सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ “गोष्टी शाळेतल्या प्रवेशाच्या…” ☆ सुश्री शीला पतकी 

जून महिना सुरू झाला की शालेय प्रवेशाची लगबग चालू होते माझ्या सेवा सदन प्रशालेत संस्थेला वसतिगृह असल्याने आसपासच्या ग्रामीण भागातून बऱ्याच ऍडमिशन येत असत अर्थात वस्तीगृहालाही संख्येची मर्यादा होतीच…. 64 सालापासून वसतिगृह चालू आहे त्याला एक चांगली परंपरा आहे नाव आहे मुलींच्या सुरक्षिततेची हमी आहे त्यामुळे पालकांचा ओढा सेवासदन मध्ये प्रवेश घेण्यासाठी नक्कीच असतो त्याप्रमाणे एक पालक त्यांचे वडील आणि मुलगी असे तिघे प्रवेशाला आले वसतीगृहा मध्ये त्यांना सांगण्यात आलं की शाळेत ऍडमिशन असेल तरच आम्ही वस्तीगृहात प्रवेश देऊ त्यामुळे ते शाळेच्या ऑफिसमध्ये गेले इयत्ता सहावी मध्ये ऍडमिशन हवी म्हटल्यानंतर क्लार्कने सांगितले की मधल्या वर्गांमधून ऍडमिशन नसतात आमच्या मूळ पाचवीतून येणाऱ्या मुलींमुळे  संख्या भरलेल्या असल्यामुळे आम्ही तिथे ऍडमिशन देऊ शकत नाही …..ते गृहस्थ थोडे नाराज झाले ते म्हणाले मुख्याध्यापकांना भेटू का..? क्लार्क म्हणाले  भेटा हरकत काहीच नाही पण अवघड आहे. त्यानंतर ते माझी वाट पाहत थांबले मी अकरा वाजता ऑफिसमध्ये आले कारण सुट्टीचे दिवस होते सुट्टीत आकारात एक ऑफिस असे आल्याबरोबर ते आत मध्ये आले म्हणाले माझ्या मुलीला ऍडमिशन हवी आहे आणि इयत्ता सहावी मध्ये असल्यामुळे तुमचे क्लार्क नाही असे म्हणतात आणि वस्तीगृहात प्रवेश शाळेत ऍडमिशन झाल्याशिवाय होत नाही त्यामुळे तिथे ऍडमिशन होत नाहीये मी म्हणलं अगदी बरोबर आहे पाचवी आणि आठवी मध्ये फक्त ऍडमिशन चालू आहेत अन्य वर्ग भरलेले आहेत त्यामुळे मी तुम्हाला ऍडमिशन देऊ शकत नाही ते म्हणाले नाही बाई बघा ना एखादी विद्यार्थिनी करून घ्या असा त्यानी आग्रह धरला मी म्हणाले.. बसायलाच जागा नाहीये वर्गामध्ये पन्नास संख्येचा वर्ग आहे आमची शाळा जुनी आहे तिथे आम्ही 65 विद्यार्थ्यांनी बसवतोय आता यापेक्षा किती जास्त मुली बसवणार…? त्यांच्याबरोबर आलेल्या आजोबांनी मला गळ घातली ताई असं करू नका बघा आम्ही ग्रामीण भागातन आलोय मी म्हणलं आजोबा खरोखर जागा नाही हो ते मला म्हणाले नाही आम्ही शेतकरी माणसं पोरीला शिकवावं म्हणत्यात म्हणून शिकायला आणलं इथं तुमची शाळा चांगली आहे पोरगी हुशार आहे बघा जरा काहीतरी.. मी त्यांच्यापुढे ऍडमिशनचा तक्ता टाकला आणि म्हणाले हे पहा याच्यामध्ये एवढ्या संख्या आहेत मी कुठे बसवणार आता मात्र ते समोरचे पालक थोडे रागावले उठून उभे राहिले ते जरा एका पायाने लंगडत होते ते खुर्चीला घरून बाजूने माझ्या खुर्चीच्या बाजूला येऊन उभा राहिले आणि म्हणाले बाई मी सैनिक आहे पायामध्ये माझ्या गोळी घुसलेली त्यामुळे निवृत्त करण्यात आलेले आहे बॉर्डरवर माझ्या पायात गोळी लागली मी जायबंद झालो आज ही माझ्या पायात गोळी तशीच आहे मला असंख्य वेदना होत आहेत पेन्शन मला मिळते पण आता मी वडिलांबरोबर शेती करतो. मी वडिलांच्या बरोबर जाण्याच्या ऐवजी वडील माझ्याबरोबर येतात हे दुर्दैव आहे आम्ही या देशासाठी सीमेवर गोळ्या झेलतो तुम्ही आमच्या एका मुलीला ऍडमिशन देऊ शकत नाही फक्त 7 डिसेंबर 15 ऑगस्ट 26 जानेवारीला तुम्हाला आमची आठवण येते का?.. मी त्यांचं बोलणं मुकाट्याने ऐकून घेत होते ते व्यथीत होऊन खुर्चीत येऊन बसले मी त्यांना पाण्याचा ग्लास दिला फोन करून ऑफिस मधल्या क्लार्क ला बोलून घेतलेम्हणाले ऍडमिशन फॉर्म घेऊन ये क्लार्क कडून त्या मुलीचा ऍडमिशन फॉर्म भरून घेतला वस्तीगृहाकडे निरोप दिला अमुक अमुक मुलीची ऍडमिशन झालेली आहे तुम्ही तिला वसती गृहा मध्ये प्रवेश द्या… मी त्यांच्यासाठी चहा मागवला आमच्या क्लार्क ला काही कळेना की एवढी गर्दी असूनही बाईंनी ऍडमिशन कशी काय केली मी माझ्या पर्स मघून 125 रुपये काढले आणि क्लार्क बरोबर फॉर्म पाठवून दिला त्याला म्हटलं पावती करून आणून द्या आता ते आजोबा थोडेसे वरमले त्यांनाच वाईट वाटलं ते उठून हात जोडून म्हणाले ताई माझा मुलगा काही बोलला तर ते मनात धरू नका अहो त्याला अजून देशाची खूप सेवा करायची होती पण पायात गोळी गेल्यामुळे तो जखमी म्हणून परत आला आणि मग त्याची अशी चिडचिड होते त्याच्या वतीने मी माफी मागतो मी पटकन त्यांचा हात धरला म्हणला नाही आजोबा त्यांनी आज आमच्या डोळ्यात अंजन घातलाय मी त्यांची ऋणी आहे ते काय चुकीचं बोलले अगदी खरं आहे ते… जीवावर उदार होऊन माणसं तिथे लढताहेत म्हणून आम्ही इथे शांतपणे काम करतोय आणि त्यांचा अगदी खरयं 15 ऑगस्ट 26 जानेवारी 6 डिसेंबर हे साजरे केले की आम्ही आमची जबाबदारी संपली असं समजतो पण देशाप्रती इतकं राबणाऱ्या माणसाला आपण थोडं प्रेमाने विचारलं पाहिजे ना..? त्याची मदत करायला हवी मी हा विचारच केला नाही माझं चुकलं आता यानंतर मी माझ्या प्रत्येक वर्गात सैनिकाच्या मुलीसाठी एक जागा नक्की ठेवेन आणि हा बदल तुमच्यामुळे झाला आहे हे माझ्या कायम लक्षात राहील नंतर त्या सैनिकांना  खूप वाईट वाटलं ते म्हणाले मॅडम माफ करा मी आपल्याला खरं तर हे बोलायला नको होतं पण मी बोललो पण केवळ माझ्या मुलीला तुमच्या चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा हीच भावना होती आपण राग मनात धरू नका.. मी म्हणाले छे छे मी मुळीच रागावले नाही आपण निष्काळजी रहा, मी या मुलीचा इथला स्थानिक पालक असते आपण याची कोणतीही काळजी करू नका त्या तिघांनाही मनःपूर्वक आनंद झाला मुलगी हुशारच होती त्यामुळे काही प्रश्न नव्हता… प्रत्येक जून महिन्यात मला.या प्रसंगाची आठवण येते आणि पायात गोळी असलेला तो सैनिक मला आठवतो ते उठले आणि प्रवेशासाठी संस्थेच्या ऑफिसमध्ये गेले जाताना मी त्यांना ऑफिसच्या दारापर्यंत पोहोचवायला गेले आणि खरोखर मी मनात त्या माणसाला सॅल्यूट ठोकला इतकं तर मला करायलाच पाहिजे होतं ना……..!

त्यानंतर माझे क्लार्क मला म्हणाले बाई सहावी तले प्रवेश संपलेत ना मग तुम्ही कसा दिला मी म्हणलं अनंता नियमापेक्षा जगात खूप गोष्टी मोठ्या असतात आणि नियम आपण बनवलेले असतात ते लक्षात ठेव तोही असं म्हणाला बाई तुम्ही ही ग्रेट आहात मी म्हणाले नाही आता लक्षात ठेव यापुढे प्रत्येक वर्गात एक जागा सैनिकांच्या मुलीसाठी ठेवायची आणि त्याने हसून मान हलवली

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments