सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “दगडातला देव …” भाग – १ ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

जोशी काकांबरोबर कोकणातली  ट्रिप सुरू होती. संध्याकाळ झाली होती. आम्हाला जायचं होतं ते ठिकाण अजून लांब होत. 

अचानक एका देवळासमोर गाडी थांबली. आम्हाला काही कळेना.इथे का थांबलो?…. 

खाली उतरलो.काका म्हणाले

“गणपतीचे दर्शन घेऊया “

एक साधेच  नेहमी असते तसे देऊळ होते. दर्शन घेतले. 

काका म्हणाले “आता सगळेजण आपण इथे बसून अथर्वशीर्ष म्हणुया”

काकांच हे काय चालल आहे आम्हाला कळेना..

तेवढ्यात काकांनी खणखणीत आवाजात सुरुवातही  केली. 

“ओम भद्रं कर्णेभि: शृणुयाम देवा:..”

आम्ही पण सगळे म्हणायला लागलो..

“हरि ओम् नमस्ते गणपतये…”

अथर्वशीर्ष म्हणून झाल्यावर बाहेर आलो.

देवळाच्या आवारात छोटे छोटे असंख्य दगड टाकलेले होते आणि त्याच्या मधून छान  रस्ता केलेला होता.

काका म्हणाले

“या देवळाच्या आसपासचे हे दगड बघितलेत का?”

“दगड.”

“हो ..दगडच “

त्यात काय बघायचं ?..आम्हाला समजेना..

“तुम्हाला या देवळाची एक विशेष गोष्ट सांगायची आहे.

तुम्ही देवळाची प्रदक्षिणा करा आणि कुठलाही एक दगड उचला..

तो गणपतीच आहे…

अट एकच आहे फक्त एकदाच दगड उचलायचा…”

“म्हणजे?”

काका काय म्हणत आहेत हेच आम्हाला कळेना …त्यांनी परत सगळे सांगितले.

असं कसं असेल?

आम्हाला वाटल काका आमची मजा करत आहेत.

पण काका अगदी गंभीरपणे सांगत होते.

“स्वतः करून बघा तुम्हीच…”ते म्हणाले..

आम्ही प्रदक्षिणा करून आलो..

आता गंमत सुरू झाली.

कुठला दगड उचलावा हे कळेचना… आम्ही सर्वजण उभे होतो.

काका एकदम म्हणाले

“गणपती बाप्पा मोरया…”

आणि आम्ही प्रत्येकाने खाली वाकुन एक एक दगड उचलला.

प्रचंड उत्सुकता…. कुतूहल ….अपेक्षा….

दगडाच निरीक्षण  सुरू झालं…

आणि मग काय मजाच सुरू झाली….

प्रत्येकाला त्याच्या दगडात बाप्पा दिसायला लागला. तुझा बघु …. माझा बघ… प्रत्येकाने निरीक्षण केलं…

कोणाला डोळा दिसत होता ..कोणाला सोंड दिसत होती ..

काहीजण हिरमुसले… त्यांना बाप्पा दिसला नाही .मग कुणीतरी म्हटलं पालीचा आणि लेण्याद्रीच्या गणपतीचा  भास होतो आहे…..

कितीतरी वेळ आम्ही त्याच नादात होतो.

काकांनी परत एकदा गणपती बाप्पाचा गजर केला.आणि  म्हणाले 

“चला बसा गाडीत “पुढच्या प्रवासाला निघालो.. 

काही जणांना ती गंमत वाटली त्यामुळे त्यांनी तो दगड टाकून  दिला. तर काही जणांनी तो  दगड श्रद्धेनी बरोबर घेतला..

गाडी सुरू झाली आणि लक्षात आलं की मगाशी हळूहळू  गचके खात चालणारी   गाडी आता सुसाट चालली होती…

गाडी दुरुस्त झाली होती.

अरेच्चा अस होत तर….

तेवढा वेळ काकांनी आम्हाला गुंगवून ठेवले होते .आणि नकळतपणे आम्ही पण त्या खेळात रंगून गेलो होतो…

गाडी बिघडली… असे सांगितले असते तर आमचा हिरमोड झाला असता. आम्ही कंटाळलो असतो… त्यासाठी काकांनी ही युक्ती केली होती.

काकांना किती छान सुचलं नाही का?

विघ्न आलं…  संकट आलं की घाबरायचं नाही .आपलं लक्ष दुसऱ्या एखाद्या चांगल्या सकारात्मक  गोष्टीकडे लावायचं. त्यात मन रमवायचं ….काही वेळ जाऊ द्यायचा कदाचित प्रश्न सुटतातही….

पण एक मात्र सांगू का?

त्या दिवशी आम्हाला खरंच प्रत्येकाच्या दगडात थोडा का होईना देव दिसला…..

बस मधून उतरताना काका म्हणाले…..

“आज दगडातला देव बघितलात. आता माणसातला देवही बघत जा बरं का….. देवाशी वागता तस माणसाशीही वागुन बघा …”

आम्ही सगळे स्तब्ध झालो …

त्या छोट्याशा वाक्यातून काकांनी आम्हाला खूप काही सांगितले शिकवले….

हळूहळू आम्ही शिकत आहोत.

त्या गणपतीकडे बघितले की मला हे सर्व आठवते.

माझा तो दगड अहं …गणपती आता माझ्याकडे आहे.

मला त्यात बाप्पा दिसतो…

आज काका नाहीत ..

पण त्यांनी सांगितलेले जीवनाचे तत्वज्ञान तुम्ही पण लक्षात ठेवा हं..ते आयुष्यभर पुरणारे आहे…

– क्रमशः भाग पहिला 

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments