, उभ्या – आडव्या रेषा कमीजास्त वजनाने कोरून, त्या तयार झालेल्या टिंबांच्या सहाय्याने चित्र निर्माण करत असत . शिल्प तयार करताना जसा दगडातील नको तो भाग काढून टाकतात त्याप्रमाणे अत्यंत ‘सूक्ष्मतम’ असे हे काम असे. एखादे टिंब जरी चुकले, तरी संपूर्ण चित्र वाया जाण्याची शक्यता असल्याने, लक्ष पूर्णपणे केंद्रित करून, काटेकोरपणे, अचूक चित्र त्यातून निर्माण करावे लागे. छापताना हे चित्र उलटे छापले जाणार, हे लक्षात ठेवून, बारकाईने लक्ष ठेवून हे अत्यंत कठीण काम तासन् तास म्हणजे सलग जवळपास 18…20 तास करावे लागे. यात माझे बाबा शंकरराव फेणाणी यांचा हातखंडा होता. त्यांचे नेमके काम पहायचे असेल तर … प्रत्येक फोटो मोठा करून पाहिल्यास प्रत्येक बिंदूची कल्पना येईल. आणि ही चित्रे काढणे हे किती अवघड, किचकट आणि वेळखाऊ काम आहे याचीही जराशी कल्पना येईल.
भारतातील अगदी तुरळक आणि उत्तम ‘ स्क्रेपरबोर्ड आर्टिस्ट’ पैकी ते अग्रगण्य मानले जात.
माझे वडील म्हणून तर मला ते सदैव वंदनीय आहेतच. आज एक उत्तम आणि दुर्मिळ कलाकार म्हणूनही त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त माझे त्यांना शतश:प्रणाम.
© सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈