सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “दगडातला देव …” भाग – २ ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

आज अचानक मीनाचा फोन आला “आहेस का घरी येऊ का?”

म्हटलं   “ये…”

जोशी काकांच्या कोकण ट्रीपला तिची ओळख झाली. व्हाट्सअप ग्रुप वर मेसेज असायचे.खर तर ट्रीप नंतर तिचा फारसा संबंध  आला नव्हता. व्हाट्सअप ग्रुप वर होतो तेवढच.. त्यामुळे आज ती घरी का येते हे कळेना…

मीना आणि अजून पाच जणींचा ग्रुप होता. जोशी काका वेगळं काही सांगायला लागले की त्या बोअर व्हायच्या. तिथून निघून जायच्या…. कॉमेंट्स करायच्या .

असू दे …..बरोबर आहे त्यांचं… सगळ्यांनाच कस आवडेल म्हणून आम्ही पण काही बोलत नव्हतो.

गणपती मंदिरात मीना माझ्या शेजारी उभी होती तिनी दगड ऊचलला

आणि म्हणाली..

“हे बघ नीता काही गणपती बीणपती दिसत नाही ऊगीच आपलं ..  काका काहीतरी  सांगतात आणि तुमचा लगेच विश्वास बसतो “असं म्हणून तो दगड माझ्या हातात देऊन ती   निघून गेली होती. 

मी तिचा आणि माझा दगड पर्समध्ये ठेवला होता.

ती येणार म्हटल्यावर आज हे आठवले….

तीचं काय काम आहे समजेना…

ती आली.

जरा वेळाने म्हणाली

” मी उचललेला दगड तू घरी आणला होता तो आहे का ग?”

“आहे माझ्याकडे..पण त्याची तुला आज कशी आठवण झाली?”

“नीता तुझा लेख वाचला आणि आम्ही जोशी  काकांना किती हसत होतो त्यांची टिंगल करत होतो हे आठवले. तुम्ही किंवा काका देव दिसला की  लगेच स्तोत्र,आरत्या काय म्हणता म्हणून आम्ही वैतागत  होतो …..काका उपदेश करतात म्हणून आम्ही त्यांची खिल्ली ऊडवायचो….

तुझा लेख वाचला आणि माझ्या वागण्याच मला खरंच वाईट वाटायला लागलं……

त्या माणसातला देव आम्ही पाहिलाच नाही….म्हणून आज मुद्दाम तुला भेटायला आले.”

“अगं होतं असं अनवधानांनी असू दे नको वाईट वाटून घेऊ…..ट्रीप मध्ये मजा ,गंमत करायची असं तुमच्या डोक्यात होत ..त्यामुळे तुम्हाला ते आवडत नसेल… “

मी तिची समजुत काढली.

“आणि अजून एक गोष्ट झालेली आहे ती तुला सांगते .माझ्या नातीचा गॅदरिंग मध्ये

“अधरं मधुरम् वदनं मधुरम्”

या मधुराष्टकावर डान्स बसवलेला आहे. ती ते  मनापासुन  ऐकत असते.तीचे ते पाठ पण झाले आहे. काल नातीने मला विचारले आजी तुला हे माहित आहे का? तेव्हा आठवले तुम्ही कृष्णाच्या मंदिरात हे म्हटले होते.”

“हो आठवले.तीथे कदंब वृक्ष होता.त्याची माहिती काकांनी सांगितली होती.”

यावर ती म्हणाली 

“आज मनापासून सांगते .जोशी काकांची माफी मागावी असं वाटलं. आता ते नाहीत म्हणून तुझ्याकडे आले.”

तीचे हात हातात घेतले.

थोड्या वेळानंतर तीचा दगड घेऊन आले.दगड तिच्या हातात देऊन म्हटलं

” एक सांगु का? यात बाप्पा शोधायचा प्रयत्न करूच नकोस .नुसती काकांची आठवण म्हणून ठेव .या दगडाकडे पाहून तुला ईतरही काही आठवेल आणि तेच खर महत्त्वाच आहे.तुझ्या विचारांमध्ये बदल झाला  आहे.ही या दगडाची किमया आहे. “

असं म्हणून तिच्या हातात तो दगड दिला

तिने तो आधी कपाळाला लावला आणि मग तो बघायला लागली……. …

आणि अचानक म्हणाली

“नीता मला गणपती दिसतो आहे…. अग खरच शपथ घेऊन सांगते..”

तिचे डोळे भरून वहात होते…

असचं असत ना…

अनमोल गोष्टी हातातून जातात आणि मग त्याचं महत्त्व आपल्याला..

 पटतं……

तसेच काकांसारखी माणसं आयुष्यातून जातात पण गेल्यानंतरही अशीच शहाणी करतात… विचारात परिवर्तन घडवून आणतात…

असू दे ….

अशी माणस आपल्या आयुष्यात आली हेही आपलं भाग्य म्हणायचं. आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गावरून चालत राहायचं….

– समाप्त – 

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments