सौ.ज्योत्स्ना तानवडे

 ☆ मनमंजुषेतून ☆ जनरेशन गॅप ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

खरोखरी ‘जनरेशन गॅप’ अशी काही गोष्ट असते का हो? दोन पिढ्यांच्या मतांतराला हे नाव दिलंय झाले. असो.प्रत्येक पिढीचा कालावधी वेगळा, परिस्थिती वेगळी,अनुभव वेगळे, उपलब्ध साधन सामग्री वेगळी, त्यामुळे गरजा वेगळ्या, राहणीमान वेगळे, विचारसरणी वेगळी, शैक्षणिक पात्रता वेगळी असते. मग नैसर्गिकपणे त्यांच्या वागण्या-बोलण्यात, विचारात फरक असणारच आहे. त्यात वेगळे विशेष ते काय?

काही वर्षांपर्यंत हे बदल तुलनेने खूप सावकाश होत होते. त्यामुळे वर्षानुवर्षे परिस्थिती जवळपास सारखीच, आहे तशीच, असायची. आपण आपल्या आजोबा,पणजोबांचे विचार कौतुकाने सांगायचो. पण आता आधीच्या सोडा, अगदी मागच्या पिढीचे विचारही मागासलेले, बुरसटलेले वाटतात.

कारण आजचा काळ एकदम वेगळा आहे‌. आज दोन पिढ्यांमध्ये एकदम तीन-चार पिढ्यांएवढे अंतर पडलेले जाणवते आणि त्यातली कळीची मेख आहे आजचे प्रगत तंत्रज्ञान.

संगणकाचे आगमन झाले आणि बदलाला वेगाने सुरुवात झाली. त्यात एकदम मोठी भर पडली ती मोबाईलमुळे. आजचा  ‘स्मार्टफोन’ तर जणू बाटलीतला राक्षसच आहे. नवीन पिढी अगदी लहानपणापासून या तंत्रज्ञानात पारंगत होतेय आणि जुन्या पिढीला या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे अवघड जातेय. त्यामुळे तर दोन पिढ्यातले अंतर आणखीनच वाढले आहे.

पण गरज माणसाला शहाणे बनवते. पाण्यात पडले की पोहता येते. तसे आत्ताच्या लाॅकडाऊनच्या परिस्थितीमुळे अनेक ज्येष्ठांनी नवीन तंत्रज्ञानाशी छान दोस्ती केली. त्यामुळे आपोआप नव्या पिढीशी पुन्हा जवळीक होऊ लागली आहे. नवी पिढी पण ज्येष्ठांच्या या विद्यार्थीदशेला  स्वत: गुरु बनून कौतुकाने छान प्रतिसाद देत आहे‌. नव्या-जुन्या पिढ्यांची पुन्हा छान गट्टी जमत आहे.

सर्वच आघाड्यांवरील  बदलाने वैचारिक, आर्थिक, शैक्षणिक अंतर हे पडणारच आहे. त्यात नवीन सुधारणांनी, तंत्रज्ञानाने जग जास्ती जवळ आले आहे. नोकरी व्यवसायामुळे परदेशी जाऊन राहणाऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे परदेशी राहणीमान, विचारसरणीचे ही आक्रमण झालेले आहे. तेव्हा नव्या-जुन्यांचा, पाश्चात्य व पौर्वात्य अशा बदलांचा, विचारसरणीचा संयमाने, विवेकाने मेळ घातला की आपोआप संघर्ष टाळता येईल.

अशावेळी दोन्ही पिढ्यांतील लोकांनी दुसऱ्याच्या भूमिकेत शिरून विचार केला की त्याची बाजू छान समजते आणि जुळवून घेणे सोपे जाते. म्हणतात ना दुसऱ्याच्या चप्पलेत पाय घातला की, ती नक्की कुठे चावते हे लक्षात येते. तसेच इथेही असते. एकदम कुठलाही निष्कर्ष काढण्यापूर्वी दुसऱ्याच्या विचारांचा पूर्ण उलट-सुलट विचार करायला हवा. शेवटी विचार वेगळे असले तरी त्यामागे आपलीच जीवाभावाची व्यक्ती आहे हे आधी लक्षात घ्यायला हवे. मग आपोआप विचार सोपे होतील आणि संघर्ष टळू शकेल.  मतभेद झाले तरी मनभेद होणार नाही याची काळजी घेता येईल.

नव्या-जुन्यांचा मेळ गुंफणे

हे आपल्याच हातात आहे

एकमेकांना समजून घेणे

हेच दोघांच्याही हिताचे आहे !!

“जगात काय चाललेय हे तुम्हाला माहित नाही. आता पूर्वीचे सगळे विसरा. काळ बदलला आहे.तेव्हा तुम्ही पण जरा काळाप्रमाणे बदला. हे जुने विचार सोडा, “असे नव्यांनी जुन्यांना टाकून बोलू नये‌. त्याच बरोबर,” आम्हाला या सर्व गोष्टी नवीन आहेत‌. थोडा वेळ लागेल जुळवून घ्यायला. आम्ही प्रयत्न करू, तुमच्या कडूनच शिकू. तुम्ही थोडे सांभाळून घ्या,” अशी जुन्या पिढीने पण बदलायची तयारी दाखवायला हवी.

शेवटी जुन्यांनी एक पाऊल पुढे टाकले आणि नव्यांनी एक पाऊल मागे घेतले, तर हे दोघातले अंतर आपोआप कमी होईल. हातात हात घेत आनंदाने वाटचाल होऊ शकेल. म्हणूनच मला वाटते दोन पिढ्यांच्या मतमतांतरांमुळे ‘वाद’ न होता घर्षणमुक्त ‘संवाद’ होण्यासाठी सोडलेली गॅप म्हणजेच “जनरेशन ” गॅप आहे.

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments