श्री मोहन निमोणकर 

??

☆ “बूट पॉलिशची डबी” – लेखक : श्री पराग गोडबोले  ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

नेहमीचीच व्यस्त संध्याकाळ, डोंबिवली स्थानकातली, बिन चेहऱ्याची. स्त्री पुरुषांची घरी लवकरात लवकर पोहोचण्यासाठी आटापिटा करणारी गर्दी. दिवसभराच्या श्रमाने थकलेले, घामेजलेले चेहेरे. मी ही  त्यांच्यातलाच एक. कल्याण दिशेकडल्या पुलावरून घरी जायच्या ओढीने, पाय ओढत निघालेला, पाठीवर लॅपटॉपची गोण घेतलेला पांढऱ्या सदऱ्यातला श्रमजीवी. असे असंख्य जीव सोबत चालत असलेले, माझ्यासारखेच श्रांत. आता लवकर रिक्षा मिळेल, का परत मोठ्या लांबलचक रांगेत जीव घुसमटत राहील या विवंचनेत. माझं एक बरं असतं. मी आपला चालत चालत थोडीफार खरेदी करत घरी जातो. रिक्षाच्या भानगडीत पडतच नाही कधी. तो नकार ही नको आणि ती अरेरावीही नको पैसे देऊन. विकतचं दुखणं नुसतं!!!

आज पण तसाच विचार करत जात असताना पुलाच्या कडेशी एक अंध विक्रेता दिसला. बूट पॉलिशच्या डब्या आणि ब्रश विकत असलेला. बऱ्याच दिवसांपासून एक पॉलिश ची डबी घेऊन घरच्या घरी बूट चमकवायचा मी विचार करत होतो. मागे पण असा प्रयत्न केला होता पण डबी आणायचो, एकदोनदा उत्साहात पॉलिश करायचो आणि मग मावळायचा उत्साह. डबी अडगळीत पडायची आणि मग नंतर कधीतरी परत वापर करावा म्हंटलं तर आतलं मलम  वाळून कडकोळ झालेलं असायचं. या वेळी मात्र खूप जाज्वल्य वगैरे निश्चय केला आणि त्या विक्रेत्यापाशी रेंगाळलो. 

या लोकांना कसं कळतं कोणास ठाऊक, पण मी उभा आहे समोर हे कळलं त्याला आणि काय हवंय विचारलं मला त्यानं . मी थोडा वाकलो त्याच्या समोर आणि म्हणालो काळं पॉलिश हवंय. त्याने हात लांब करून तपकिरी झाकणाची एक डबी उचलली आणि म्हणाला घ्या. मी म्हणालो, अहो ही तर तपकिरी आहे.  मला काळं हवंय पॉलिश. म्हणाला आत काळं पॉलिशच आहे. मी चक्रावलो. घरी तांदुळ लिहिलेल्या  डब्यात डाळ आणि डाळीच्या डब्यात पोहे हे ठाऊक होतं  पण इथेही तेच बघून जाम आश्चर्य वाटलं मला. मी म्हणालो नक्की ना? बेलाशक घेऊन जा म्हणाला. नसेल काळं तर नाव बदलेन!!

उघडून बघू का ? विश्वास नसेल तर बघा !! काय तो आत्मविश्वास !!! मी न उघडता डबी खिशात ठेवली. 

किती द्यायचे? ५० रुपये. मी नाही घासाघीस करत अशा विक्रेत्यांशी. सांगितलेली रक्कम देतो त्यांना आढेवेढे न घेता. QR code दिसतोय का बघितलं त्याच्या शेजारी. नव्हता दिसत. मी पाकीट काढलं आणि जांभळी, नवी १०० ची नोट दिली त्यांच्या हातात. चाचपली त्यानं आणि म्हणाला  साहेब आज अजून बोहनी नाही झाली. ५० नाहीयेत माझ्याकडे परत द्यायला. पंचाईत झाली आता. मी माझ्या पाकिटात ५० ची नोट किंवा सुट्ट्या नोटा आहेत का ते शोधलं, पण नव्हते. थांबलो दोन मिनिटं, पण कोणीच गिऱ्हाईक येत नव्हतं त्याच्याकडे. मी म्हणालो, जाऊद्या ठेवा तुम्ही ५० रुपये तुमच्याकडे, मी उद्या संध्याकाळी घेईन परत. 

अचानक तो म्हणाला उद्याचा काय भरोसा साहेब? मी असेन नसेन. कोणी पाह्यलंय ? तुमच्या पन्नास रुपयांचं ओझं नको मला डोक्यावर.  मी परत बघितलं त्याच्याकडे, गळ्यात तुळशीमाळ वगैरे नव्हती पण तत्व आणि स्वत्व तेच जाणवत होतं. डोळ्यातले नव्हे पण मनातले भाव वाचता येत होते त्याच्या, स्पष्ट. तिढा पडला होता. मी उपाय काढला. त्याला म्हणालो, तुम्ही शंभर ठेवा, मी दोन डब्या घेतो. उद्या संध्याकाळी एक परत करेन आणि उरलेले पन्नास घेऊन जाईन. 

हे ऐकल्यावर चेहरा खुलला त्याचा. चालेल म्हणाला. फक्त डबी उघडू नका. मी हो म्हणालो. एक संपवायची मारामार असताना दोन डब्या घेतल्या. त्याला विचारलं एक फोटो काढू का ? खुशाल काढा म्हणाला. मी कसा दिसतो ते मलातरी कुठे ठाऊक आहे…. मी भांबावून बघतच राहिलो त्याच्याकडे. गर्दीत कसाबसा त्याचा फोटो काढला आणि निघालो घराकडे. 

आज आठवडा झाला. मी रोज जातो त्याच्यासमोरून, त्याच्याकडे बघत आणि संभाषण आठवत. बूट पॉलिश विकणाऱ्या, डोळ्यांनी अंध पण मनाने डोळस असणाऱ्या त्याच्यातल्या प्रामाणिकपणाला प्रणाम करत, मनोमन.  ती डबी अजून तशीच आहे माझ्याकडे. नाही परत केली मी. वापरली जाणार नाही ती कदाचित माझ्याकडून, पण ठेऊन देईन एका आंधळ्याच्या डोळसपणाची आठवण म्हणून… 

आणि हो, सांगायचं राहिलंच, तपकिरी झाकणाच्या डबीत काळंच पॉलिश होतं !!! 

लेखक : श्री पराग गोडबोले.

प्रस्तुती : मोहन निमोणकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments