सुश्री नीता कुलकर्णी
☆ “तुळस माझी भाग्याची —…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆
सखु बरोबर वारीला पंढरपूरला जायची तुळशीबाईची तयारी सुरू झाली होती .
पितळेचे तुळशी वृंदावन लख्ख घासून घेतलं. हळदीकुंकू वाहून पूजा केली. हार, फुलं घातली.
“बोला पुंडलिक वरदे हारी विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ महाराज की जय “
अस म्हणून सखुनी तुळशी वृंदावन डोक्यावर घेतल.
हा सोहळा बागेतली सगळी झाडं कौतुकानी बघत होती.
” किती ग भाग्यवान दरवर्षी वारी घडते तुला “.
” ये गं बाई जाऊन…”
” विठुरायाला रुक्मिणी मातेला आमचा नमस्कार सांग”
असं म्हणून सगळ्या झाडांनी तिला हात जोडले.
” मी कुठली जाते ….सखुबाई दिवसभर मला डोक्यावर घेते म्हणून घडत बघा.येते आता…असं म्हणत निरोप घेऊन तुळशीबाई निघाली वारीला….
खरंच तिला मनातून फार आनंद व्हायचा .ती या दिवसाची वाट पाहत असायची .दिंडीत चालताना चिपळ्यांचा, टाळांचा, विणेचा नाद ऐकू यायचा…
अभंग ,गौळणी, हरिपाठ,ओव्या कानी पडायच्या.
साध्याभोळ्या फुगड्या खेळणाऱ्या बाया बघून तिला समाधान वाटायचं .आनंदाने ती हरखुन जायची.वरूणराजा बरसायचा..ते पाणी अंगावर पडलं की तिला कृतार्थ झालो अस वाटायच.
दिंडीत चालताना शेजारच्या बाईच्या डोक्यावर पांडुरंग रुक्मिणी होती. तेव्हा तर तिच्या रुक्मिणी मातेबरोबर गप्पा झाल्या होत्या….
त्या दिवशी दिवसभर ती आनंदात होती .
सुरेखसा मोठा हार गळ्यात पडायचा. त्याच ओझ सखुबाईला वाटायचं नाही. ती कौतुकाने तिच्याकडे बघायची. तुळशी बाईच्या डोळ्यातून दोन टिपं गळायची….
” किती प्रेम करतेस ग “..म्हणून सखूची आलाबला घ्यावी असं तिला वाटायचं.
मुक्कामी पोचल्यावर खाली ठेवलं तरी येता जाता वारकरी श्रद्धेनी वाकून नमस्कार करायचे. त्यांच्या गळ्यातल्या तुळशीच्या माळा बघून तिला संतोष वाटायचा.
लांबवर पालख्या दिसायच्या….
तो अनुपम सोहळा किती बघु आणि किती नको अस तीला वाटायच….. आपल्या भाग्याचा तीला साक्षात्कार व्हायचा. बाया जाता जाता म्हणत असलेलं कानी पडायचं.
“तुळसा बाईचा हिरवा हिरवा पाला
कसा बाई तिनी गोविंद वश केला”
तेव्हा डोळ्यासमोर श्रीकृष्णाच मोहक रूप दिसायच…
वारी पंढरपूरला चालली आहे …तुळशी बाईला डोक्यावर घेऊन निघालेल्या बाया बापड्यांचे मला अपार कौतुक वाटतं.
त्यांना माझा साष्टांग दंडवत.
त्यांच्यासाठी देवाला हात जोडून विनवते…
“वारीत वाहता तुम्ही डोक्यावर तुळस…
म्हणूनच दिसतो तुम्हा विठुरायाचा कळस…
रुक्मिणी मातेला करते नवस…
सुखी ठेव माझ्या या आया बहिणीस…
© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी
मो 9763631255
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈