पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर
मनमंजुषेतून
☆ ‘‘माझा व्यायाम शाळेतील पहिला (आणि बहुधा शेवटचा) दिवस !!’’ ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆
(…नुकताच जागतिक योग दिन साजरा झाला .. त्यानिमित्त….एक सुरम्य आठवण …)
आधीच मला व्यायामाचे वेड! (?) त्यात वेळ न मिळाल्याचे कौतुक! त्यामुळे गेली कित्येक वर्षं सर्वांनी सांगून, समजावूनही, मला व्यायाम किंवा ‘योग’ नावाची गोष्ट, मुद्दामहून कधीच करायचा योग आला नव्हता! शिवाजी पार्कला राहत असताना, घरासमोरच्या समर्थ व्यायामशाळेत रोज सकाळ-संध्याकाळ, शेकडो मुलं झरझर मल्लखांब करताना, व्यायाम करताना पाहून मला खूप कौतुक वाटे. आपणही असेच सुटसुटीत असावं, असं वाटे!
अलीकडेच मी व्यायामशाळेचे प्रमुख, शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित असलेल्या श्री. उदय देशपांडे सरांनी केलेल्या विनंतीमुळे , व्यायामशाळेची विश्वस्त आणि आजीव सभासदही झाले. मी विचार केला, ‘चला, आपणही हातपाय हलवून पाहूया’, आणि मला कोण स्फूर्ती आली!!
तो सुदिन म्हणजे ७ जुलै…. माझा वाढदिवस! प्रत्येक वाढदिवसाचा निश्चय, हा नव्या वर्षातल्या पहिल्याच दिवशी करतात, तशा संकल्पासारखा – मोडणाऱ्या मनोऱ्यांसारखाच असतो, हे मला ठाऊक असूनही, मी पहाटे ६ वाजता व्यायाम शाळेत हजर झाले. तिथली उत्साही मंडळी उशा, चादरी घेऊन आली होती , तसे मी काहीच नेले नव्हते. प्रशिक्षक मॅडमनी ‘शवासना’पासून सुरुवात केली….. आणि इथेच तर खरा गोंधळ झाला…!
सर्वांनी शरीरे जमिनीवर झोपून सैल सोडली. मॅडमच्या सांगण्यानुसार, पायाच्या बोटापासून प्रत्येक जण डोळे मिटून, लक्ष केंद्रित करत होता. नंतर बराच वेळ काय चालले होते, हे मला कळलंच नाही. काही वेळाने मी दचकून डोळे उघडले, आणि पाहते तो काय?…. आजूबाजूला रंगीबेरंगी कपड्यातले बरेच पाय….. हवेत लटकताना दिसले!! मी तर पुढच्या कुठल्याही सूचना ऐकण्यापूर्वीच कुंभकर्णासारखी ठार झोपले होते तर!! नेहमीप्रमाणे ताबडतोब स्वप्नही सुरू झाले होते… कुठे दगडावरही मेली छाऽऽन झोप लागण्याची ही माझी जुनीच सवय! माझा हा अवतार पाहून, प्रशिक्षक मॅडम मला शेवटी म्हणाल्या, “अहो, सॉरी हं.. तुम्ही इतक्या छान झोपी गेलात ते पाहून आणि सेलेब्रिटी म्हणून तुम्हाला कसं उठवू? असं झालं मला!” हे ऐकून तर मला वरमल्यासारखंच झालं. पण गालातल्या गालात हसूही फुटलं!
त्यामुळे ‘शवासन’, हा माझ्यासाठी एकमेव सर्वांगसुंदर व्यायामाचा आणि परमेश्वरी कृपाप्रसादाचा प्रकार आहे, असं मी आजवर मानत आलेय!!!
© सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈