श्री सुनील शिरवाडकर
☆ सोनाराने टोचले कान… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆
मनुष्याच्या जन्मापासून तर म्रुत्युपर्यंत त्याच्यावर एकूण सोळा धार्मिक संस्कार केले जातात. त्यामधील पहिला संस्कार म्हणजे कान टोचणे. काही अपवाद वगळता अजूनही कान टोचण्यासाठी सोनाराचीच गरज पडते. आयुष्यात मी कितीतरी वेळा कान टोचले असतील. परंतु प्रत्येक वेळी कान टोचताना ते एक आव्हानच वाटते.
बाळ जन्मल्यानंतर बाराव्या दिवशी कान टोचावे असा प्रघात आहे. बहुतेक घरांमधून तो अजूनही पाळला जातो. काही अपवादात्मक परीस्थितीत बाराव्या दिवशी जर जमले नाही, तर मग साधारण पहिल्या सव्वा महिन्यात कान टोचले जातात. अगदी लहान असतानाच कान का टोचायचे?तर त्या वेळी कानाच्या पाळ्या ह्या खुपच पातळ असतात. म्हणजे बाळाला कान टोचताना त्रास होत नाही.. आणि सोनारालाहि त्रास होत नाही. अजूनही काही घरांमध्ये पंचांगात मुहूर्त पाहून कान टोचण्यासाठी बोलावले जाते.
सोन्याची अतिशय बारीक तार घेऊन त्याचे सुंकले बनवतात. मात्र काही ठिकाणी बाळ्या हा शब्द वापरतात. साधारण अर्धा ग्रामची जोडी असे याचे वजन असते. काही जण यातही शुद्ध सोने वापरतात.त्यापेक्षा २२कैरेट सोने वापरले तर ते अधिक उत्तम. कारण त्याला थोडा कडकपणा असतो. त्याने कान अधिक सुलभतेने टोचले जातात.
या कान टोचण्याच्या विधीमध्ये खोबर्याची वाटी खूप महत्वपूर्ण भुमिका बजावते. सुंकल्याला टोक व्यवस्थित झाले आहे, हे केव्हा कळते.. तर ते खोबर्याच्या वाटीला टोचल्यावर.खोबर्याच्या वाटीला सुंकले व्यवस्थित टोचले गेले.. याचा अर्थ त्याचे टोक एकदम बरोबर झाले आहे. कारण जर टोकच व्यवस्थित नसेल तर कान नीट टोचले जाणारच नाही. हे पहिले कारण.
दुसरे कारण म्हणजे..सुंकल्याला जे खोबर्याचे तेल लागते ते कान टोचताना ग्रिसिंगचे काम करते. कोणत्याही इतर तेलापेक्षा हे तेल अधिक शुद्ध असते.
डावी तर्जनी कानाच्या पाळीखाली हातात धरून एकाच दाबात कान टोचणे आणि कान टोचताना थेंबभरहि रक्त न येणे हे कौशल्याचे काम असते. क्षणभर बाळ रडते आणि मग शांत होते. त्यानंतर महत्त्वाचे म्हणजे त्या सुंकल्याची व्यवस्थित गाठ मारणे. ही गाठ मारताना बाळाने जर जास्त हालचाल केली तर तेथून थोडे रक्त येऊ शकते, पण हे क्वचितच.
कान टोचून झाल्यावर बाळाच्या आईने खोबरे आणि मीठ एकत्र चावून, बाळाच्या कानाच्या पाळीला लावायचे असते. याचे दोन उद्देश. एक म्हणजे खोबर्यामुळे कानाची पाळी जरा नरम रहाते, आणि मीठ हे जंतुनाशक असल्याने तेथे जंतुसंसर्ग होण्याची भीती नसते. काहीजण विचारणा करतात की, तेथे कुंकू लावु का? पुर्वी ही प्रथा असावी. हळदीपासुन बनवलेले कुंकू कदाचित चांगला परिणाम देऊन जात असेल.. पण अलीकडे बाजारात उपलब्ध असलेल्या कुंकवात काही भेसळ असण्याची शक्यता असते. परीणामी ते न लावलेले योग्य.
कान टोचण्यासाठी जेव्हा सोनाराला घरी बोलावले जाते,तेव्हा त्याला मोठी अपुर्व वागणूक मिळते.एकदा एका घरी मी कान टोचण्यासाठी गेलो होतो. घरात एखादे मोठे मंगल कार्य असल्यासारखी गर्दी. हॉलमध्ये मध्यभागी समोरासमोर पाट टाकले होते. एका पाटावर मी बसलो. समोरच्या पाटावर एक वयस्क स्त्री बाळाला घेऊन बसली. कान टोचताना बाळाची आई शक्यतो तेथे उपस्थित रहात नाही. कारण तिला बाळाचे रडणे बघवत नाही. त्यामुळे बाळाची आजी, किंवा आत्या बाळाला घेऊन बसते. तर येथे कान टोचण्यासाठी बसल्यावर आजुबाजुला खूप गर्दी. लहान मुलं कुतुहलाने गोळा झाली होती. बर्याच जणांनी हा सोहळा पाहिलेला नसतो. मग त्याचे खूप प्रश्न.
“अहो, खूप दुखेल का?”
“रक्त तर नाही ना येणार?”
“किती दिवसात बरे होईल?”
प्रश्नांची सरबत्ती सुरू होती.मी इतका अनुभवी.. पण त्या परीस्थितीत मलाही घाम फुटला. आजुबाजुला हवा येण्यास जागा नाही. बाळाला त्रास होईल म्हणून पंखा बंद. शेवटी सर्वांना जरा बाजूला व्हायला सांगितले तेव्हा कुठे हायसे वाटले. आणि मग व्यवस्थित कान टोचले गेले.
कान टोचण्यासाठी ठराविक रकमेचा आग्रह मी कधीच धरीत नाही. एक सन्मान समजून ते काम करतो. मग कधी खुपच आदरातिथ्य झाले तर मोठी दक्षिणा मिळते.. तर अकरा रूपयांवरही संभावना होते. पण त्याबद्दल माझी कधीच तक्रार नसते.
कान टोचण्याबरोबर कधीतरी नाक टोचण्याचाही प्रसंग येतो. त्यावेळी मुलगी मोठी झालेली असते. अलीकडे बुगडी घालण्याची फैशनही परत मुळ धरु लागली आहे. कानाच्या वरच्या भागात टोचण्यासाठी महिला येतात.या भागात टोचण्यासाठी सुंकले जरा जाड करावे लागते. कारण कानाचा तेथील भाग खुपच निबर आणि जाड झालेला असतो.काही जणींना त्यामुळे खुपच वेदना होतात. काही काळ त्या सहन करायची तयारी असेल तर बुगडी घालण्यासाठी कान टोचावे.
अलीकडे बऱ्याच ऐतिहासिक सिरीयल टीव्हीवर चालू असतात. त्यामुळे बिगबाळी घालण्यासाठी कॉलेजची मुले तसेच पौरोहित्य करणारी मंडळी कान टोचण्यासाठी येतात.
अखेरीस काय तर.. कान टोचणे हा एक व्यवसाय म्हणून न बघता तो आपला सन्मान आहे असे मी समजतो.
© श्री सुनील शिरवाडकर
मो.९४२३९६८३०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈