सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “साठवणीतल्या आठवणी…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

गोष्ट आहे तुमच्या माझ्या आईची…

आमच्या परीक्षा झाल्या की आई वर्षभराच्या साठवणीच्या कामाला  लागायची. प्रथम फळीवरचे मोठे पत्र्याचे  आणि ॲल्युमिनियमचे डबे खाली काढले जायचे. डबे  धुऊन उन्हात वाळवले जायचे.

ऊन कडक आहे… याचा आईला आनंद व्हायचा .त्यात घडी करून ठेवलेले प्लास्टिकचे मोठे कागद असायचे. ते स्वच्छ धुऊन ऊन्हात  वाळवायचे .आदल्या दिवशी गच्ची  झाडून घ्यायची. संध्याकाळी बादलीने पाणी वर न्यायचे आणि गच्ची धुऊन काढायची.

सगळ्यात प्रथम मान सांडग्यांचा असायचा. लाकडी पाट धुवून वाळवून ठेवलेला असायचा. रात्री हरभरा, मूग, उडीद डाळ भिजत घालायची. सकाळी पाट्यावर मिरची आले मीठ घालून जाडसर वाटायची .

पाटावर मध्यभागी सुपारी ठेवली जायची .त्यावर हळदीकुंकू वाहून आई मनोभावे नमस्कार करायची. वर्षभराचे पदार्थ चांगले व्हावेत म्हणून गणपतीची प्रार्थना करायची.

कामाचा” श्री गणेशा” व्हायचा…

त्या सुपारीभोवती गोल गोल सांडगे घालायचे .पाट उचलून वर गच्चीत ठेवायचे काम आमचे असायचे. बाकीच्या पिठाचे सांडगे वर गच्चीत प्लास्टिक वर घातले जायचे. त्यांचा आकार जराही कमी जास्त झालेला आईला चालायचा नाही .एकसारखे सांडगे सुरेख दिसायचे. ते जरासे वाळले की आमची खायला सुरुवात व्हायची.  वरून कडक आणि आतून ओलसर सांडगे खाऊनच निम्मे संपायचे. साठवणीचे करण्यासाठी आई परत एकदा करायची. हे सांडगे तळून भाजलेल्या दाण्याबरोबर खाल्ले जायचे. भाजी नसेल त्या दिवशी  खोबरं,कांदा,लसुण यांच वाटण करून  त्यात सांडगे घालून आई त्याची भाजी करायची .तळून कढीत टाकले की गरम भाताबरोबर खाताना भाताची चव मस्त लागायची.

नंतर पापडाचा नंबर लागायचा. उडीद आणि मूग डाळ गिरणीत समोर उभं राहून आई दळून आणायची. सकाळीच पापडखार, काळीमिरी, घालून उडदाचे पीठ घट्ट भिजवले जायचे .अगदी “दगडासारखे” हा शब्द आईचाच… ते कुटुन द्यायचे काम भावाचे असायचे. वरवंट्याने दणादण तो पीठ कुठून द्यायचा. आई तेलाचा हात लावून बोट्या करून ठेवायची. त्याची चव अप्रतीम लागायची. येता जाता आम्ही ते पापडाचे पीठ आवडीने खात असू. शेजारच्या दोन-तीन काकु त्यांचे जेवण झाले की पोलपाट लाटणे घेऊन यायच्या .गोल बसून घरात गप्पा मारत पापड लाटणे सुरू व्हायचे. लाटलेले पापड हातावर घेऊन आम्ही वर उन्हात नेऊन घालत असु.हे  पापड सारखे हलवायला लागायचे नाही तर कडक  होऊन त्यांचा आकार  बदलायचा. आई खालूनच सांगायची..”पापडाचा द्रोण होऊ देऊ नका रे” वर एकदा येऊन आई नजर टाकून जायची.  रात्री मुगाची खिचडी व्हायची .त्याच्याबरोबर ताजा तळलेला पापड असायचा…

सगळ्यात जास्त व्याप असायचा तो गव्हाच्या कुरडयांचा. त्यासाठी आई तीन दिवस गहू भिजत घालायची. नंतर ते पाटावर  वरवंट्याने वाटायचे .मग  भरपूर पाण्यात कालवायचे. चोथा  व सत्व वेगळे करायचे.  त्याला गव्हाचा  चीक  म्हणायचे.आई लवकर उठून तो चीक  शिजवायची. तो गरम असतानाच कुरडया घालायला लागायच्या.  पात्र भरून  द्यायचं काम बहिणीचे व माझे असायचे. हा.. हा म्हणता.. पांढऱ्याशुभ्र कुरडयांनी प्लास्टिक भरून जायचे. त्यावर्षी काही मंगल कार्य असेल तर रंगीत कुरडया घातल्या जायच्या. सूर्यदेव वर यायच्या आत कुरडया घालून झाल्या पाहिजेत असे आईने ठरवलेले असायचे.

नंतर आई आम्हाला खाण्यासाठी चिक शिजवून द्यायची. त्यात तूप घालून किंवा दूध साखर किंवा हिंग जिऱ्याची कडकडीत फोडणी करून खाल्ला तरी तो छान लागायचा.

सुट्टीच्या दिवशी वडील सकाळीच सायकलवरून मोठ्या मंडईत जायचे.  भरपूर बटाटे आणायचे. बटाटे किसायची मोठ्या भोकाची किसणी वर्षातून एकदाच माळ्यावरून खाली यायची. पहाटे उठून बटाटे उकडायचे ,सोलायचे व थेट प्लास्टिक वर खीसायचे. उन्हाने चार-पाच वाजेपर्यंत  कीस कडकडीत  वाळून जायचा .त्यात  दाणे ,तिखट, मीठ ,साखर घालून  चिवडा केला जायचा. कधी त्यात नाॅयलाॅन साबुदाणा तळून घातला जायचा. गावाला जाताना गाडीत खायला आई हा चिवडा करून घ्यायची.

साबुदाणा दळून आणून त्या पीठात ऊकडलेला बटाटा  घालून  ऊपवासाचे पापड केले जायचे. त्यातही मिरचीचे व  तिखटाचे असे दोन प्रकार होते. बटाट्याचे चिप्स लहानपणी खूप आवडायचे. जाळीचे व प्लेन असे वेफर्स करणारी चपटी किसणी होती .त्या वेफर्सची ट्रायल घेण्यातच बरेचसे बटाटे खर्ची व्हायचे. कितीही प्रयत्न केला तरी तीन-चार फक्त पातळ व्हायचे बाकी जाडच…… तरीसुद्धा ते जाडे जुडे वेफर्स आम्ही आवडीने खात होतो. त्याची दरवर्षी काहीतरी निराळी पद्धत आईला कोणीतरी सांगे. तरी बटाटा पातळ  कापला जायचा नाही. कंटाळून आई विळीवर पातळ काप करून घ्यायची. विकतचे वेफर्स हा फार महाग पदार्थ समजला जायचा त्यामुळे तो आणला जायचा नाही. साबुदाण्याच्या पापड्या घातल्या जायच्या. मध्ये जरा ओलसर असलेल्या त्या ओल्या कच्च्या पापड्या सुद्धा छान लागायच्या. थोडीशी खारट साबुदाण्याची व जिऱ्याची चव यांचा मस्त मेळ जमायचा… या पापडाच्या पिठात शिजवताना बटाटा किसून घालायचा व मिरची वाटून लावायची त्या जरा वेगळ्या पापड्या तळल्यावर सुंदर दिसायच्या.

मसाल्याच्या भरलेल्या मिरच्या, साबुदाणा भरलेल्या उपासाच्या मिरच्या ,कुटाच्या मिरच्या असे मिरच्यांचे प्रकार व्हायचे. दहीभाताला किंवा दही पोह्याला हीच मिरची लागायची.

शेवयांसाठी खास दोन-तीन दिवस राखून ठेवलेले असायचे .त्याचे पीठ जमले….. शेवयांची बारीक तार निघालेली पाहिली की आई खुष व्हायची .हातावर शेवया  करायच्या. लांब करून त्या न तुटतील इतक्या ताणायच्या. लाकडी काठीवर वाळवायच्या. केशर ,बदाम आणि अटीव दुधातल्या त्या खिरीची चव अजून जिभेवर  आहे . त्या शेवयांचे जे तुकडे खाली पडायचे त्याचा कांदा, कोथिंबीर,भाज्या घालून उपमा केला जायचा. तो फारच चवदार लागायचा .तेव्हा नूडल्स हा प्रकार नव्हता . नूडल्स पेक्षा हा प्रकार  टेस्टी असायचा. पण शेवया खूप मेहनत घेऊन केलेल्या असल्यामुळे त्या खिरीसाठीच वापरल्या जायच्या.

ज्या दिवशी जो पदार्थ केला असेल त्या दिवशी रात्रीच्या जेवणात तो पदार्थ असे .वडील ऑफिसमधून आल्यावर आवर्जून चौकशी करायचे.

“वा वा “म्हणायचे. आई खुष होऊन  हसायची. एक एक पदार्थ तयार होऊन डब्यात भरला जायचा त्यावर कोहाळ्याचे सांडगे ,उपवासाच्या पापड्या ,लसणाचे पापड, असे खडू ओला करून लिहिले जायचे. वरची फळी गच्च भरून जायची.

आईला या महिन्यात आराम नसायचाच. कारण हे प्रकार करून संपेपर्यंत वडील मिरच्या, हळकुंड, शिकेकाई आणून द्यायचे. मिरच्यांची डेखे काढायची .मिरच्या, हळकुंड गच्चीत वाळवायचे .वर्षांचे तिखट हळद होऊन जायचे. खूप दिवसापासून लिंबाची साले साठवलेली असायची.” गव्हला कचरा” म्हणजे काय असायचे कोण जाणे? पण  लांब असणाऱ्या आयुर्वेदिक औषधी दुकानातून वडील तो आणून द्यायचे. आवळकाठी, रिठे गच्चीत वाळत घातलेले असायचे .हे सगळे घालून  शिकेकाई दळून आणायची  .रविवारी आई या शिकेकाईचे भरपूर पाणी गरम  करून द्यायची. त्यानी केस धुवायचे असा दंडक होता.

महिन्यातून एकदा आई स्वतः चोळून न्हाहु  घालायची. आईच्या हातात  केस होते तोपर्यंत केस लांब आणि जाड होते .कॉलेजमध्ये गेल्यावर केसांना पहिला साबण लावला तेव्हा आई खूप चिडली होती.

मे महिना संपता संपता आईची लोणच्याची गडबड उडायची. कैरीचे तिखट ,गोड लोणचे. तक्कु ,कीसाचे लोणचे, लवंगी मिरची लोणचे असे विविध प्रकार आई करायची. गुळांबा ,साखरआंबा, मुरांबा हे पदार्थ व्हायचे .झाकणाला पांढरे स्वच्छ कापड लावून आई बरण्या बंद करायची .सेल्फ मधला वरचा कप्पा या बरण्यांचा असायचा. शाळा सुरू झाल्यावर डब्यात पोळी भाजी बरोबर लोणचे, गुळांबा असायचा .

कितीतरी दिवस आईचा हा उद्योग चालायचा .आता विचार केला तर आश्चर्य वाटते… पण तेव्हा ते सर्व लागायचे.  वर्षभर बरोबर पुरायचे.

सध्या सारखी शिबीर ,क्लास असे काही नसायचे  पण आम्हाला सुट्टीचा कधी कंटाळा यायचा नाही.

आईला मदत करताना त्यातून खूप शिकायला मिळायचे .आजकाल  एवढे प्रकार कोणी करत नाही आणि लागतही नाहीत .जे पाहिजे ते तयार मिळते. पाकिटे आणायची खायची… पण ती पूर्वीची मजा त्यात नाही एवढे खरे….

 सुमारे दीड फूट उंचीची चिनीमातीची लोणच्याची बरणी ,पत्र्याचे चौकोनी, गोल डबे बरेच वर्ष माझ्या माहेरी माळ्यावर पडून होते .दरवेळेस माळा साफ करताना त्याची अडचण वाटायला लागली..

 पण  ते  काढून  परत वर ठेवले जायचे. 

एके वर्षी वडिलांनी ती  मोठी बरणी  देऊन टाकली ……किती तरी दिवस आम्ही बहिण भाऊ त्या बरणीसाठी हळहळत होतो………. उगीच टाकली असे अजूनही वाटते.

 ती बरणी नुसती बरणी नव्हती…  ते आमचे लहानपण होते.

 तो जपून ठेवावा असा  ठेवा ….आमच्या आनंदाची.. ती एक साठवण होती.

 ती  बरणी म्हणजे  आमच्या कष्टाळू आईची आठवण होती  ……

आजही साठवण लिहिताना आईच आठवली…

आई गेली आणि सारे संपले…… 

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments