सुश्री शिल्पा मैंदर्गी
☆ मनमंजुषेतून ☆ आषाढी एकादशीचे मागणे… सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆ प्रस्तुती – सौ.अंजली दिलीप गोखले ☆
सौ.अंजली दिलीप गोखले
(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)
☆
असा एक क्षण यावा
की जिथे मुक्तिचाही ध्यास संपावा.
असा एक क्षण यावा
की जिथे विठ्ठल आणि आपण
यात भेद नसावा.
असा एक क्षण यावा
की जिथे आत्मानंदालाही
आनंद व्हावा.
असा एक क्षण यावा की
ज्ञानोबांच्या नेत्रानी विठ्ठल पहावा.
असा एक क्षण यावा की
नामदेवांच्या किर्तनाने विठ्ठलाच्या
अस्तित्वाचा वेध घ्यावा.
असा एक क्षण यावा की
नाथांच्या भक्तिभावाने विठ्ठल
प्रसन्न करून घ्यावा.
असा एक क्षण यावा की
तुकोबांच्या भाबड्या भक्तिने
विठ्ठलास बंधनात बांधावा.
असा एक क्षण यावा की
जनाईसम संसाररूपी जात्यावर
धान्य दळताना परमार्थ रूपी
पिठाचा बोध घ्यावा.
असा एक क्षण यावा की
सावत्या सम भक्तिचा मळा
फुलविताना कसदार मनाचा
कस लागावा.
असा एक क्षण यावा की जळी
स्थळी पाषाणी
विठ्ठल सोहळ्याचा अनुभव घ्यावा.
असा एक क्षण यावा की
अज्ञानाच्या अंधारी
दिवा ज्ञानाचा लागावा.
असा एक क्षण यावा की
भक्तिचा मोगरा फुलावा
भक्तिचा मोगरा फुलावा.
☆
© सुश्री शिल्पा मैंदर्गी
दूरभाष ०२३३ २२२५२७५
प्रस्तुती : अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर 8482939011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈