सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “गुरू आसपासचे…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मला मंडईत जायला फार आवडते. हिरव्यागार ताज्या भाज्यांचे ढीग बघताना मनाला प्रसन्न वाटते. 

भाजी विकणारे ओळखीचे झाले आहेत. त्यांच्याशी संवाद साधण्याचा आनंदही असतो. बरं हा नुसता आनंद नाही तर त्यांच्याकडून शिकायला पण  मिळते.

 

एक काका फक्त पालेभाज्या विकतात. त्या दिवशी गेले तर काका खुर्चीवर बसले होते. शेजारी एक टेबल मांडले होते आणि त्यावर पालेभाज्या निवडून प्लास्टिकच्या पिशवीत भरून पॅक करून ठेवल्या होत्या .मला सांगायला लागले

 

“मुलांनी  हे सुरू केले आहे .पुढची पिढी आहे ..नवीन काही करायचं म्हणते करू दे. आता आपण जरा मागे राहूया असं ठरवलं आहे बघा..”

 

मुलगा उत्साहात सांगायला लागला “काकू तुम्हाला काही हवं असेल तर मला व्हाट्सअप करा. घरपोच निवडलेली भाजी आम्ही पुरवतो. माझे तीन मित्र मिळून आम्ही हे चालू केलेले आहे.”

 भाजीचं काम मुलाच्या हाती सोपवलं तरी त्याला मदत करत काका बसले होते. त्यांच्या या निर्णयाच मला अप्रूप  वाटलं. त्यांनी मला एक छान धडा दिला.

 

ऊन ,वारा ,पाऊस  झेलत ..एक आजी गेले कित्येक वर्ष विड्याची पानं विकत आहेत.  हळूहळू म्हाताऱ्या होत जाताना मी त्यांना पाहते आहे .मांडी घालून त्या बसलेल्या असतात. टोपलीत पानं सुंदर पद्धतीने मांडून ठेवलेली असतात .देताना हळुवारपणे  हाताळतात. सैलसर बांधून देतात. मुक्तपणे खळखळून नेहमी हसत असतात.

कस जमत आजींना हे…..अस नेहमी माझ्या मनात येत.

 

एक कानडी भाजीवाले आहेत. त्यांना दोन मुली आहेत .आपल्या मुलीच पुढे धंदा चालवणार आहेत हे त्यांनी ओळखले आहे.

त्यांच्या सावळ्या, तरतरीत ,हसतमुख अशा दोन मुली त्यांना मदत करतात. बारा वाजता त्यांची शाळा असते .पण सकाळी दोन तास त्या वडिलांच्या हाताखाली काम करतात. आनंदाने शांतपणे त्या भाजी वजन करून देत असतात .

मला त्या मुलींचे फार कौतुक वाटते. आत्तापासूनच त्या शिकत आहेत पुढे त्या निश्चितच यशस्वी होतील.

 

एक बाई स्वतःच्या शेतातली  भाजी घेऊन बसलेल्या असतात. बाकीच्या भाज्यांची पोती  नवरा होलसेल मध्ये विकतो. तोपर्यंत त्या भाजी विकतात.

भाजी विकून झाली की तिथेच मिळणार शेव, फरसाण ,गाठी ,चुरमुरे, फळं घेऊन ठेवतात.

” पोरा बाळांना आवडतं ना म्हणून घेऊन जायचं .

मला सांगत होत्या.

 

सगळ्यात शेवटी फुलं घ्यायला सरू कडे जाते .ती गेल्या गेल्या”या काकु”म्हणते.

तिथे एक माणूस चहा विकतो. अगदी दोन-तीन घोट मावतील असा त्याचा छोटासा कप आहे. तो चहा ती आग्रहानी पाजते. आज फुलं दिल्यानंतर तिने टपोरा गुलाब त्यात घातला .

“हा तुमच्या बाप्पाला …आणि त्याला सांगा सरूच्या नवऱ्याला जरा अक्कल दे..”

“हो ग केव्हाच सांगितलं आहे”

मग काय म्हणाला तुमचा बाप्पा……..

तो म्हणाला 

सरू   शहाणी ,समंजस सोशीक आहे. संसारासाठी कष्ट करतीय. असं म्हणून तुझं कौतुक करत होता.”

 

” नेहमीसारखं गोड गोड बोलून लावा मला वाटेला “….

असं हसत  ती म्हणाली. मी पण हसून घेतलं …

बाप्पाच्या हातात काही नाही हे तिला पण माहित आहे आणि मला पण…..

 

या सगळ्याजणी पहाटे उठतात.  मार्केट यार्डला जातात. तिथे फुलं,भाज्या घेतात .टेम्पोत बसून इथे येतात. रस्त्यावर बसून विकतात. किती कष्ट करतात. हा विचार केला की मी त्यांच्याकडून शिकते.

मग उगीच छोट्या छोट्या गोष्टींच्या तक्रारी करत नाही .

 

मनात खूप संमिश्र भावनांची मंडई भरलेली असते ….

आजकाल ती फार  जाणवायला लागलेली आहे…

जीवन आनंदाने कसं जगावं हे शिकवणारे  माझे हे गुरु …

आसपास वावरत आहेत….

शिकत राहते त्यांच्याकडून…

श्री दत्तात्रेयांनी चोवीस गुरू केले मग आपण कोण?

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments