सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

☆ मनमंजुषेतून ☆ विधुर (एक आत्मचिंतन) – भाग 2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆ 

नवरा बायकोच्या जोडी तली एकटी बायको राहिली तरी ती घरातल्या काहीना काही कामात रमू शकते. वेळ घालवू शकते. पण विधुर मात्र घरातल्या कामात लुडबूड करू शकत नाही. त्याची कुचंबणाच होते.हल्ली आम्ही जेष्ठ नागरिक असे काही मित्र कोपऱ्यावरच्या बागेत गप्पा मारायला जमतो. आणि वेळ चांगला जातो. पण अलीकडे कोणी ना कोणी गप्पा मारताना तोंड चालवायला काहीतरी आणत असतात. मी घरातल्यांना काही करायला न सांगता, बाहेरच्या बाहेर काहीतरी घेऊन जातो. आणि मग घरी जातानाही सर्वांना घेऊन जातो.

तू खरं तर किती उद्योग करत होतीस. इतकंच नाही तर पै पै करून पैसे साठवत होतीस. का तर म्हातारपणी औषध आणि दवाखान्याला किती लागतील कुणास ठाऊक?असं नेहमी म्हणायचीस. सुजय डॉक्टर  असूनही तुला अस का वाटत होतं काय माहित! सात आठ किलोमीटर अंतरावर त्याचा दवाखाना होता. मला जरा काही झालं की., तू त्याला फोन करून लगेच बोलवायचीस. एकदा त्यांनी तुला सांगितलं की “आई बारीक-सारीक साठी बोलवत जाऊ नको ग दवाखान्यात पेशंट थांबलेले असतात मग गोंधळ होतो” स्वाभिमानी होतीस तू. तब्बेतीसाठी पुन्हा नाही कधी त्याला फोन केलास तू. खरच तुला औषध, उपचार, दवाखाना, डॉक्टर कशाचीच गरज नाही कधी  लागली. झटकन सगळ्यांना सोडून निघून गेलीस. तुझे कष्टाचे पैसे आम्हालाच ठेवून गेलीस. सगळं सगळं आठवत बसतो. आणि बेचैन होतो ग! त्या पैशापेक्षा तू राहिली असतीस तर! पैशापेक्षा तुझी लाख-मोलाची किंमत आज तु नसताना मला पोखरून काढतीय. विधूर‌‌‌ म्हणून मी जीवन कंठतोय.

कितीतरी गोष्टी आठवत बसतो. कितीतरी निर्णयाच्या वेळी माझा नवरेपणाचा अहंकार जागृत व्हायचा. आणि सुनांसमोर लोकांसमोरही मी तुला मापात काढायचो. महिलामंडळासारख्या ठिकाणी अलीकडे कितीतरी स्पर्धांमध्ये तू बक्षीस मिळवून दाखवलीस. अभिनंदनाचा वर्षाव झाला. अभिमान सिनेमातल्या सारखा माझ्या अस्मितेला तडा गेला. तुझ कौतुकही लोकांना सांगायचो. पण ते सांगताना त्यातही कुठतरी मीपणा असायचाच. नवरे पणाचा अहंकार होता तो! एक गोष्ट माझ्या लक्षात यायला हवी होती,  की कोणासमोर तुला मी बोलायला नको होत. तीच गोष्ट एकटं  असताना सांगता आली असती.  तुला खरं तर माणसांची आवड होती. पण तरीही स्वतंत्र संसाराचीही इच्छा होती.पण ती कधीच पूर्ण झाली नाही. हल्ली कधीतरी जवळच्या संबंधातल्या कोणाकडेतरी कार्यक्रमाला जाण्याचा प्रसंग येतो.अनेक जण जोडी जोडीने आलेले पाहिले की माझ्या डाव्या बाजूच मोकळं अस्तित्व मला सलत रहात. सगळे तुझी आठवण काढून ते कौतुक करायला लागले की आठवणींचा कढ येतो. आणि त्या बेचैनीला शब्द नसतात.

छोटा सोन्या नातू आजोबांजवळ आला. आजोबांना भूतकाळातून वर्तमानात आणल त्यांनी. आजोबाना  म्हणाला “डोळे मिटा आजोबा. गंमत दाखवतो. आजोबांनी बंडोपंतानी डोळे मिटले. दोन मिनीटात  सोन्याने आजोबांच्या डोळ्यासमोर फोटो  धरला. आणि “आता उघडा डोळे”. आजीचा आणि तुमचा फोटो!  गंमत आहे की नाही ! हा फोटो मी तुम्हाला दाखवायला आणलाय. छान आहे ना? डोळ्याला थोडे कमी दिसत होते पण तरीही ते फोटो कडे पहात राहिले. अस्ताला निघालेल्या सूर्याचा एक सोनेरी तांबूस किरण फोटोवर पडला. आणि तिन्हीसांजातही तो फोटो त्यांना छान दिसला. आजोबांच्या बंडोपंतांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य उमटलं. फुलंल आणि खुलल.

समाप्त

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments