डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ अशी पाखरे येती…!!! – भाग-१ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(श्री अजय कटारिया सर यांना सादर समर्पित) 

पुण्यामध्ये आप्पा बळवंत चौकाचं नाक जिथून सुरू होतं, तिथे चॉईस नावाचं पुस्तकाचे दुकान आहे. दुकानाच्या मालकांचे नाव आहे श्री अजय कटारिया. 

बरोबर सहा वर्षांपूर्वी एका स्नेह्यांच्या माध्यमातून यांची आणि माझी ओळख झाली. 

बोलता बोलता ते म्हणाले, ‘माझे पुस्तकाचे दुकान आहे, कधी काही लागलं तर या…!’

भीक मागणाऱ्या अनाथ मुलांना आपण दत्तक घेऊन, त्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे. दरवर्षी मला खूप शैक्षणिक साहित्य लागतेच. 

कटारिया साहेबांच्या चॉईस दुकानात गेलो; तर थोडी सूट मिळेल आणि चांगल्या क्वालिटीचे साहित्य मिळेल, हा स्वार्थी विचार करून मी त्यांना चार-पाच वर्षांपूर्वी प्रथमच, सर्व शैक्षणिक साहित्याची लिस्ट दिली. 

त्यानंतर दोन दिवसांनी सर्व साहित्य आले.

बॉक्स उघडून पाहिला, आम्ही दिलेल्या लिस्टपेक्षाही सामान जास्त होते. 

आम्ही एक वही मागितली तिथे पाच वह्या होत्या, एक दप्तर मागितले तेथे पाच दप्तरे होती, पाच कंपास पेट्या मागितल्या तिथे 25 होत्या…

मी त्यांना फोन करून म्हणालो, ‘कटारिया साहेब, बहुतेक हा दुसऱ्यांचा बॉक्स आमच्याकडे आला आहे… हि आमची लिस्ट नव्हे ! 

ते हसून म्हणाले, ‘असू द्या हो डॉक्टर, अनाथ पोरांना शिकवताय… थोडं इकडे तिकडे चालणारच…  पोरं आहेत… 

घ्या आमच्याकडून डोनेशन समजून…’ 

एक्स्ट्रा सामानाची मी त्यांना देणगी म्हणून पावती दिली, त्यांनी ती हसत खिशात ठेवली. 

पुढच्या वर्षी म्हणजे साधारण 2021 ला त्यांना पुन्हा लिस्ट दिली… पुन्हा पाचपट सामान जास्त होते… मी पुन्हा तोच फोन केला… पुन्हा त्यांचे तेच उत्तर आले… एक्स्ट्रा सामानाची मी त्यांना पुन्हा पावती दिली… ही पावती हसत त्यांनी पुन्हा खिशात ठेवली…! 

एकावर एक फ्री… हि बिझनेस स्ट्रॅटेजी मी समजू शकतो, पण एकावर पाच फ्री… ??? 

मग 2022 साल उजाडले… 

यावेळी सामानाची लिस्ट घेऊन मी स्वतः दुकानात गेलो. दुकानात भरपूर कर्मचारी आहेत, परंतु माझ्याकडची लिस्ट घेऊन त्यांनी स्वतः सामान बांधायला सुरुवात केली. 

मी बारकाईने पाहत होतो, माझ्या लिस्ट पेक्षा पाचपटीने जास्त गोष्टी ते स्वतःच्या हाताने बॉक्समध्ये भरत होते. 

मी त्यांना म्हणालो साहेब, आपण आपले नुकसान का करून घेता ? माझ्या लिस्ट प्रमाणेच मला सामान द्या…

यावर ते माझ्याकडे न बघता, स्टूल घेऊन, वरच्या कप्प्यातले सामान काढता काढता म्हणाले, ‘डॉक्टर भरगच्च भरलेल्या ताटामधून दोन घास चिमण्यांना टाकले म्हणजे आपलं काही नुकसान होत नाही हो …! 

ए त्या चौथा कप्प्यातला, नवीन माल काढ… त्यांचं सगळं लक्ष बॉक्स भरण्याकडे….

तरीही मी माझं बोलणं रेटत म्हणालो,  पण हा आपला व्यवसाय आहे साहेब, मला साहित्य देणे म्हणजे आपला तोटा आहे …! मी आवंढा गिळत म्हणालो. 

तितक्याच उत्स्फूर्तपणे बॉक्समध्ये साहित्य टाकत ते म्हणाले, ‘साहेब धंदा म्हणा, व्यवसाय म्हणा, कारभार म्हणा, कारोबार म्हणा…. जे काही करायचं ते नफ्यासाठी… मी पक्का व्यापारी आहे, तोट्यामध्ये कधीच व्यापार नाही केला मी … 

‘आत्ता बी मी तोट्यामंदी नाहीच, नफ्यामंदीच आहे…’ चष्म्या मागून डोळे मिचकावत ते बोलले. 

मागितलेल्या गोष्टीपेक्षा, पाचपटीने भरलेल्या बॉक्स कडे बघत ‘ हे कसं काय बुवा ?’ हा प्रश्न मला त्यांना विचारायचा होता…

माझ्या बावळट चेहऱ्यावर त्यांना तो दिसला असावा… ! 

‘छोटू, आपल्याकडच्या दुरेघी वह्या संपल्या का रे ?  शेजारच्या दुकानातून दहा डझन मागव आणि घाल या बॉक्समध्ये…. !’ हात झटकत ते बोलले. 

माझा बावळट चेहरा अजून तसाच असावा. 

नफा तोट्याचा त्यांनी मग उलगडा केला… 

‘डॉक्टर तुमी कितीबी नाय म्हणले तरी जास्तीचा सामान पाहून तुम्हाला आनंद होतो का नाही ? तो माझा नफा…. 

दहा पोरं नाही, आता तुम्ही 50 पोरांना सामान देऊ शकता, त्या पोरांना आनंद होतो की नाही…? तो माझा नफा…

कटारिया काका कोण ? हे पोरांना कधीच कळणार नाही… पण 50 पोरं शिकत आहेत,  याचा मला आनंद होणार का नाही ? तोच माझा नफा… 

जलमाला येऊन आपण कोणाच्या उपयोगी नाही पडलो, हा खरा तोटा… ! 

“तोटा” या शब्दावर जोर देत , डाव्या हाताच्या तळहातावर उजव्या हाताने त्यांनी जोरात टाळी मारली…! 

आपून तोट्यात धंदाच करत नाही सायेब, पक्का व्यापारी आहे मी …’

काउंटर वरच्या टेबलावर बोटांनी तबला वाजवत ते म्हणाले, ‘ए चाय सांगा रे डॉक्टरला…!’  

तोट्याची शेती करून, आनंदाची बाग फुलवत; नफ्याची फुलं वेचणाऱ्या या माणसापुढे मी मनोमन नतमस्तक झालो ! 

चहाचा घोट घेऊन मी त्यांना म्हणालो, ‘सर पण हे नुकसान किती आहे तुमचं, यात विनाकारण खर्च खूप आहे…’ 

ते पुन्हा हसत म्हणाले, ‘डॉक्टर पोरगं तुमचं असो, माझं असो किंवा आणखी कोणाचं असो, पोराच्या शिक्षणावर झालेला खर्च मी खर्च समजतच नाही, पोरांच्या शिक्षणासाठी केलेला खर्च हा भविष्यामध्ये भरभक्कम परतावा देणारी गुंतवणूक असते

गोरगरिबांची पोरं शिकतील तोच माझा परतावा… मंग खर्च झालाच कुठे ? 

आलतू फालतू स्कीम मध्ये अपुन पैसा गुतवतच नाही… सांगितलं ना ? पक्का व्यापारी आहे मी… ! 

मी खर्च केला नाही सायबा… फक्त गुंतवणूक केली… माझ्या पोरांवर गुंतवणूक केली… बघा भरभक्कम परतावा येणारच… 

“येणारच” म्हणताना पुन्हा डाव्या हाताच्या तळहातावर उजव्या हाताने त्यांनी जोरात टाळी मारली…! 

मी भारावून म्हणालो या अनाथ मुलांसाठी तुम्ही किती करत आहात… ? 

अनाथ कशानं हो… पालक म्हणून तुम्ही आहे…  मी आहे…. काय डॉक्टर तुम्ही सुद्धा…! 

‘चहा संपवा तो…’ म्हणत, टेबलावर पुन्हा त्यांनी हसत तबला वाजवला… 

तो तबला होता ? की माझ्या हृदयाची धडधड ?? माझं मलाच कळलं नाही…!

शर्टाच्या बाहीला डोळे पुसत कटारिया साहेबांची नजर चुकवत मी बाहेर पडलो !  

सर्व साहित्य घेऊन मी आलो… दहा ऐवजी 50 मुलांना ते वाटले… तरीही कुठेतरी अपराधीपणाची भावना होती. 

भावनेच्या भरात हा “वेडा माणूस” स्वतःचं खूप नुकसान करून घेत आहे, याची मला मनोमन जाणीव होती. 

– क्रमशः भाग पहिला

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments