श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “बोललं पाहिजे” ☆ श्री मंगेश मधुकर 

घड्याळात रात्रीचे साडे आठ वाजलेले पाहून आशानं ताबडतोब फोन केला पण अंजूनं उचलला नाही.इतक्यात दारावरची बेल वाजली. 

“सकाळी सातला गेलेली आत्ता उगवतेस.”

“आई,रोजचाच प्रश्न विचारून डोकं पिकवू नकोस.महत्वाचं काम होतं म्हणून उशीर झाला.”

“चकाट्या पिटणं हे महत्वाचं काम नाहीये.”सुरेश कडाडल्यावर बापलेकीत जुंपली.

कॉलेजला जायला लागल्यापासून अंजूचं घराबाहेर राहण्याचं प्रमाण वाढलं. सकाळीच जाणारी अंजू रात्री आठ पर्यंत यायची.आल्यावर सुद्धा फोनवर बोलणं चालूच. मैत्रिणी, मित्र आणि मोबाईल यातच गुंग.घरात अजिबात लक्ष नाही.सगळी कामं आशाच करायची.अंजूच्या बेफिकीर वागण्याची आशाला काळजी वाटत होती.खूपदा समजावलं पण काहीही उपयोग नाही.एकीकडे लेकीचं असं वागणं तर नवऱ्याची दुसरीच तऱ्हा. .घरात पैसे देण्याव्यतिरिक्त कोणतीच जबाबदारी घेत नव्हता, मात्र जरा काही मनाविरुद्ध झालं की वाट्टेल ते बोलायचा.चिडचिड करायचा.अंजूच्या वागण्याविषयी दोष द्यायचा.आशा सगळं निमूट सहन करत होती.

सुरेश आणि अंजूमध्ये वाद तर रोजचेच. त्यासाठी कशाचंही निमित्त पुरायचं.घरातल्या कटकटी वाढल्या. दोघंही आपला राग आशावरच काढायचे.नवरा आणि मुलीच्या एककल्ली वागण्याचा प्रचंड ताण आशावर होता.सहन होईना अन सांगता येईना अशी अवस्था. सगळे अपमान,अवहेलना ती आतल्याआत साठवत होती. मनमोकळं बोलावं असं तिच्या आयुष्यात कोणीच नव्हतं. शेजारी राहणाऱ्या मंगलबरोबर आशाची छान गट्टी जमायची, पण सहा महिन्यापूर्वी मंगल दुसरीकडं रहायला गेली अन आशा पुन्हा एकाकी झाली.हळूहळू तिनं बोलणं कमी केलं.फक्त विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं द्यायची.घरात भांडणं सुरु झाली की कोरड्या नजरेनं पाहत बसायची. मनावरच्या ताणाचे परिणाम दिसायला लागले.तब्येतीच्या तक्रारी सुरू झाल्या.निस्तेज चेहरा,डोळ्याखाली काळी वर्तुळ जमा झाली. खाण्या-पिण्यातलं लक्ष उडालं.वजन कमी झालं.खूप दिवसांची आजारी असल्यासारखी दिसायला लागली.आशामधला बदल आपल्याच धुंदीत जगणाऱ्या सुरेश आणि अंजूच्या  लक्षात आला नाही.आशानं सूड म्हणूनच स्वतःकडे दुर्लक्ष केलं.

एके दिवशी नेहमीसारखी बापलेकीत वादावादी चालू असताना किचनमधून ‘धाडकन’ पडल्याचा आवाज आला.अंजून पाहिलं तर जमिनीवर पडलेली आशा अर्धवट शुद्धित अस्पष्ट बोलत होती.लगेच हॉस्पिटलमध्ये नेलं. सगळ्या तपासण्यांचे रिपोर्ट नॉर्मल आले.तीन दिवसांनी घरी सोडलं पण तब्येतीत फारसा फरक नव्हता.डॉक्टरांनी औषधं बदलली पण उपयोग नाही.खरंतर आशाला वैफल्य आलेलं.हताश,निराश मनस्थितीमुळे तब्येत सुधारत नव्हती.नाईलाजाने का होईना सुरेश,अंजू काळजी घेत होते, तरी आपसातली धुसफूस चालूच होती.आशाची ही अवस्था आपल्यामुळेच झालीय याची जाणीव दोघांना नव्हती. मन मारून जगणाऱ्या आशाचा त्रास समजून घेणारं कोणीच नव्हतं.वेदना बाहेर पडायला जागा नसल्यानं दिवसेंदिवस आशाची तब्येत खालावत होती. 

वरील घटनेतील ‘आशा’ हे एक प्रातिनिधिक उदाहरण. तिच्यासारखंच  मानसिक ओझं घेऊन जगणारे अनेकजण आहेत. 

नुकताच पावसाळा सुरू झालाय.धो धो कोसळणारं पाणी वाट मिळेल तिथून पुढे सरकते पण तेच पाणी नुसतंच साठत राहिलं तर ??? अनर्थ होईल –. तोच निकष मनाला लागू पडतो.

रोज अनेक गोष्टींना सामोरं जाताना अनेकदा मनाविरुद्ध वागावं लागतं.अपमान सहन करावे लागतात.राग,संताप गिळून गप्प बसावं लागतं.नोकरदारांना तर हा अनुभव रोजचाच.या सगळ्या तीव्र भावना मनात साठल्या जातात.अशा नकारात्मक भावनांचा साठा वाढत जातो.वेळच्या वेळी निचरा होत नाही.ताणामुळे शारीरिक त्रास सुरू होतात.

पूर्वी मन मोकळं करण्यासाठी नातेवाईक,शेजारी,मित्र-मैत्रिणी अशी जिवाभावाची माणसं होती.एकमेकांवर विश्वास होता.त्यांच्याबरोबर बोलल्यानं मन हलकं व्हायचं.एकमेकांची अनेक गुपितं बोलली जायची.सल्ला दिला घेतला जायचा.थोडक्यात मनातला कचरा वेळच्या वेळी काढला जायचा.आता सगळं काही आहे– फक्त मनातलं बोलायला हक्काचं माणूस नाहीये.सुख-सोयी असूनही मन अस्थिर.आजच्या मॉडर्न लाईफची हीच मोठी शोकांतिका. बदललेली कुटुंबपद्धती,फ्लॅट संस्कृती आणि मी,मला,माझं याला आलेलं महत्त्व .. .यामुळे कोणावर पूर्णपणे  विश्वास ठेवणं अवघड झालंय.मनातलं बिनधास्त बोलावं अशा जागा आता नाहीत.खाजगी गोष्टी सांगितल्यावर त्याचा गैरफायदा तर घेतला जाणार नाही ना?या शंकेनं मनातलं बोललंच जात नाही.मनाची दारं  फ्लॅटप्रमाणे बंद करून मग तकलादू आधार घेऊन जो तो आभासी जगासोबत एकट्यानं राहतोय.खूप काही बोलायचंय पण विश्वासाचा कान मिळत नाही.

— 

रोजचा दिवस हा नवीन,ताजा असतो.आपण मात्र जुनी भांडणं,टेन्शन्स,चिंता,मतभेद यांना सोबत घेऊन दिवसाला सामोरे जातो.शिळं,फ्रीजमधलं दोन-तीन दिवस ठेवलेलं अन्न खात नाही परंतु वर्षानुवर्षे मनात अपमान,राग,वाद जपून ठेवतो.संबधित व्यक्ती अनेक वर्षानंतर जरी भेटली तरी साऱ्या कटू आठवणी लख्खपणे डोळ्यासमोर येतात.भावना तीव्र होतात.राग उफाळून येतो आणि स्वतःलाच त्रास होतो.विचारात लवचिकता आणली तर कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचं आणि काय सोडून द्यायचं हे ठरवता येतं.

इतरांच्या वागण्याचा स्वतःला त्रास करून घेणं…. सोडून द्या 

क्षुल्लक गोष्टींचे ताण घेणं…. सोडून द्या 

ऑफिसचं टेंशन घरच्यांवर काढणं….  सोडून द्या 

विनाकारण राग,द्वेष करणं ….  सोडून द्या 

इतरांचं वागणं नियंत्रित करू शकत नाही.तेव्हा….  सोडून द्या 

सगळंच नेहमी मनासारखं होणार नाही तेव्हा….  सोडून द्या. 

सर्वात महत्वाचे,

आजचं जग फार प्रॅक्टिकल आहे.वारंवार इमोशनल होणं… सोडून द्या 

आयुष्यात असं कोणीतरी असलं पाहिजे,ज्याच्याशी मनातलं सगळं बिनधास्त बोलता येतं 

हे वाचताना ज्याची आठवण झाली तोच तुमचा जिवलग.हे नक्की… त्याच्याशी बोला.वेळच्या वेळी भावनांना वाट करून द्या . .साठवण्यापेक्षा बोलून मोकळं व्हा.

पाणी आणि मनभावना वाहत्या असल्या तरच उपयोगी नाहीतर..

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments