सुश्री सुनिता गद्रे

? मनमंजुषेतून ?

 ☆ शिवणाचा डबा… लेखिका : नीलिमा लेले ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता गद्रे

परवा मी काहीतरी उसवलेलं शिवत होते.

सुईदोरा पाहिला आणि नात(वय वर्षे ८ ) म्हणाली ,”आजी काय करतेस ?”

मी म्हटलं, “अगं आजोबांच्या पॅंटचा काठ उसवलाय  तो शिवतेय.”

मग तिचे प्रश्न काय संपतायत ?

उसवलं म्हणजे काय ? काठ म्हणजे काय ?

मग सगळं शिस्तवार समजावून सांगणं आलं. पण त्याचा एक फायदा झाला. 

ती म्हणाली,” मला शिकव ना.”आणि लगेच एक कापडाचा तुकडा घेऊन आली . 

चला हे ही नसे थोडके म्हणून मी पण लगेच सुई ओवण्यापासून सगळं शिकवलं आणि माझं गुणी बाळ पण लक्ष देऊन पहात होतं.

मग तिला हेम म्हणजे काय? धावदोरा म्हणजे काय? उत्साहाने सगळं सांगितलं आणि खरंच तिने सांगितल्याप्रमाणे इतका छान प्रयत्न केला ना .. हेम,  धावदोरा घालायचा… मला तर भरुनच आलं. 

शाळेला सुट्टी त्याचा एवढा फायदा झाला याचाच मला आनंद . आता त्याचा प्रत्यक्ष उपयोग कधी होईल देवास ठाऊक .कारण हल्ली ब्रॅंडेड कपडे उसवतही नाहीत आणि फाटतही नाहीत.  वाढत्या वयामुळे लवकर लहान मात्र होतात . 

पण आपल्या लहानपणी शिवणकाम शिकताना जगण्याचे संस्कार होत होते , मुलामुलींच्या मनावर. 

कारण शाळेत ५वी ते ७ वी शाळेत शिवण विषय असायचा. धावदोरा, हेम घालणं, काजं करणं, बटण लावणं (तेव्हा हूक नव्हते.) या प्राथमिक गोष्टी शाळेतच शिकायला मिळाल्या . आणि वार्षिक परिक्षेत त्याचे % टक्क्यांमध्ये भरघोस मार्क वाढायचे हा आनंद जास्त!

फार पूर्वी तर घरी हातानेच कपडे शिवायची पद्धत होती . मला आठवतय माझी आजी पांढरी चोळी (त्यावेळेस बायका पोलके किंवा ब्लाऊज म्हणत नसत. )घालायची आणि ती स्वत : शिवायची हाताने! आणि ती चोळी ८ तुकड्यांची असायची. वितीने माप घेऊन कसं तिला बरोबर साधायचं…. आता खरच कमाल वाटते . .. पण अडून राहणच नाही हा मला वाटतं पहिला संस्कार असावा बाईवर .कुंची, लंगोट, दुपटी, झबली (आता ही नावंसुद्धा वापरातून बाद होतील बहुतेक. ) घरीच शिवायची . आजीमुळे हे शिकायला मिळालं . 

शिवणाच्या डब्यात बारिक जाड सुया, खाकी पॅंटची आणि इतर मोठी बटणं, प्रेस बटणं, रिळं याचा संग्रह असायचा .माझ्या डब्यात आता गरजेप्रमाणे इलॅस्टिक, वेलक्रो अश्या गोष्टीही सामावल्यात .  

अजूनही या सुई दो-याने शिवण्याचा, सिनेमात फक्त हिरो हिरॉईनचा रोमान्स दाखवताना, हिरोच्या जवळ उभं राहून त्याच्या  अंगातल्याच शर्टाला बटण लावायचा सीन हमखास दाखवला जातो . जो प्रत्यक्षात कधी नसतोच . नवरा एकतर पटकन शर्ट काढून देईल किंवा दुसरा शर्ट घालेल. 

आताच्या मुली असा डबा ठेवत असतील का ?आणि किती जणींना याचं ज्ञान असेल ? अपवाद असतीलच . 

त्यामुळे या ज्ञानातून जे आज्यांकडून (मौलिक ?)विचार ऐकायला मिळायचे ते संपलेच … 

१. अगं एक टाका वेळेवर घातला तर पुढचे १० टाके घालायचे वाचतात . 

२. अगं थोडी चूण घालावी गं कपड्यासारखी मनाला . 

३ अगं कपड्यासारखी अलगदपणे माणसं जोडता आली पाहिजेत गं बाळा.

४ .धागा उसवला म्हणून कुणी कपडा टाकून देतं का ? तसंच नात्याचं आहे बयो, टाका घालून जोडता आलं    पाहिजे गं .

५ .बाईच्या जातीला शिवण टिपण आलं पाहिजे गं बाई, तिलाच तर सारं जोडायचं आणि बांधून ठेवायचं  असतं संसारात . 

.. .. असे संवाद संपलेच की आता . दुपारच्या वेळी माजघरात शिवण टिपण करत बायका एकमेकींशी सुखदुखाच्या गोष्टी  बोलतायत, हे दृश्य फक्त सिनेमात किंवा  फोटोत दिसेल आता. आता वेळ कुणाला आहे जोडाजोडी करायला ? आणि लागतंच नाही असं काही करायला . सगळं रेडीमेड मिळतच की, 

.. .. आणि माणसांचं म्हणाल तर ते फारसं  महत्वाचं नाही. कुणी आलं बरोबर तर ठीक आहे ..   त्याच्यासह,…  नाहीतर ठीक आहे , त्याच्याशिवाय . फक्त धावायचं असतं प्रत्येकाला . 

पण अजूनही निरागस मनाची नातवंडं आजूबाजूला असतील  ना तर नक्की आजीने टाके घालून जोडायचं कौशल्य शिकवत राहावं. कुणी सांगावं काळ फिरुन येईल  आणि काळाची गरज म्हणून  ( कपडे आणि नाती जोडायला )  परत या गोष्टी करायला शिकवेल. तेव्हा आपली आठवण निघेल.

— तोपर्यंत आपण आपला शिवणाचा डबा त्यातील सर्व सामानासकट जपून ठेवू या. आपण एवढं तर करूच शकतो . 

लेखिका :   सौ . नीलिमा लेले

संग्राहिका – सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments