श्री संदीप रामचंद्र सुंकले
☆ सप्रेम नमस्कार… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆
प्रिय विद्यार्थी/पालक बंधू भगिनी,
सप्रेम नमस्कार.
ईश्वर कृपेने आपण सर्वजण कुशल असाल.
मे महिन्याची सुट्टी संपतानाच निकाल लागायला सुरुवात होत असते. पूर्वी फक्त दहावी आणि बारावी यांना महत्व असायचे, आता त्यात निट, गेट अशा अनेक परीक्षांची आणि निकालांची भर पडली आहे.
दहावी/बारावी ही वर्षे सर्व विद्यार्थी आणि पालकांच्या आयुष्यात महत्वाची मानली गेली आहेत, जात आहेत आणि पुढेही जातील. दहावी/बारावीची परीक्षा आणि त्यात मिळणारे गुण ही नक्कीच महत्वाचे आहेत, यात कोणाचे दुमत असण्याची गरज नाही, परंतु ही परीक्षा म्हणजे आयुष्याच्या शेवट आहे, यात कमी गुण मिळाले अथवा एखादा विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला तर त्याचे पुढील भवीतव्य अंधकारमय आहे असे मात्र बिलकुल समजू नये. ‘परीक्षा हा शिक्षणक्रमाचा एक भाग आहे’, इतकेच आपण ध्यानात घ्यावे. विद्यार्थ्याने स्वतःला तपासून घेण्याचा तो एक राजमार्ग आहे. समजा यावेळी कमी गुण मिळाले तर आपले नक्की काय चुकले याचा विचार करून, योग्य व्यक्तीचा सल्ला घेऊन पुन्हा नव्या उमेदीने अभ्यास करावा.
आयुष्याच्या लढाईत शाळेतील गुण फारच कमी वेळा कामास येत असतात. जीवन जगण्याच्या पाठशाळेत शाळेतील गुणापेक्षा मनुष्याच्या अंगातील गुण जास्त उपयोगी पडतात. यातील प्रमुख गुण म्हणजे यश किंवा अपयशाला मनुष्य कसा सामोरा जातो. हा गुण ज्याने आत्मसात केला, तो जीवनाच्या शाळेत नक्कीच यशस्वी होऊ शकेल…
कमी गुण मिळवून पुढील आयुष्यात यशस्वी झालेली अनेक उदाहरणे आपल्याला ठाऊक असतील. पालकांनी इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी की मुले म्हणजे ‘मार्कांची factory’ नाही. आपण दहावी बारावीत किती गुण मिळवले होते, याचाही विचार करावा.
ज्यांनी परीक्षेत उत्तम यश मिळवले त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि ज्यांना तुलनेनं कमी गुण मिळाले किंवा जे अनुत्तीर्ण झाले त्यांना मानसिक आधार देण्यासाठी या पत्राचे प्रयोजन आहे.
आपण वाचावे, तसेच सबंधित व्यक्तींपर्यंत हे पत्र पोचेल असा प्रयत्न करावा ही नम्र विनंती.
आपला,
दास चैतन्य
© श्री संदीप रामचंद्र सुंकले
थळ, अलिबाग.
८३८००१९६७६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈