सुश्री नीता कुलकर्णी
☆ “कवितांचा पाऊस…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆
गॅलरीत बसले होते पावसाची एक सर आली….. ती ओसरली तोच दुसरी आली….
आणि मला संदीप खरेची कविता आठवली ….
दूरदूर नभपार डोंगराच्या माथ्यावर
निळे निळे गार गार पावसाचे घरदार
… त्यांच्या इतरही कविता आठवायला लागल्या.
संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांचा ‘ आयुष्यावर बोलू काही ‘ हा कार्यक्रम ऐकायला गेलो होतो. त्यातल्या सगळ्याच गाण्यांनी तेव्हा वेड लावलं होतं…. असंख्य वेळा ऐकून ती गाणी पाठ झाली होती…त्या कवितांच्या गाण्यांनी तेव्हा मनावर गारुड केलं होतं….. सहज सोपे शब्द…. चाल …आवाज…. वास्तव सांगणाऱ्या पण गर्भित अर्थाच्या कविता… दोघांचे ट्युनिंग सगळं काही जमून आलं होतं… प्रेक्षागृह गच्च भरलेलं.. त्यांनी सुरुवात केली की सगळ्यांची त्यांना साथ….. एक सुरात सगळे म्हणायला लागत होते…आनंद मजा गम्मत चालली होती….वातावरण भारलेलं…
आणि अचानक त्यांनी सुरू केलं ……
नसतेस घरी तू जेव्हा..
जीव तुटका तुटका होतो
जगण्याचे विरती धागे
संसार फाटका होतो….
.. .. आणि एकदम सगळे स्तब्ध झाले .. तन्मयतेनी शांतपणे ऐकायला लागले.. ती कविता एका वेगळ्याच उंचीवर गेली…..अशीही दाद…
तव मिठीत विरघळणाऱ्या
मज स्मरती लाघव वेळा…..
.. .. .. काय शब्द आहेत ना…..
आज एका कवितेचं निमित्त झालं आणि अनेक कविता आठवायला लागल्या ….
मला आवडणाऱ्या कवितांची माझी डायरी आहे. ती काढली आणि कितीतरी वेळ त्यातच रमून गेले….
मनाला भिडणाऱ्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या कविता….
गालातल्या गालात हसवणाऱ्या…
काही फसव्या…
वरवर साध्या वाटणाऱ्या पण गहन खोल अर्थ असणाऱ्या….
तर काही मनाला अलवार स्पर्शून जाणाऱ्या…
मग .. .. डायरीत न लिहिलेल्या कविताही आठवायला लागल्या…
कवी खरंच मनाचे जादूगारच असतात… भावना ओळखून असं लिहितात की वाटतं यांना कसं आपलं मन कळलं…
म्हणूनच कवी सांगत असावेत….
शब्द असू दे हातामध्ये काठी म्हणूनी
वाट आंधळी प्रवास खडतर बोलू काही….
अनेक कविता वाचत गेले आणि जीव वेडावूनच गेला… कोणाकोणाची नावं घेऊ?
या साऱ्या दिग्गजांना माझा मनोमन शिरसाष्टांग नमस्कार….
तुम्ही आमच आयुष्य फार समृद्ध केलतं…..
झाले हवेचेच दही…
या कवितेत बा. भ.बोरकर म्हणतात .. ..
लक्ष आचळांनी दुभे निळी आकाशाची गाय होतेय
भिजणाऱ्या तृप्तीवर दाटे संतोषाची साय…
तसंच अनेक कवींनी आपल्याला त्यांच्या कवितांनी भिजवून तृप्त केलेल आहे….
कवींच्या आठवणींनी मन भरून आले आहे…
पुलं आणि सुनीताबाई यांचा मुंबईला बघितलेला कवितांचा कार्यक्रम आज आठवतो आहे…..
त्यांच्या शब्दातून कविता साक्षात समोर उभी राहत असे…. तो एक दृकश्राव्य कार्यक्रम होता..
किती आनंद आहे त्या अनमोल क्षणांचा ….
…… कुठल्या कुठल्या आठवणी जाग्या व्हायला लागल्या….
संदीप खरे म्हणतो तसं
आताशा असे हे मला काय होते
कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते
बरा बोलता बोलता स्तब्ध होतो
तशी शांतता शून्य शब्दात येते…
☆
© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी
मो 9763631255
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈