पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

☆ ‘‘सोनपाखरे टिपावी किती वाकूनी वाकूनी…’’ भाग – १ ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

इंदिराबाई

२६ जानेवारी २००१ ला ‘पद्मश्री’ मिळाल्याची बातमी आली आणि सर्वात प्रथम आठवण आली ती आदरणीय इंदिराबाई आणि कुसुमाग्रज यांची ! वास्तविक पाहता माझं आणि इंदिराबाईंचं नातं काय? या नात्यानं मला काय दिलं? गर्भरेशमी कवितेचा ध्यास, गर्भरेशमी कवितेचा नाद… त्यांनी मला जो कवितेचा ‘राजमार्ग’ दाखवला त्या वाटेवर बकुळ, प्राजक्त आणि सोनचाफ्याचा सडाच अंथरला होता. या वाटेवरून जाताना सुगंधच सुगंध होता. मला त्यांच्या कवितांनी अक्षरश: वेढून टाकलं, मोहून टाकलं आणि त्यांच्याच कवितेच्या ओळी आठवल्या….

‘केव्हा कसा येतो वारा,

जातो अंगाला वेढून

अंग उरते न अंग,

जाते अत्तर होऊन…’

असं अंग अत्तर अत्तर होऊन गेल्यावर, आणखीन जीवनात आनंद तो अजून कुठला?

इंदिराबाई आज आपल्यात नाहीत यावर माझा विश्वासच नाही. त्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर, अगदी कुठलीही लहानसहान गोष्ट करताना त्या, सतत सखीसारख्या माझ्या सोबतच असतात. त्यांची कविता गाताना तर त्यांचं ‘चैतन्य’ माझ्या रक्तारक्तातून वाहत असतं.

‘होऊन माझ्यातून निराळी,

मीच घेतसे रूप निराळे.

तुझ्या संगती सदा राहते,

अनुभविते ते सुखचि आगळे

तुझ्यासवे मी विहरत फिरते,

चंचल संध्यारंगामधुनी

तुझ्यासवे अंगावर घेते,

नक्षत्रांचे गुलाबपाणी!’…

या नक्षत्रांच्या गुलाबपाण्यात माझे सूर चिंब भिजून जातात आणि,

“होकर मुझही से निराली,  लेती हूँ मै रूप निराला

तेरे संग सदा रहती हूँ,

अनुभव करती सुख अलबेला”

या संपूर्ण कवितेचा भावानुवाद मला हिंदीत सहज सुचतो नि ‘माझी न मी राहिले’ अशी अवस्था होऊन जाते. 

१३ जुलैला इंदिराबाईंच्या निधनाची वार्ता ऐकली आणि,

‘एक तुझी आठवण,

वीज येते सळाळून

आणि माझी मनवेल,

कोसळते थरारून…’

अशी माझ्या मनाची अवस्था झाली आणि गेल्या ५-६ वर्षांचा काळ डोळ्यांसमोर सरसर उलगडत गेला. ६ वर्षांपूर्वी इंदिराबाईंना कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे अत्यंत मानाचा समजला जाणारा ‘जनस्थान पुरस्कार’ दिला गेला. त्या समारंभाची सांगता मी त्यांच्याच ‘रक्तामध्ये ओढ मातीची’ आणि ‘कधी कुठे न भेटणार’ अशा दोन कवितांनी केली होती. कार्यक्रम संपल्या संपल्या आदरणीय तात्यासाहेबांच्या (कुसुमाग्रजांच्या) आज्ञेवरून ‘रंगबावरा श्रावण’ व ‘घर नाचले नाचले’ (निवड कुसुमाग्रजांची भाग १ व २) अशा इंदिराबाई, कुसुमाग्रज व शंकर रामाणींच्या कवितांच्या कॅसेट्सची हळूहळू तयारी सुरू झाली. त्यानिमित्तानं कवितांचं वाचन सुरू झालं. जर एखाद्या बाईला खानदानी, भरजरी साड्या एकानंतर एक उलगडून दाखवल्या तर ‘ही निवडू का ती निवडू…’ अशी तिची स्थिती होईल, अशीच या कवितांच्या बाबतीत माझीही स्थिती झाली. इंदिराबाईंच्या शब्दात सांगायचं म्हणजे, … 

‘कुणी ठेविले भरून, शब्दाशब्दांचे रांजण

छंद लागला बाळाला, घेतो एकेक त्यातून…’

अशा त्याच्या शब्दासाठी, माझी उघडी ओंजळ

शब्द शब्द साठविते, जसे मेघांना आभाळ… 

असंच झालं.

२३ ऑगस्ट १९९७ रोजी तात्यासाहेबांच्या सूचनेवरून इंदिराबाईंच्याच गावी, त्यांच्या प्रती आदर व्यक्त करण्याकरीता बेळगावला प्रकाशन सोहळा करायचे ठरवले. त्या दिवशी दुपारी दूरदर्शन, चॅनलवाली मंडळी इंदिराबाईंची प्रतिक्रिया विचारत होती. इतकं थोर व्यक्तिमत्त्व, पण हातचं न राखता इंदिराबाई अगदी सहजपणे म्हणाल्या, “आज माझ्या आयुष्यातला सोन्याचा दिवस आहे! माझ्या कविता आज पद्मजाच्या गळ्यातून फोटो काढल्यासारख्या चित्रमय होऊन, जिवंत होऊन रसिकांसमोर येत आहेत. माझी कविता फक्त पद्मजाच गाऊ शकते. तीच फक्त तिचं कवितापण जपू शकते!” प्रत्यक्ष साहित्यसम्राज्ञी, काव्यसम्राज्ञी, मायमराठी माऊलीने दिलेला फार मोठा आशीर्वाद होता तो माझ्यासाठी!

अक्कांच्या प्रेमाखातर अत्यंत उत्साहाने, या सोहळ्यासाठी सिंहाचा वाटा उचलणारे ‘तरुण भारत’ बेळगांवचे संपादक श्री. किरण ठाकूर, साहित्यिक व न्यायमूर्ती डॉ. नरेंद्र चपळगांवकर, देशदूतचे संपादक श्री. शशिकांत टेंबे, ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ, महाराष्ट्र टाइम्सचे कार्यकारी संपादक अशोक जैन, प्रख्यात लेखिका डॉ. श्रीमती अरुणा ढेरे तसेच बेळगांवचेच थोर कविवर्य शंकर रामाणी वगैरे सारी मंडळी अगत्याने आली होती. तुफानी पावसातही सभागृह श्रोत्यांनी ओसंडले होते. या सर्व कॅसेट्सचे प्रायोजक नाशिकच्या भालचंद्र दातार आणि परिवाराने नेटाने झटून हा सोहळा एखाद्या लग्नसमारंभापेक्षाही नेत्रसुखद आणि संपन्न करायचा घाट घातला होता. प्रत्येकाला वाटलेल्या सोनचाफ्यांच्या फुलांचा ‘मंद सोनेरी सुगंध’ हॉलभर दरवळत होता. सोनचाफी रंगाची साडी परिधान केलेल्या इंदिराबाईंचे, फुलांनी सजवलेल्या एका कमानीखालून स्टेजवर आगमन होत असताना त्यांचीच कविता  

‘दारा बांधता तोरण, घर नाचले नाचले

आज येणार अंगणी, सोनचाफ्याची पाऊले..’

असं मी म्हणत असताना, इंदिराबाईंवर पुष्पवृष्टी झाली आणि त्यावेळी छप्पर फाडून टाकणाऱ्या टाळ्यांच्या  कडकडाटात त्यांचं स्वागत झालं. कविवर्य ग्रेस यांनी या प्रसंगाचं वर्णन म्हणजे, “जगात कुठल्याही कवीचा याहून मोठा आणि योग्य सत्कार तो काय असू शकतो? मीरेची एकट, एकाकी विरह वेदना, मराठीत अस्सल आत्मतत्त्वाच्या करांगुलीवर जर कुणी तोलून धरली असेल तर ती या इंदिराबाईंनीच! त्या कविता तुम्ही गायलात पद्मजाबाई, त्या ऐकताना खरंच सांगू का तुम्हाला! मीराच ज्यावेळी आपल्या सखीच्या कानात गुणगुणत सांगते आपल्या वेदनेचे स्वरूप…

दुखियारी प्रेमरी, दुखडा रोमूल

हिलमिल बात बनावत मोसो

हिवडवामे (हृदयात) लगता है सूल… इंदिराबाईंच्या वेदनेचा हा काटा तुमच्या गळ्याला गायिका म्हणून नक्कीच झोंबला असणार….!”

इंदिराबाईंच्या ‘रंग बावरा श्रावण’ कॅसेट प्रकाशन सोहळ्यासाठी मुंबईहून निघताना इंदिराबाईंच्या सख्ख्या मैत्रिणीने, आदरणीय दुर्गाबाई भागवतांनी माझ्याजवळ इंदिराबाईंसाठी पत्रातून शुभेच्छा दिल्या. 

“लाडके इंदिरे, तुझा सोहळा शानदार होणार आणि तो अनुपम व्हावा हीच माझी इच्छा आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद गौरवण्यापेक्षा, हा खऱ्या रसिक चाहत्यांचा मेळावा कितीतरी भव्य आणि तुझ्या काव्यावर लुब्ध असलेला आहे. मी शरीराने त्यात नसले, तरी मनाने त्यात आहे बरं का!” – तुझी दुर्गाबाई.

– क्रमशः भाग पहिला 

©  पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments