प्रा.सौ. सुमती पवार

☆ मनमंजुषेतून : माझ्या खिडकीतून ☆ प्रा.सौ.सुमती पवार ☆

माझ्या खिडकीतून दिसतात

रात्री नक्षत्रे नि तारे

आणि दिवसा वाहत असतात

झुळूझुळू मंजुळ वारे ….

 

खरंच् …खिडकी…! कित्ती अर्थ आहेत हो ह्या शब्दाचे…मनाची खिडकी, जगाची खिडकी घराची खिडकी ,हृदयाची खिडकी … वा…वा..वा….! एकूणच खिडकी फार महत्वाची असते . खिडकी नव्हे ? खिडक्या नसतील तर…घराला अर्थच राहणार नाही, किंबहुना घराला घरपणच राहणार नाही…घर कसे कोंदट, उबट होऊन जाईल . दूषित वायु बाहेरच पडणार नाही .प्रणवायू मिळणार नाही , जीव गुदमरून जाईल .. खिडकी नसेल तर बाहेरचे जगच दिसत नाही. माणूस उठसूठ दारात जात नाही .. तो खिडकीत बसतो.तासं न् तास .. कोणाच्या बापाची भीती नाही !माझी खिडकी आहे…! वा….!

काय काय दिसते ह्या खिडकी तून..? अहो, अख्खे जग दिसते. नुसते खिडकीत बसले तरी अख्ख्या गल्लीची माहिती मिळते.कोण आले, कोण गेले ,कोण चालले , कुठे चालले, परत केंव्हा आले .. बाप रे….! रोज किती वाजता येतात ..जातात..एव्हढी माहिती फक्त खिडकीत बसून ….?

माझ्या घराच्या खिडकीत बसले की मला जग जिंकल्यासारखे वाटते….! पृथ्वी प्रदक्षिणा केल्यसारखे वाटते …. , घर बसल्या माझे मनोरंजन तर होतेच …व माझ्या हातून टेबला- वरील कागदांवर चांगले काही लिहूनही होते… बघा खिडकी किती महत्वाची आहे…!अख्ख्या घराचा कंट्रोल मी खिडकीतून बसल्या जागी करते ..वॅाच  ही ठेवते..! बसल्या जागेवरून… कळले का मंडळी खिडकीचे महत्व ? म्हणून मी माझ्या रूम मध्ये मोठ्या मोठ्या खिडक्या ठेवल्या आहेत …. शुद्ध हवा ,प्रकाश , मनोरंजन,लेखन ,वाचन, गाणी ऐकणे, पेपर वाचणे ,अऽऽऽऽऽऽऽबबबब !

खिडकी कित्ती कामाची

मनोरंजन करण्याची

येणारे नि जाणारे …

हसून त्यांना बघण्याची…..!

ह्या खिडकी मुळे माझ्या मनाची खिडकी सदैव उघडी ताजीतवानी असते.भरभरून उत्साह ही खिडकी मला देते….कसा…?

उठल्या बरोबर बघावे तर …छान दाट धुके ,शुभ्र धुके .. प्रसन्न धुके ,दुधा नि पारदर्शक धुके जणू माझी वाट पाहत असते….कधी खिडकीची काच बाजूला होईल नि मॅडम आम्हाला बघतील …असे जणू धुक्याला वाटते.. आणि मग …? मी बघताच धुके प्रसन्न हसते.

आळस पळतो . अनिमिष नेत्रंनी मी धुक्याकडे पाहत राहते … न जाणे दृष्टी आड झाले तर ….!

हरवले तर ..?त्याला मनसोक्त पाहून घ्यावे ,मनात साठवावे हो … अदृश्य झाले तर… म्हणून मग मी तिथेच झोपाळ्यावर ठाणं मांडत झुलत मनसोक्त त्याचा आस्वाद घेते.हळू हळू मनावरील पडदा दूर व्हावा तसे ते धुके अलगद हळू हळू काढता पाय घेते …विरत जाते…

नि मग …डोळे मिचकावत किरणांची स्वारी दंवबिंदूंना चिडवत ,चकाकत अळवावरच्या पानांवरून ओघळणाऱ्या दवांत चमकत  मिश्किलपणे हसत माझ्या खिडकीत समोरच्या टेकडीवर झाडांवर शेंड्यांवर वेलींवर किरणे  अवखळ पणे खेळू लागतात. पाने हसतात, फुले हसतात ,दंव हसते , गवत पाती डुलतात, वेली पुढे झुकतात,  हलतात ,अंग घासतात नि किरणे हळूहळू बालकाने लोळावे तशी पहुडतात , स्थिरावतात.

हे सारे दो नयनांनी तृप्त होत मी अनिमिष नेत्रांनी बघत असते. वा …! किती सुंदर सुंदर देणग्यांचा वर्षाव निसर्ग करतो आपल्यावर..!

धुके ,किरणे,पाने  ,फुले ,फुलपांखरे ,पक्षी,सारे समोर झाडांवर ,चराचरांवर आपल्या स्वागतासाठी हजर असतात . ..हसत असतात, डुलत असतात, ओसांडत असतात …आनंद घ्या म्हणत असतात…केवढी कृपा ! असीम…!

रात्री तर माझ्या खिडकीत चांदणीच अवतरते तिच्या साऱ्या गोतावळ्याला घेऊन… समोर टेकडीव नि:शब्द शांतता असते… झाडे काळोखात बुडून गुडूप शांत झोपी जातात, वारे स्वस्थ शांत होतात , पाने अंग मिटून स्तब्ध होतात ,पक्षी गप्पा मारून झोपी जातात….खिडकीतल्या चिकूवर मात्र वटवाघळे नि पाकोळ्या घिरट्या घालतात . वटवाघळे उलटी लटकून मुटूमुटू चिकू खातात , गर खातात …सालं खाली पडतात . सकाळी झाडाखाली मला ती दिसतात … समोर टेकडीवर मात्र डोळे फाडून पाहिले तरी काही दिसत नाही….

मला वाटते , दिवसभर माझी करमणूक करून सारी मंडळी थकली वाटतं .आता त्यांना विश्रांतीची गरज आहे.मग मी शहाण्या मुलीसारखी कुरकुर न करता आपल्या लेखन कार्यात रमून जाते ते थेट बारा साडेबारा पर्यंत ….. मला मुळी कंटाळाच येत नाही माझ्या भोवताली असलेल्या या साऱ्या मंडळींमुळे…. कारण आता एवढ्या रात्री सुद्धा मी ….. हो .. खिडकीतच असते ना? हसूआलं ना ?

अहो … आहेच माझी खिडकी गुणी ? जगाची खिडकी किती ही मोठी असो ..कुणीही असो मला त्याच्याशी देणे घेणे नसते .मी माझ्या खिडकीवर एकदम खूष  आहे…हो … माझी …खिडकी ….

कंटाळा न येऊ देणारी

साऱ्या जगाची खबर देणारी ..

कोण आलं कोण गेलं सांगणारी

माझ्याशी गप्पा मारणारी

मला आनंदात ठेवणारी…..

मला खूप काही देणारी…

अशी माझी खिडकी आपल्याला बघाविशी

वाटली तर …जरूर ….या …

खिडकी तुमची वाट पाहते आहे…

 

तिचा पत्ता…. सारंग बंगला वाघ गुरूजी शाळेसमोर नाशिक १३

येताय् ना मग… ?

 

© प्रा.सौ.सुमती पवार ,नाशिक

(९७६३६०५६४२)

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_printPrint
2.3 3 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments