प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

??

होय फुला !! ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

तुझ्या वासाने, आणि तुझ्या रंगकांतीने मी इकडे आलो, ओढावलो गेलो,  तुझ्या त्या मनमोहक रूपानी माझ्या मनास भुरळ घातली .  काय तुझा तो सुवास, तुझा तो रंग आणि परिमळ …. विधात्याने नक्कीच खुबीने तुला निर्माण केले असेल बरं ! तुझ्या ह्या मुलायम अंगकांतीने म्हण की , विलोभनीय रंगाने म्हण, मी पुरता तुझ्या प्रांगणात शिरलो .. . मी आत कसा घुसलो ते कळलंच नाही ..  केवढी ही जादू .. जी तुझ्या फक्त दिसण्यात आहे, रूपात आहे.. . तर मग मी अंतरंगात शिरलो तर काय होईल हे कळणारच नाही !

सुगंधाने एवढं मोहित होता येतं का रे  ? ते भ्रमरांना विचारावे लागेल , त्यांची पण माझ्यासारखीच गत होणार. 

मनुष्य काय किंवा भृंग काय, निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची, आकृष्ट होण्याची ओढ ही जन्मजातच ! बहुतेक आपण आकर्षित व्हावे म्हणूनच विधात्याचा हा खटाटोप नाही का ? भ्रमराने तरी कोणत्या फुलावर यावे, बसावे !  चुंबन घ्यावे !  हे त्याच्या प्राक्तनातच लिहिले असेल का ? कोणत्या फुलावर बसावे, त्याचा  कोणता रंग असावा, ते कोणत्या जातीचे असावे,  सुगन्ध कोणता असावा  ह्याला बन्धन तर नाही ना ! कोणतेही फूल भ्रमरास प्रिय आहे, त्याला कश्याचेच बंधन नाही , जातिपात तो मानत नाही…  क्षुद्र, श्रेष्ठ , उच्च कनिष्ठ, असा भेदभाव तरी त्याच्या मनात येत असेल का ?  मग मी तर साधा मानव प्राणी , सुगंधाने मला भुरळ पडणारच.  मन हे असंच रसायन आहे, असं नाही का वाटतं ?  जिथे निसर्ग आहे तिथे ते ओढ  घेतच. निसर्गसौंदर्याचा आस्वाद घ्यायला वय आड येतं का ? नाही ना ? मग मी तर साधा जीव …. 

कठीण लाकूड  पोखरणारा  भृंग मृदु, नाजूक अश्या कमलदलात .. त्याच्या पाशात अडकून पडतो. कमलदलं केव्हा मिटतात व तो केव्हा मृत होतो, ते त्याला ही कळत नाही …. असा का बरं हा निसर्ग 

नियम ! असे म्हणतात की फुलपाखरांचं मिलन झाल्यावर नर मरून जातो !  मादी तेवढीच जिवंत राहते. .. का ?  तर पुढील पिढी वाढविण्यासाठी. मग नर फुलपाखरांच्या नशिबी मरणच  का? कोणता निसर्ग नियम विधात्याने लावला?  त्यासाठीच का नराचा जन्म आहे , नेहमीच शमा-परवानाचे नियम का बरं असावे, हे माहीत असून देखील  नर हे कसं काय धाडस करतो? तर केवळ आंतरिक ओढ, माया जिव्हाळा,  प्रेम ! 

प्रेम हे असंच असतं का हो ? का मग दरीत उडी टाकायची …. षड्रिपु  हे निसर्गतःच सगळीकडे वास करतात का ?  अगदी फुलांच्या-पानांच्या -वेलीच्या -सौंदर्याच्या -सुगंधाच्या  ठाई !  पण त्यांचे अस्तित्व  आहे का ?  की विधात्याने विश्वमोहिनीचे रूप चराचर निसर्गात भरून ठेवलं आहे ? काळ्या कपारीतून थंडगार गोड पाण्याचा स्रोत, कुंडातून सतत ओसंडून वाहणारे थंड गार जलप्रवाह ! काही ठिकाणी गरम पाण्याचे कुंड. भूगर्भात असणारा तप्त लाव्हारस ….  काय काय बघायचे हे ! आकाश व सागर निळेच का !  सागराचे पाणी खारट का ?  सागराला जर तहान लागली तर त्यानी कुठं जायचं ? सरितेला सागराची ओढ का ?  अश्या अनेक गूढ प्रश्नांनी मन सैरभैर होते.

देवा तू आमच्यासाठी काय काय निर्माण केलेस व हे मोहिनी-तंत्र कशासाठी वापरलेस? वर धर्म अर्थ काम करून मोक्ष मिळवण्यासाठी का भाग पाडलेस ? मोक्ष आहे की नाही मला माहित नाही  पण ….  

पुनरपि जननं पुनरपी मरणं 

पुनरपि जननी जठरे शयनं ।। 

… हाच सिद्धांत मला भावतो कारण तुझं निसर्गरूप मला सतत पहावे वाटते. म्हणूनच ययातीही  पण स्वतःच्या मुलाकडून तरुणपण मिळवण्यासाठी मोहाच्या आहारी गेलाच ना ! 

हे सखी ..  दे दे मला ..  आज सर्व काही हवं आहे, जे जे असेल ते ते दे ! उधळण कर तुझ्या मृदु मुलायम  हाताने तुझ्या नक्षत्रांची, तुझ्या सुगंधाने मी बेधुंद झालो.  तुझ्या दरबारात कसलीच कमतरता नाही ,  तुझी पखरण अशीच चालू ठेव.  मला आज मनमुराद अमृत लुटवायचं आहे, कोठेही कमतरता नको. आस्वाद घेवू दे मला …तुझ्या पवित्र नक्षत्रांचा , मुलायम पाकळ्यांचा वेडापिसा होवून मला भ्रमर होवू दे,  मग मी जन्मभर तुझ्या सानिध्यात मृत झालो तरी चालेल ! कर खुली तुझी कवाडे ! सुगंधाची किंमत एवढी तरी किमान द्यावीच लागेल ना ! जन्मभर तुझ्या महिरपी मेघडंबरित विसावा घेण्याची तयारी आहे माझी . 

मला तुझे एकतर्फी प्रेम नको, बलात्कार पण नको, मला तुझे सौंदर्य विद्रूप पण करावयाचे नाही. 

तुझ्यातील  प्रेमभावनेचं शिंपण कर. तू जशी असशील तशी तू मला प्रिय आहेस, तुझ्या सुगंधानी

माती पण भिजेल. ओला होईल गंधित वारा.  हाच तर खरा निसर्ग नियम आहे .

विचार ..  खुशाल विचार त्या सर्व लतावेलींना , फुलांना, पानांना, त्याच्या सुगंधाना,  त्या पारिजातकाला विचार , आम्रकुसुमांना विचार, गुलाबाला विचार,  गुलबकावलीला विचार ! निसर्गत: जे अव्याहत चालत आले आहे, त्या कालपुरुषाला विचार, त्या चंद्र सूर्य तारे ग्रह यांना विचार ..  निसर्ग नियम ते कधी विसरले आहेत का ?  मग मी तरी का विसरु ! 

असेच विचार त्या ययातीच्या मनात आले असतील का ?  क्षणभंगुर वासनेचा विरक्त सोहळा, हाच मनुष्याला प्रिय आहे का ?  हे निसर्गदेवते हेच तुला पण अपेक्षित आहे का ? ह्यालाच जीवन म्हणतात का ?  

ययाती व्हायचं की संन्यासी, की ऋषी मुनी,  की मानव धर्माचा उद्धार करायचा, हे ज्याचं त्यानेच ठरवायचं. 

होय फुला हेच इंगित आहे का जीवनाचं ? तुझ्या परिमळ एवढी  प्रचंड उलथापालथ करतो, तुझ्या मनमोहक रूपाने तो भ्रमर असो वा फुलपाखरू .. त्या दोघांचंही रुपडं तुला भावतं का रे ?  

… हे ज्या त्या विविधरंगी फुलांनीच ठरवावं . मानवाला ह्या गोष्टीत ढवळाढवळ करण्याचा अधिकार कोणी दिला ?  

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments