श्री सुनील शिरवाडकर
☆ प्रदक्षिणा… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆
यशला तर खरं म्हणजे इथे येण्याची इच्छाच नव्हती.काय तर म्हणे..हे गुरुजी तुला चांगला मार्ग दाखवतील.त्यांच्याकडे प्रत्येक समस्येवर उपाय आहे.तसं म्हटलं तर समस्या अशी नव्हतीच.तीशी उलटुन गेली.. अजुनही यशचं लग्न जमत नाही..ही बाबांच्या मते समस्या होती..यशच्या द्रुष्टीने नव्हती.
बाबांचा खुपचं आग्रह झाला म्हणून यश आता शिखरे गुरुजींकडे आला होता.बरोबर आणलेली कुंडली त्याने गुरुजींच्या समोर ठेवली.गुरुजींनी ती कुंडली बघितली. पंचांग उघडलं.. बाजुला असलेल्या पाटीवर पेन्सिलने काही तरी आकडेमोड केली..बराच वेळ विचार केल्यावर त्यांनी यशला सांगितलं..
“तुमच्या कॉलनीत गजानन महाराजांचं मंदिर आहे.तु गुरुवारी त्या मंदिरात जायचं.. दुर्वा फुलं वहायचं.. आणि अकरा प्रदक्षिणा घालायच्या.बघु..कसं लग्न जमत नाही ते.”
यशला ते काही पटलं नाही.त्याने तसं सांगितलं सुध्दा.गजानन महाराजांना.. किंवा कोणत्याही देवाला प्रदक्षिणा घातल्याने नक्की काय मिळते? पण मग गुरुजींनी त्याला समजावून सांगितले. त्यामुळे आपण देवाच्या सान्निध्यात अधिक काळ रहातो.एका जागी बसुन चिंतन करणे..हा एक मार्ग झाला.आणि प्रदक्षिणा घालणे हा दुसरा.प्रदक्षिणा घालण्याने एक गोष्ट मात्र हमखास होते..ती म्हणजे चालण्याचा व्यायाम.
मग शिखरे गुरुजींनी त्याला वेगवेगळ्या प्रदक्षिणांबद्द्ल माहिती द्यायला सुरुवात केली.मंदिर लहान असेल तर कमी वेळात प्रदक्षिणा होतात..मोठे असेल तर जास्त वेळ लागतो. त्रिंबकेश्वरला ब्रम्हगिरी पर्वत आहे.हा पर्वत म्हणजे साक्षात शिवाचे रुप.श्रावण महिन्यात या ब्रम्हगिरीलाच प्रदक्षिणा घालण्यासाठी लाखो भाविक येतात.ही प्रदक्षिणा पुर्ण करण्यासाठी साधारणपणे एक दिवस लागतोच.श्रावणसरी अंगावर झेलत..ओम नमः शिवाय चा जप करत शेतातून,नदितुन वाट काढत ही प्रदक्षिणा पुर्ण केली जाते. या प्रदक्षिणेने धार्मिक पुण्य किती मिळते हा वेगळा भाग.एक दिवस निसर्गाच्या सान्निध्यात रहाण्याचा आनंद मिळतो तो खरा महत्वाचा.
देवाला आपल्या उजव्या हाताला ठेऊन फेरी मारणं म्हणजे प्रदक्षिणा.याला कोणी फेरी म्हणतात..कोणी परिक्रमा म्हणतात..तर कोणी उजवी घालणं असंही म्हणतात.प्रदक्षिणा का घालायची?त्यांचं काय महत्त्व आहे? हे विषद करणारा एक संस्कृत श्लोक आहे.
यानि कानि च पापानी
जन्मांतर कृतानी च
तानि सर्वाणि नश्यन्तु
प्रदक्षिणे पदे पदे.
म्हणजे..
आमच्याकडुन कळत नकळत झालेली.. आणि पुर्व जन्मातील सर्व पापे या प्रदक्षिणा करता करता नष्ट होऊन जावो.
प्रदक्षिणा म्हटलं की आठवते ती नर्मदा परिक्रमा. एखाद्या नदीला संपुर्ण प्रदक्षिणा घालण्याची कल्पनाच अभिनव.मेघदुत या महाकाव्यात कवी कालिदासाने नर्मदा नदीचे वर्णन खुपच सुंदर केले आहे.तिची वळणे.. मध्ये मध्ये येणारे छोटे मोठे डोंगर .काठावर डुलणारी उंच उंच झाडे.. घनदाट अरण्ये हे सगळंच परिक्रमा करणार्यांना आकर्षुन घेतं.नदीच्या किनार्यावर असलेली गावे..मंदिरे..बदलत जाणारे समाज जीवन या सर्वांच्या सोबतीने वाटचाल करणं हा एक रोमांचकारी अनुभव आहे.
अलीकडे वाहनात बसुन नर्मदा परिक्रमा करण्याचं प्रमाण वाढलं आहे.पण शास्त्रशुद्ध पद्धतीने नर्मदा परिक्रमा करायची असेल तर त्यासाठी तीन वर्ष.. तीन महिने.. तेरा दिवसांचा कालावधी सांगितला आहे. परीक्रमेला बहुधा ओंकारेश्वर येथुन सुरुवात केली जाते.पण तसा नियम नाही.बाकी नियम मात्र भरपूर आहे.परीक्रमे दरम्यान नर्मदा नदीचे पात्र ओलांडून जाता येत नाही.सोबत फारसं सामान नसावं.सदावर्तात जेवण करावं.नाही तर पाच घरी भिक्षा मागावी.त्यात मिळालेल्या शिधा घेऊन तो रांधावा.मिळेल ते पाणी प्यावं.आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सतत ‘ओम नर्मदे हर..’ हा मंत्र जपावा.
नर्मदा परिक्रमा केल्यावर तेथील अनुभव अनेक जण शब्दबद्ध करतात.ते सर्वच वाचनीय असतात.जगन्नाथ कुंटे यांनी अनेक वेळा नर्मदा परिक्रमा केली.’नर्मदे हर हर’.. आणि ‘साधनामस्त’ या पुस्तकांमधून ते आपल्याला नर्मदा परिक्रमेच्या अद्भुत विश्वात घेऊन जातात.
यशला या निमित्ताने बरीच माहिती मिळाली.गुरुजींचं म्हणणं त्यांना पटलं.दर गुरुवारी तो मंदिरात जाऊ लागला.मनोभावे प्रदक्षिणा घालु लागला.मधल्या काळात त्यानं गजानन विजय ग्रंथाचे पारायण ही केलं.
आणि खरोखरच यशच्या सेवेला यश मिळालं. आज यशचा लग्न समारंभ साजरा होत होता.आताही तो प्रदक्षिणा घालत होता..ती म्हणजे सप्तपदी.हो..ती पण एक प्रदक्षिणाच..प्रज्वलित अग्नीभोवती..देवां.. ब्राम्हणांच्या साक्षीने घातलेल्या या सात फेर्यानंतर वैवाहिक जीवनाचा प्रारंभ होतो.गजानन महाराजांना घातलेल्या प्रदक्षिणेचं फळ आज त्याला सप्तपदीच्या प्रदक्षिणेच्या रुपाने मिळालं होतं.
© श्री सुनील शिरवाडकर
मो.९४२३९६८३०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈