डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आयुष्य – एक नाटक ? .. की एक खेळ ? – भाग-२ ☆ डॉ अभिजीत सोनवणे

वैद्यकीय

  1. रस्त्यावरच भिक्षेकर्‍यांना वैद्यकीय सेवा देऊन त्यांच्या विविध तपासण्या करत आहोत, वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये गंभीर रुग्णांना ऍडमिट करून त्यांच्यावर उपचार करत आहोत. पाय कापणे, छातीतून/ पोटातून पाणी काढणे, डोकं फुटणे, चेहऱ्यावर ब्लेड मारून गाल कापला जाणे, डोळ्यांचे /कानाचे ऑपरेशन करणे… वगैरे वगैरे….आता याविषयी फार चर्चा करत नाही… मी याविषयी एकही फोटो कधीही शेअर केला नाही….कारण ते वाचुन, फोटो पाहून, अनेक जणांना चक्कर येते, मळमळ होते….!

—- असो, तर अशांना बरं झाल्यानंतर आपण छोटा व्यवसाय टाकून देत आहोत; अर्थातच तुमच्या मदतीतून….हा मूळ मुद्दा… !  यातून बरं झाल्यानंतर आपण अशा लोकांना त्यांच्या मूळ गावी परत पाठवतो. जाण्याचा खर्च, तसंच तिथे सुरुवातीला राहण्याचा आणि व्यवसाय सुरू करण्याचा खर्च आपण करता….आपण म्हणजे “आपण”….मी नव्हे….!!! – करता आपणच….मी फक्त “सांगकाम्या”….!!!

एखाद्याकडून घेतलेली गोष्ट, दुसरीकडे पोचवायला काय अक्कल लागते….???

  1. अपंग असणाऱ्या माझ्या एका बंधूला व्हीलचेअर हवी होती….मी मग एक मेसेज टाकला आणि 223 व्हीलचेअरच्या मला ऑफर आल्या….

एक अपंग आजी….जिचे पती अपंग होते आणि नुकतेच ते गेले, त्यांच्या स्मरणार्थ त्या आजीने मला त्या बाबांची व्हील चेअर देऊ केली…

या आजीची भावना समजून घेऊन, त्यांच्याकडून आपण व्हीलचेअर घेतली आणि इतर सर्वांना नम्रपणे सांगितले की पुढे कधी लागली तर तुमच्याकडून घेतो…

काय म्हणू मी समाजाच्या दातृत्वाला ? 

दरवेळी आम्ही समाजाच्या पायावर कपाळ टेकतो….पण तरीही ते कमीच आहे… ! 

शैक्षणिक

भीक मागणाऱ्या पालकांच्या ५२ मुलांचे आपण शैक्षणिक पालकत्व घेतलं आहे.

….मला सांगायला आनंद होतो की आपल्या सर्वांच्या मदतीमधून, ज्या मुलांचे आपण पालकत्व स्वीकारले आहे, अशी सर्व मुलं यावर्षी उत्तम गुणांनी पास झाली आहेत….मुद्दाम मी काही गुणपत्रिका इथे शेअर करत आहे,..! 

माझ्या एका मुलीला नववी मध्ये तर 92% मार्क पडले आहेत….पहिलीपासून दहावीपर्यंतची माझ्या मार्कांची टोटल केली तरी ती 92 भरत नाही….! 

(तुम्ही घरातले म्हणून सांगतोय, बाहेर कोणाला सांगू नका….अर्थात माझ्या पुस्तकात ते सर्व जाहीर झालंच आहे म्हणा….)

असो, मी जे माझ्या आयुष्यावर आणि आलेल्या अनुभवांवर पुस्तक लिहिलं आहे, त्याच्या विक्रीतून या सर्व मुलांचा शैक्षणिक खर्च भागवत आहे….! या सर्व मुलांच्या फीया जमेल तशा भरत आहोत.

आपण अनेक मंडळी भीक मागणाऱ्या मुलांना शैक्षणिक मदत व्हावी, या एकाच हेतूने, माझ्याकडून माझं पुस्तक विकत घेत आहेत; (आवडो न आवडो ) – मी आपल्यासमोर नतमस्तक आहे….! 

भीक मागणाऱ्या व्यक्तींना भीक द्यायची ? की मदत करायची ? भीक आणि मदत यात फरक काय ?  त्यांच्याशी कसं वागायचं ? बिस्किट, पाणी, अन्नदान द्यायचं का नाही ? ते खरंच गरजू आहेत की धंदा म्हणून भीक मागत आहेत… ?  गरजू आणि धंदेवाईक भीक मागणाऱ्या लोकांना आम्ही कसं ओळखायचं ? वगैरे   वगैरे याविषयी मी माझ्या पुस्तकात सविस्तर लिहिलं आहे…..

हा मेसेज सर्वदूर पोहोचावा यासाठी मी ग्रंथालयांना मोफत पुस्तक देत आहे….! 

आपल्या माहिती मधील ग्रंथालयांना जर पुस्तक हवी असतील तर मला कळवावे, मी ती मोफत स्वखर्चाने पाठवायला तयार आहे… ! 

अन्नपूर्णा

रस्त्यावर जगत असलेल्या आई बाबा, भाऊ बहिण यांना किंवा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असणाऱ्या किमान २०० गरजु गोरगरीबांना, दररोज जेवणाचे डबे हातात देत आहोत. (रस्त्यात दिसेल त्याला सरसकट डबे आम्ही वाटत नाही)

दिव्यांग कुटुंबाला आम्ही हे डबे तयार करण्याचे काम दिले आहे..It’s our win-win situationz

इकडे एका कुटुंबाला उत्पन्न मिळाले, जगण्यासाठी सहाय्य मिळाले आणि तिकडे भुकेने तडफडणाऱ्या लोकांना अन्न मिळाले.

मागच्या पंधरा दिवसांपूर्वी एक आजी भेटली….तिने हाताला धरून खाली बसवलं आणि म्हणाली माझ्याबरोबर जेव….छान चपाती होती, त्यावर हिरव्यागार मिरचीचा खर्डा आणि बाजूला लालेलाल लोणचं….सोबत थंडगार पाणी… !  जेवून तृप्त झालो….यानंतर तिने एका पूरचुंडीत बांधलेल्या….तिला कोणीतरी भिकेत दिलेल्या चकल्या मला खायला दिल्या….! 

प्रत्यक्ष अन्नपूर्णा भेटली… मी तिच्यासमोर नतमस्तक झालो… रोज अशा अन्नपूर्णा दरिद्री नारायणाच्या रूपात मला भेटतात… आणि रोज मी तृप्त होतो….

खराटा पलटण

खराटा पलटण म्हणजेच Community Cleanliness Team ! 

अंगात व्यवसाय किंवा नोकरीचे कोणतेही कौशल्य नसणाऱ्या प्रौढ / वृध्द महिलांची एक मोळी बांधून, त्यांच्याकडून पुण्यातील अस्वच्छ भाग स्वच्छ करून घेत आहोत, त्या बदल्यात त्यांना पगार किंवा किराणा माल देत आहोत.

या महिन्यातही खराटा पलटणाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी स्वच्छता केली आहे आणि त्या बदल्यात टीममधील प्रत्येकाला पंधरा दिवस पुरेल इतका कोरडा शिधा दिला आहे.

मनातलं काही – – 

  1. आजचं वर्तमानपत्र उद्या रद्दी असतं….तसंच उमेदीत असलेल्या आई-बापांना वापरून घेतलं, की त्यांची मुलंबाळ, नातवंडे, वृद्धापकाळात अशा लोकांना रद्दी समजतात आणि बाहेर फेकून देतात. माझे मित्र श्री केतन मराठे, यांच्या लहान मुलाने घरोघरी फिरून रद्दी गोळा केली आणि त्याचे 1400 रुपये आले, ते त्याने मला दिले.

… रद्दी झालेल्या लोकांसाठी, रद्दी विकून निधी गोळा करणे हा योगायोग म्हणू ?  की श्री मराठे यांनी त्यांच्या मुलावर केलेला संस्कार म्हणू ?? की इतका लहान मुलगा आता खूप मोठा झाला आहे असं म्हणू… ???

  1. कोणीही प्लास्टिक बॅग वापरू नये, त्याऐवजी कापडी पिशव्या वापराव्या, यासाठी मी आणि माझे भिक्षेकरी लोक आम्ही प्रयत्न करत आहोत.

यासाठी पुणेरी टोमण्यांचे बोर्ड तयार केले आहेत. आम्ही आमच्या भिक्षेकर्‍यांच्या गळ्यात ते अडकवणार आहोत….. प्लास्टिक पिशव्या वापरू नये, कपडे पिशव्या वापरा असा गमतीशीर, पुणेरी सल्ला माझे हे लोक समाजाला देतील.

याच सोबत ज्यांच्या अंगात शिवणकला आहे, अशा सर्व लोकांना नवीन शिलाई मशीन घेऊन दिली आहे. पूर्वी भीक मागणाऱ्या अशा लोकांकडून आपण पिशव्या शिवून घेणार आहोत. जे लोक कापडी पिशव्या शिवतील किंवा विकतील अशा सर्वांना आपण दिलेल्या निधीमधून आपण पगार देणार आहोत.

स्वार्थातून परमार्थ….!!! 

जे लोक पिशव्या शिवतील त्यांना त्या दिवसाचा पगार मिळेल, जे लोक पिशव्या विकतील त्यांनाही त्या दिवसाचा पगार मिळेल आणि त्याहून सर्वात महत्त्वाचं म्हणजे हळूहळू का होईना, परंतु प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी होईल आणि त्या जागी त्यांच्या हातात कापडी पिशव्या असतील…

तथाकथित भिक मागणारे लोक समाजाला प्लास्टिकच्या पिशव्या वापरू नका म्हणतील….कापडी पिशव्यांचा प्रसार करतील….पुढील पिढी वाचवण्याचा प्रयत्न करतील जगातील आपला हा पहिला प्रकल्प असेल… ! 

पुणेरी टोमण्यांचे बोर्ड मी आपल्या माहितीसाठी मुद्दाम पाठवले आहेत.

  1. मागच्या आठवड्यात एक मुलगी भेटली, जवळ येऊन लाजत म्हणाली, सर माझं लग्न ठरलंय….पोरगा तुमच्या वळकीचाच हाय… इतकं म्हणूस्तोवर पोरगा पुढे आला… या दोघांनाही पूर्वी आपण व्यवसाय टाकून दिला होता.

..छुपे रुस्तम म्हणत मी दोघांच्याही गालावर चापटी मारली. तितक्यात मुलगी म्हणाली, ‘सर सोलापूरला आमच्या मूळ गावात लग्न ठीवलंय, इतक्या लांब तुमी येणार नाही माहित आहे, म्हणून आहेर घेऊन आलोय… !’ यानंतर अक्षरशः टॉवेल, टोपी आणि पॅन्ट पीस असा भररस्त्यात मला त्यांनी आहेर केला. अशा आहेराला “भर आहेर” का म्हणत असावेत हे आज मला कळलं.

मला खूप आनंद झाला….तरी मी रागावून त्यांना म्हटलं हा असला फालतू खर्च करायचा कशाला….? 

यावरती रडत पायाशी बिलगत ती म्हणाली, ‘सर तुमाला तर म्हाईत आहे, मला वडील नाहीत, वडिल म्हणून पयला आहेर तुमाला….! 

……यार, पोरी कधी मोठ्या होतात बापाला कळत नाही….कळतच नाही राव….! 

लेख खूपच लांबलाय….! मी तर काय करू ? सासरहून मुलगी जेव्हा माहेरी येते त्यावेळी, आई बापाला काय सांगू आणि काय नको ? असं होतं….आज माझं सुद्धा तसंच झालंय… ! 

तुम्हीच माझे आई आणि बाप आहात….आता तुमच्याजवळ मन नको मोकळं करू….तर आणखी कुणा जवळ करू….? 

प्रणाम  !!!

– समाप्त – 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments