डॉ अभिजीत सोनवणे
© doctorforbeggars
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ सुख म्हणजे नक्की काय असतं…??? ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
सोहम ट्रस्टचे हितचिंतक आणि माझे मित्र यांनी एके दिवशी व्हाट्सअप वर एका कुटुंबाची माहिती दिली आणि यांच्या संदर्भात काही करता यईल का ? असं विचारलं. दि 14 मे 2024 रोजी मी या कुटुंबाला भेटायला त्यांच्या घरी गेलो.
घर कसलं ? दोन इमारतींमध्ये एक मोकळी जागा… तिथे या कुटुंबाने संसार मांडला होता…!
एक चिमणा…एक चिमणी… चिमण्याची वृद्ध आई आणि चिमणा चिमणीची दोन लहान पिल्लं एवढा हा संसार…!
चिमणा धडधाकट होता, तो रिक्षा चालवायचा… बाहेर जाऊन, वृद्ध आई आणि लहान पिल्लांसाठी दाणे गोळा करून संध्याकाळी घरी परत यायचा….!
चिमणी सुद्धा चिमण्याला मदत करायची… तिच्या परीने संसाराला हातभार लावायची….
चिमण्याची वृद्ध आई घरट्यात दिवसभर एकटी असायची…. पिल्लं शाळेतून घरी आली की त्यांना पंखाखाली घेऊन गोष्टी सांगायची….
एकंदर सगळं कसं दृष्ट लागण्यासारखं चाललं होतं…. आणि एके दिवशी खरंच दृष्ट लागली…
काही वैद्यकीय परिस्थितीमुळे चिमण्याचा डावा पाय अक्षरशः खुब्यातून कापून काढावा लागला…
घरचा कर्ता पुरुष खाटेवर असहायपणे पडून होता… खंबीर नवऱ्याची असहाय्य अवस्था पाहून, खांबा आड लपून चिमणी मनसोक्त रडून घ्यायची…
चिमण्याच्या वृद्ध आईचा डावा डोळा पूर्ण निकामी, त्याही अवस्थेत ती पिलांना धीर द्यायची….होईल बाळांनो, सगळं व्यवस्थित काळजी नका करू, चला तुम्ही अभ्यासाला लागा….! ती धीर द्यायची.
अभ्यासाचं नाटक करत पिलंही मग पुस्तकाच्या आड लपून पोटभर रडून घ्यायची…
आपण खचलो नाही, हे नाटक दिवसभर म्हातारी उत्तम वठवायची…. पण रात्री सर्व सगळे झोपले की पाय तुटलेल्या पोराकडे पाहून हिला जोरात रडावसं वाटायचं…. पण रडायचीही चोरी…. कारण ती जर रडली तर बाकीचे सगळे तुटून जातील….!
मण्यांना जोडणारा आपण धागा आहोत…. हा धागा तुटला तर मणी निखळतील, याची म्हातारीला पुरेपूर जाणीव होती….
एक डोळा अधु …तरीही ही म्हातारी धडपडत चाचपडत दाराची कडी हळूच काढून घराबाहेर जायची… बाहेर रस्त्यावर एकही माणूस नसायचा….
बेवारस कुत्री, मांजरं, अगोदरपासूनच आकाशाकडे तोंड करून कोणालातरी ओरडून त्यांच्या भाषेत काहीतरी सांगत असायची… ही भाषा करुण असते….
म्हातारी मग त्यांच्याच आवाजात आवाज मिसळून त्यांच्यातलीच एक व्हायची…
जनावर आणि माणूस यांच्यात मग फरकच उरायचा नाही…!
दुःखाला जात पात धर्म लिंग काहीही नसतं…!
कुत्र्या मांजराच्या साथीने रडून घेऊन ती मन मोकळं करायची …. हळूच घरात येऊन चिमण्याच्या डोक्यातून हात फिरवायची… जिथून पाय तोडला आहे, त्या जखमांवरच्या पट्ट्यांवर खरबरीत हात फिरवायची…
वेदनेनं तळमळत असलेल्या चिमण्याला झोप तरी कशी यावी ? तो जागाच असायचा…
तो आईला विचारायचा , ‘आई इतक्या रात्री दिसत नसतानाही बाहेर कुठे गेली होतीस ??
‘अरे बाळा, आज दिवसभर नळाला पाणीच आलं नाही…. आता रात्री तरी पाणी येतंय का ? हे बघायला बाहेर नळावर गेले होते… तू झोप !’
तो इतक्या त्रासातही गालात हसायचा आणि विचारायचा, ‘नळाला पाणी येतंय की नाही, हे बघायला दोन तास लागतात आई ?’
‘अरे तसं नव्हे, आपल्या दारासमोर इतकी कुत्री मांजरं रडत होती… मलाही झोप येईना, मग बसले त्यांच्याच सोबत जरा वेळ….’
‘त्यांच्यासोबत तू सुद्धा रडत होतीस ना आई ? कुत्र्या मांजरांच्या आवाजाबरोबर मिसळलेला मला तुझा आवाज सुद्धा कळतो की गं आई …’
कापलेल्या पायाच्या वेदनेपेक्षा, डोक्यात उठलेली ही सणक जास्त वेदनादायी होती….!
म्हातारी तेवढ्यातून सुद्धा हसायचं नाटक करत म्हणायची, ‘मला मेलीला काय धाड भरली रडायला… भरल्या घरात ?’
एक डोळा नसलेल्या आजीचा, दुसरा डोळा मात्र यावेळी दगा द्यायचा… या दोघांचं संभाषण ऐकून…. तो स्वतःच पाणी पाणी व्हायचा …
आणि हेच पाणी मग चिमण्याच्या गालांवर अभिषेक करायचे…. म्हातारीच्या नकळत….!
चिमणा मग तोडलेल्या पायाच्या पट्ट्यांवर दोन्ही हात ठेवून वेदनेनं कळवळत आईला म्हणायचा, ‘आई बहुतेक नळाला पाणी आलंय बघ आत्ता…’
हो रे हो, म्हणत म्हातारी पुन्हा धडपडत घराबाहेर जायची आणि दोन तास घरात परत यायचीच नाही…!
दिवसभर थांबवून ठेवलेलं पाणी, आता मध्यरात्री कोसळायचं एखाद्या धबधब्यासारखं…!
घराबाहेर नळाला पाणी येत असेलही… नसेलही…. परंतु चिमण्याची उशी मात्र रोज सकाळी ओली चिंब भिजलेली असायची…. कशामुळे काही कळलं नाही बुवा !
हा मधला काळ गेला…. या काळामध्ये चिमणीने आणि वृद्ध आजीने घरटं सांभाळलं….
काही काळानंतर, हा सुद्धा जिद्दीने उठला…. म्हणाला, ‘फक्त डावाच पाय कापला आहे…. रिक्षा चालवायला अजून माझे दोन हात शिल्लक आहेत…. रिक्षाचे ब्रेक दाबायला उजवा पाय लागतो, तो ही माझ्याकडे शिल्लक आहे…. इतकं सगळं शिल्लक आहे, तर मग मी गमावलंच काय… ?
त्याच्या या वाक्यावर आख्य्या घरात चैतन्य पसरलं…!
याही परिस्थितीत काही काळ सुखाचा गेला…. पण, अशी काही परिस्थिती उद्भवली की त्याच्या चिमणीला गुडघ्याचे आजार उद्भवले आणि ती कायमची अपंग झाली….!
स्वतःचा पाय कापला जाताना जितका तो व्यथित झाला नसेल, तितका तो चिमणीला अपंग अवस्थेत पाहून व्यथित झाला…. कोलमडला…. !
एक पायाचा चिमणा आणि दोन्ही पाय असून नसलेली चिमणी…. दोघांच्याही डोक्यावर घरटं सांभाळण्याची जबाबदारी….!
नळाला पाणी आलंय का बघते म्हणत, म्हातारी मात्र रोज रात्र रात्रभर घराबाहेर राहू लागली…. उश्या भिजतच होत्या… पुस्तका आड दोन्ही पिलांचे डोळे सुजतच होते….
याही परिस्थितीत तो खचला नाही… नेहमी तो म्हणायचा, ‘माझे दोन हात आहेत आणि उजवा एक पाय आहे मी काहीही करू शकतो….!’
ज्यांच्याकडे सर्व काही आहे आणि तरीही ज्यांना काही करायचं नसतं, अशांसाठी ही चपराक आहे !
या सर्व अवस्थेत या जिद्दी कुटुंबाने परिस्थितीशी सामना केला…. जुळवून घेतलं….!
परंतु आता मात्र या परिस्थितीला सुद्धा खरोखर दृष्ट लागली….
चिमण्याच्या हाताला काहीतरी इन्फेक्शन झालं ….
ते वाढलं…. आणि डॉक्टरांनी उजवा हात कापावा लागेल असं सांगितलं….!
या वाक्याबरोबर मात्र पहिल्यांदाच चिमणा कोसळला आणि त्यानंतर म्हातारी….!
चिमणीला तर पायच नव्हते, ती खाटेवरच पडून होती…. म्हणून तिच्यावर कोसळायची वेळ आलीच नाही… पण आता मात्र ती पूर्णतः ढासळली….!
दोन्ही लहान पिलं आजीच्या थरथरत्या पंखाखाली निपचित पडली…. !
हीच ती वेळ…. माझ्या मित्राने मला सांगितले या कुटुंबासाठी काही करता येईल का ते बघ….
आणि म्हणून आज मी इथे होतो….!
गेले तीन तास मी इथे आहे…. आयुष्यातले चढ उतार रोज बघायची मला सवय आहे…
तरीही चिमणा चिमणी आणि म्हातारीच्या वेदना ऐकून…. एक फोन येतोय हं… असा बहाणा करत, मी किती वेळा घराबाहेर आलो असेन याची गणती नाही….!
इतक्या वेळा घराबाहेर आलो, पण म्हातारीच्या घराबाहेर मला कुठेही नळ मात्र दिसला नाही…. !
म्हातारीच्या मनातला तो नळ, मला किती वेळा भिजवून गेला…. कसं सांगू…?
शेवटी चिमण्याला आणि म्हातारीला हात जोडून म्हणालो, ‘आम्ही तुम्हाला काय मदत करू ?’
ते स्वाभिमानी कुटुंब यावेळी निःशब्द झालं… आणि मला माझीच लाज वाटली…. !
‘चिमण्या, जोपर्यंत तू “समर्थ” होत नाहीस तोपर्यंत किराणा भरून देऊ…?’ मी निर्लज्जपणे विचारलं.
‘नको माऊली’, चिमण्या अगोदर म्हातारी हात जोडत बोलली.
‘पोरांच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊ ?’
‘नको काका; आम्हाला दोघांनाही स्कॉलरशिप मिळते त्यात आमचं शिक्षण होतं…’ मोठी पोरगी चिवचिवली…
खाटेवर अगतिकपणे पडलेल्या ताईकडे मीच पाय तुटलेल्या माणसासारखा गेलो आणि तिला म्हणालो, ‘अगं ताई, तुझ्या उपचारांचा खर्च करूया का आपण…?’
ती म्हणाली, ‘नको दादा माझा सगळा उपचार ससून मध्ये सुरू आहे, तिथं काही पैसे लागत नाहीत… शिवाय ससून मध्ये एक समाजसेवी संस्था आहे ती आम्हाला मदत करते आहे….’
शेवटी पाय ओढत, चिमण्याकडे गेलो आणि म्हणालो, ‘अरे बाबा, तू तरी सांग, आम्ही कशी मदत करू तुम्हाला…?’
माझे जोडलेले हात हाती घेऊन डोळ्यात अश्रू आणून तो म्हणाला, ‘डॉक्टर, माझा उजवा हात कापला जाऊ नये इतकीच प्रार्थना करा…
‘मी परत रिक्षा चालवून माझं संपूर्ण कुटुंब पुन्हा चालवू शकेन, इतकीच प्रार्थना करा…’
‘मी आणि माझं कुटुंब कोणावर सुद्धा अवलंबून राहणार नाही इतकीच प्रार्थना करा…’
‘आणखीही काही दुःख मिळाली तर ती सहन करण्याची ताकद मला मिळो, इतकीच प्रार्थना करा….’
‘बस आणखी तुमच्याकडून दुसरं काहीही नको…!!!’
त्याने नमस्कारासाठी हात जोडले…
त्याच्या या वाक्यावर मला रहावलं नाही…. आपोआप त्याच्या खांद्यावर मी डोकं टेकवलं आणि माझा बांध फुटला…
त्याचा खांदा माझ्या अश्रूंनी भिजला….
या उपरही माझ्या खांद्यावर हात थोपटून तोच म्हणाला, ‘काळजी करू नका डॉक्टर… सगळं काही होईल व्यवस्थित…. !!!
कोण कोणाला मदत करत होतं …हेच कळत नव्हतं…!
यानंतर म्हातारी लगबगीने उठून बाहेर जायला निघाली…. अस्तित्वातच नसलेल्या नळाला पाणी येतंय की नाही, हे बघण्यासाठी म्हातारी कदाचित बाहेर गेली असावी… आता ती दोन तास येणार नाही, हे मला माहीत होतं….!!!
एका गरीब कुटुंबाला मदत करायला गेलेलो मी, तिथून बाहेर पडताना आज मीच खूप श्रीमंत झालो…
सुख म्हणजे नक्की काय असतं, हे मलाही आजच समजलं… !!!
(अत्यंत महत्त्वाची टीप : हे स्वाभिमानी कुटुंब स्वतःच्या तोंडाने काहीही मागत नसलं, तरी सुद्धा यांच्या घराला छप्पर नाही, फाटकी ताडपत्री आहे, येत्या पावसाळ्यात ही फाटकी ताडपत्री आणखी फाटून घराचा चिखल होणार आहे. घरात दोन अपंग व्यक्ती, वृद्ध आई आणि दोन लहान मुलं राहतात…. सबब या कुटुंबाने काहीही मागितले नाही तरी आपण त्यांच्या घराला पत्रे लावून देणार आहोत. बघू. त्याच्या घरून निघताना तो माझ्या खांद्यावर थोपटून म्हणाला होता, ‘डॉक्टर, काळजी करू नका, होईल सगळं व्यवस्थित…. त्याच्या याच शब्दांवर माझाही विश्वास आहे ….!!!)
© डॉ अभिजित सोनवणे
डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे
मो : 9822267357 ईमेल : [email protected],
वेबसाइट : www.sohamtrust.com
Facebook : SOHAM TRUST
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈