सुश्री शिल्पा मैंदर्गी
☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 16 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆
सौ.अंजली गोखले
(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)
आई-वडिलांच्या महती विषयी आपण सगळेच जाणून आहोत. त्यांचे आपल्यावर असलेले ऋण आपण वर्णूच शकत नाही. माझ्या बाबतीतही हेच खरे आहे. मी स्वतःला भाग्यवान समजते की असे आई-बाबा मला लाभले.
माझा जन्म झाल्यानंतर पहिल्या दोन महिन्यातच माझ्या चेहऱ्यावर ती प्रतिसाद न आल्याने आईच्या मनात शंकेची आणि काळजी ची पाल चुकचुकली. त्याच वेळी आजीने मात्र अचूक ओळखले आणि माझ्या दृष्टीमध्ये काहीतरी कमी आहे हे तिला जाणवले. त्यानुसार माझ्यावर योग्य ते उपचार सुरू झाले आणि माझी जास्तच काळजी घेतली जाऊ लागली.
मी जसजशी मोठी होऊ लागले, तोपर्यंत मला काहीच कधीच दिसणार नाही हे सत्य आई-बाबांना नक्की समजून चुकले होते. पण मला दृष्टी नाही म्हणजे मी काहीच करू शकणार नाही असा विचार न करता आईने मला असा विश्वास दिला की मी माझ्या बुद्धीच्या जोरावर आणि इतर अवयवांच्या सहाय्याने सर्वकाही करू शकेन. आपली मुलगी पूर्ण अंध असताना ही तिने मला उभारी दिलीआणि स्वावलंबी बनवले. त्यामुळे मी सर्वसामान्य मुलींसारखे वावरू लागले. मोठे होऊ लागले.
नृत्यांगना म्हणून माझी ओळख झाल्यानंतर कार्यक्रम ठिकठिकाणी होत असताना, ड्रेस अप करणे, हेअर स्टाईल करणे, उत्तम मेकअप करणे, निवडक योग्य असे दागिने घालणे, यामध्ये आई इतकी एक्सपोर्ट झाली की केवळ त्याच मुळे बाहेरून ब्युटीशियन बोलावून मेकअप करून घेण्याची मला गरजच भासली नाही आणि आज पर्यंत आमचे हेच रूटीन सुरू आहे.
जशी आईनं मला साथ दिली तशीच शाळेच्या बाबतीत, अभ्यासामध्ये, नृत्य कलेमध्ये, बाबांनी मला योग्य मार्गदर्शन केले. माझ्या शिक्षणावर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवले. इतकं की मला एक प्रसंग आठवतो. बाबांची शाळा बारा ते साडेपाच होती. काम जबाबदारीचे होते. शाळेत इन्स्पेक्शन चालू होती आणि माझा नृत्याचा क्लास पाच ते सहा या वेळात होता. मधल्या वेळात वेळ काढून मला क्लासमध्ये सोडण्यासाठी बाबा आले आणि त्यांच्या त्यांच्या वेळी साहेबांपुढे फाईलही हजर केली. खरच किती अवघड होते हे काम.
अशा तऱ्हेने समाजातील इतर दिव्यांग मुलांच्या पालकांसमोर माझ्या आई-बाबांनी आदर्श घालून दिला असे म्हंटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही.
…. क्रमशः
© सुश्री शिल्पा मैंदर्गी
दूरभाष ०२३३ २२२५२७५
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈