श्री प्रदीप केळुस्कर

??

☆ जांभळीचे झाड – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(घराच्या मागच्या बाजूला तयार केलेल्या खड्यात जांभळीचे झाड उभे केले आणि त्यात माती भरली, शेणखत भरले वर पाणी ओतले.) – इथून पुढे — 

आता ते रस्त्यावरचे माझे लाडके जांभळीचे झाड माझ्या घराच्या आवरात उभे होते. माझ्या बायकोला हें काही पसंत नव्हते.ती झाड उभ करताना तिकडे फिरकली ही नव्हती.

आता झाड जगवणे हें महत्वाचे होते, आमच्या घरी कामाला येणारी शांता कडे मी या झाडाला रोज पाणी घालायची जबाबदारी सोपवली.

दुसऱ्या दिवशी मी पाहिले झाडाची पाने हिरवीगार होती, सायंकाळी घरी आल्यावर पाहिले, शांता ने पाणी घातले होते पण झाडें मलुल दिसत होती. मी रात्री उठून झाडाकडे गेलो, पाने आणि देठ पिवळे होतं होते. सकाळी पाहिले काही पाने गळून पडली होती, बरीच पाने पिवळी झाली होती. मी कॉलेजच्या वर्देसरांना फोन लावला, त्याचे म्हणणे, जुनी पाने गळून पडत असावीत, त्याची काळजी करू नका, नवीन कोंब येतात का पहा.

मी सकाळ दुपारी सायंकाळी मध्यरात्री झाडाकडे पहात होतो. पाणी शेणखत घालत होतो, पण काहीच प्रगती नव्हती.

मी निराश झालो. बायको म्हणत होते ते खरेच उगाचच रस्त्यावरचे झाड घरी आणले होते. मग आजूबाजूच्या लोकांचे सल्ले ऐकले, कोणी म्हणाले “असे झाड पावसाळ्यात लावायला हवे होते, या दिवसात जगणे कठीण,’.दुसऱ्याचे म्हणणे “रोज पाणी घालू नका, त्यामुळे मुळे कुजतात ‘.

एकांदरीत सर्व मला हसत होते, चेष्ठा करत होते.

मी दुःखी होतं होतो. एवढ्या अपेक्षेने आणि कोर्टात जाऊन या जांभळीच्या झाडाला मी घरी घेऊन आलो होतो, त्या करिता किती पैसे गेले होते? माझी किती मेहनत? आणि सर्वांनी माझी चेष्ठा करावी? बायकोने जाता येता टोमणे मारावे?

आज सहा दिवस झाले, जांभळीच्या झाडावरील सर्व पाने झडून गेली होती. त्यावर कोठेही नवीन कोंब येत नव्हते. माझा पराभव झाला होता, आता बायको काय बोलेल ते ऐकून घ्यावे लागणार होते. आजूबाजूची लोक, शेजारी यांना फुकटची करमणूक झाली होती.

माझे कशातच लक्ष नव्हते. अजूनही शांता पाणी घालतंच होती.

एका मलुल संध्याकाळी मी पुन्हा एकदा वर्दे सरांकडे गेलो. सरांकडे माझा पराभव मान्य केला. सरांनी शिवाजी विदयापीठतील biology चे प्रमुख डॉ सामंत यांचा नंबर दिला आणि त्यांचेशी बोलायला सांगितले.    

मी रात्री डॉ सामंत यांना फोन लाऊन सर्व हकीगत सांगितली. सामंत यांनी सर्व व्यवस्थित ऐकून घेतले, मग ते बोलू लागले 

डॉ सामंत -वकीलसाहेब, तुमच म्हणणं मी ऐकलं, तुम्ही रस्त्याच्या कडेला असलेले जांभळीचे झाड उपटून काढलंत आणि तुमच्या घराच्या आवारात लावलत.

पण तुम्ही विचार केला काय त्या झाडाला किती वेदना झाल्या असतील? तुम्हाला जर तुमच्या घरातून ओढून बाहेर काढलं आणि दुसऱ्या घरात नेलं, तर तुम्हाला राग नाही का येणार?

मी -येणार सर, निश्चित येणार, पण मी माणूस आहे आणि ते तर झाड..

डॉ सामंत -इथेच आपली गफलत होते. तुम्हाला काय वाटते, झाडाला संवेदना नाहीत? राग नाही? दुःख नाही? आनंद नाही? झाडांना सहवास, प्रेम नको असत?

मी -सर, मला काहीच माहित नाही याबद्दल..

डॉ सामंत -तुम्ही कोकणात राहता, तुमच्या घरा शेजारी एक नारळीच झाड बागेतील झाडापेक्षा पाचपट उत्पन्न देत, बरोबर..

मी विचार केला, डॉ बरोबर आहे. आमच्या घरच्या बाथरूम चे पाणी घरा शेजारील माडा ला जाते त्याला बागेतील झाडापेक्षा कितीतरी जास्त नारळ धरतात.

मी -हो डॉ साहेब, बरोबर.

डॉ सामंत -याचे कारण घराशेजारील झाडाला तुमच्या घरचंचा सहवास मिळतो.

भारतीय शस्त्रज्ञ् डॉ जगदीश्चंद्र बोस यांनी प्रयोगाद्वारे सिद्ध केले आहे, वनस्पतीना सुद्धा राग, दुःख, वेदना, आनंद असतो. त्याना सहवास हवा असतो.

मी -मग डॉ माझे काही चुकलं का?

डॉ सामंत -खूपच चुकलं. रस्त्यावर एवढी वर्षे वाढलेलंय झाडाला उपटून काढतांना तुम्ही त्या झाडाची परवानगी घेतली होती का?

मी -नाही.. नाही.. मला याची काही कल्पना नव्हती.

डॉ सामंत,-ते झाड दुःखी झालाय. तुम्ही त्या झाडाची क्षमा मांगा. त्याला जाता येता गोंजारा. त्याच्या बुंध्यवर डोकं टेकवा, सतत त्याच्या सानिध्यात राहा आणि एक महिन्या नंतर मला फोन करा.

डॉ नी फोन ठेवला.

मी हडबडलो. मला वनस्पतीच्या  सवेंदना, भावना या विषयी काही कल्पनाच नव्हती, शाळेत असताना जगदीशचंद्र बोस यांच विषयी धडा होता पण तो पाच मार्कचा एव्हडाच इंटरेस्ट.

मी घरामागे आलो, चांदण्यात जांभळीचे झाड निश्चिल उभे होते. त्याचावर नाही फादी नाही पान. मी त्याच्या बुंध्यावर डोकं टेकले आणि रडू लागलो “क्षमा कर मला, क्षमा कर, तुला न विचारता तुला उपटून काढलं मी. दुष्ठ माणूस आहे मी. माझ चुकलं… कितीतरी वेळ मी रडत होतो.

दुसऱ्या दिवशी उठल्या उठल्या मी झाडाकडे गेलो, आज मी स्वतः विहिरीतील पाणी काढून मुळाभोवती शिंपले. अर्धातास मी झाडासोबत होतो.मग मी कोर्टात गेलो, रोजची कामे करताना सुद्धा माझ्या डोळ्यसमोर ते जांभळीचे झाड होते. रात्री घरी आलो, हातपाय धुतले आणि झाडाकडे गेलो. परत परत त्याची क्षमा मागितली. झाडाला गोंजारले, त्याचाशी गप्पा मारल्या.

माझ्या बायकोने माझ्याशी बोलणे सोडल होते. माझे जे काय चाळे चालले होते, त्याची मनातल्या मनात ती चेष्ठा करत असणार.

शांता मात्र माझ्या सूचनेनुसार रोज झाडाकडे जात होती, परत एकदा पाणी घालत होती.

दहा दिवस झाले असतील, मी सकाळी उठून झाडाला पाणी देत होतो, एव्हड्यात शांता आली आल्या आल्या ती झाडाकडे आली, आणि मोठ्याने ओरडली “भाऊंनू, ह्या बघा, झाडाक कोंब येता.. हेकाच पुढे फादी येतली आणि पाना पण येतली ‘.

मी धावलो, खरंच झाडाला दोन कोंब फुटत होते.

मी झाडाच्या बुंध्यवर डोकं टेकले आणि रडू लागलो. शांता चे ओरडणे ऐकून बायको बाहेर आली, तिने पण ते दोन कोंब पाहिले आणि ती प्रथमच हसली.

माझे रोज सकाळी उठून झाडाला गोंजारणे, झाडाशी गप्पा मारणे पाणी घालणे सुरूच होते.

ते दोन कोंब हळूहळू मोठे होतं गेले. आणखी कोंब आले, आणखी कोंब आले… लालचुतुक पाने आली..

पाने जून झाली.. फाद्या मोठया झाल्या.. संपूर्ण जांभळाचे झाड पानांनी भरून गेले.

— समाप्त — 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments