सौ. गौरी गाडेकर
मनमंजुषेतून
☆ दोन अक्षरी मंत्र… – लेखिका : सुश्री मंगला खानोलकर ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆
अणुशक्ती नगर मधल्या माझ्या एका मैत्रिणीला दोन्ही मुलगेच होते.आम्हा सर्वांची मुलं एकत्रच लहानाची मोठी झाली. जेव्हा आमची मुलं काॅॅलेजातही जायला लागली तेव्हा आमच्या group मधली ती मैत्रीण आम्हाला म्हणाली की ‘ मला दोन्ही मुलगेच आहेत ग. कधीकधी ना मला, आज ना उद्या त्यांची लग्नं होऊन
घरी सुना येतील या विचाराची भीतीच वाटते. काय माहीत मला कशा सुना मिळतील….? हल्लीच्या मुलींच्या इतक्या गोष्टी ऐकतो ना आपण…. !’
आम्हाला तर तिचं बोलणं ऐकून हसूच आलं.आम्ही तिघी मैत्रिणी दोन दोन मुलीवाल्या होतो.आम्ही
म्हटलं की ‘ आम्ही मुलींच्या आयांनी घाबरायचं , त्यांना घर कसं मिळेल.. ? सासरची माणसं कशी असतील..म्हणून. तर तूच काय घाबरते आहेस… ?’ मग आम्ही सर्वांंनी तिची समजूतही
घातली आणि चेष्टाही केली. पण तिच्या मनात या विचाराने घर केलेलं होतंच.
एकदा आम्हाला आमच्या काॅलनीतल्या एक ओळखीच्या बाई भेटल्या.त्या आमच्यापेक्षा वयाने मोठ्या होत्या.त्यांना पण दोन्ही मुलगेच होते आणि त्यांची लग्नं झालेली होती.
त्यांच्याशी गप्पा मारताना माझी मैत्रीण त्यांना म्हणाली, ‘तुम्हाला दोन सुना आहेत. तुम्हाला टेन्शन नाही का येत त्यांच्याशी बोलताना किंंवा वागताना… ?’
त्यावर त्या म्हणाल्या, ‘ नाही हो. या मुली तशा चांगल्या असतात. फक्त त्यांच्या बाबतीत आपण काही पथ्यं पाळली ना , की काहीच प्रॉब्लेम येत नाही.मग सुनांचे आपल्याशी संबंध कायम गोडीगुलाबीचेच राहातात.
माझ्या मुलांची लग्नं ठरल्यानंतर लगेेचच, ‘घरात सून आली की तिच्याशी कसं वागायचं ‘ते मी ठरवून टाकलेलं होतं.
– – पहिली गोष्ट म्हणजे तिला कधीही कुठल्याही बाबतीत टोकायचं नाही…मुुळात तिच्याकडून फार
अपेक्षाच ठेवायच्या नाहीत..!
आता समजा मुलगा आणि सून अचानक बाहेर जायला निघाले, तर ‘कुठे जाता? कधी येणार.. ?जेवायला असणार का….. ?’ यातलं काहीही त्या दोघांना विचारायचं नाही… !
कधी मुलाने येऊन सांगितलं की ‘ ‘आज ‘ही’ office मधून येताना परस्पर माहेरी जाणार आहे राहायला..’
तर त्यावर ,’ किती तारखेला परत येणार… ?’असा प्रश्न विचारायचा नाही.किंवा ‘ तिनेच का नाही मला
सांगितलं.. ? तू मध्यस्थ कशाला हवास.. ? मी काय तिला नको म्हणणार होते का..?असलं
काहीही बोलायचं नाही. फक्त ”बरं !” एवढंच म्हणायचं.
जर मुलगा सून खरेदी करून आले आणि मुलगा म्हणाला की दुकानात नेमका सेल लागलेला होता.म्हणून हिने चपलांचे तीन जोड घेतले. तर, ‘चपलांचे चार जोड आधीचेच घरात पडले आहेत.आता हे कशाला हवे होते? आम्ही तर चपलांचा एकच जोड तुटेपर्यंत वापरायचो..!’ असं पुटपुटायचं सुद्धा नाही..काय
म्हणायचं.. ? ” हो का … बरं… !”
कधी सून म्हणाली की,’आई , आज माझ्या 5- 6 मैत्रिणी येणार आहेेत घरी. तेव्हा तुम्हालाआणि
बाबांंना आज संध्याकाळी TV वरच्या संंध्याकाळच्या serials नाही बघता येणार. मग तुमच्या खोलीतच बसून राहाण्यापेक्षा संध्याकाळी तुम्ही थोडावेळ गार्डनमधे जाल का..?म्हणजे तुम्हालाही कंटाळा येणार नाही आणि माझ्या मैत्रिणींनाही मोकळं वाटेल.’तर ह्यावर आपण काय म्हणायचं…..? ” बरं…!”
समजा त्या दोघांचा अचानक बाहेेर जेवायला जायचा बेत ठरला तर मुलगाच सांगेल तुम्हाला.’आई
आम्ही बाहेर जातोय.बाहेरून जेवूनच येऊ. तर ‘ अरे मग आधी सांगायला काय झालं होतं… ? बाईला चार पोळ्या कमीच करायला सांगितलं असतं ना ? आता सगळं अन्न उरणार. आणि उद्या आम्हाला सगळं शिळं खावं लागणार… !’ अशी कुरकुर करायची का…?छे …छे… !
मग आपण काय म्हणायचं..? ” बरं !”
आजकाल तर अगदी दिवसाआड Amazon मधून खरेदी केलेली parcels घरी येत असतात. मुलं
दिवसभर घरात नसतातच.तेव्हा आपणच ती घेऊन ठेवतो.पण ती अजिबात उघडायची नाहीत. संध्याकाळी सून घरी आल्यावर, कपाळावर अगदी एकही आठी न घालता, शांतपणे ‘ हे तुझं काय काय मागवलेलं आलंय बरं का ग ‘ असं म्हणून सगळं तिच्या ताब्यात द्यायचं.’एवढं काय काय मागवलं आहेस… ?’ असं ही विचारायला जायचं नाही.. आणि तिने दाखवलंच तर ”वा.. छान.. !”‘ म्हणायला देखील विसरायचं नाही.
अगदी, आपल्याला नातू किंवा नात झाल्यानंतर, पाच सहा महीन्यांनी कामावर हजर होताना जर सून म्हणाली की ‘आता रोज office ला जाताना मी बाळाला माझ्या आईकडेच सोडून जात जाईन आणि संध्याकाळी येताना घेऊन येत जाईन.’ तर अशा वेळी, तुुमच्यात अगदी बाळाला सांंभाळायची आवड आणि ताकद दोन्ही असली तरीदेखील फक्त एकच दोन अक्षरी मंत्र उच्चारायचा …!
सांंगा कोणता….? ” बsssरं…! “
‘फक्त हा एकच ‘मंत्र’ तुम्ही सदैव जपत राहिलात, तर मग तुमचं मुलाशी नि सुनेशी असलेलं नातं अगदी निश्चित छान राहील….!’
….खरंतर हा मंत्र मुलांच्या आणि मुलींच्या, दोन्ही आयांनी पक्का लक्षात ठेवणं आवश्यक आहे.
एकूणच मुलांच्या संसारात कोणतीच लुडबूड करायची नाही. की त्यांना सल्ले द्यायलाही जायचं
नाही…मग कित्ती सोपं होऊन जाईल ना सगळं….?
मात्र कायम हे लक्षात असू दे की कधीकधी,अगदी सोप्प्या वाटणा-या गोष्टीच सगळ्यात कठीण असतात
लेखिका : सुश्री मंगला खानोलकर
संग्राहिका – सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈