पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर
मनमंजुषेतून
☆ ‘‘सोनपाखरे टिपावी किती वाकूनी वाकूनी…’’ भाग – २ ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆
इंदिराबाई
(“लाडके इंदिरे, तुझा सोहळा शानदार होणार आणि तो अनुपम व्हावा हीच माझी इच्छा आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद गौरवण्यापेक्षा, हा खऱ्या रसिक चाहत्यांचा मेळावा कितीतरी भव्य आणि तुझ्या काव्यावर लुब्ध असलेला आहे. मी शरीराने त्यात नसले, तरी मनाने त्यात आहे बरं का!” तुझी दुर्गाबाई.) – इथून पुढे
इंदिराबाईंना साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद न मिळाल्याची खंत मात्र या प्रिय मैत्रिणीच्या पत्रात जाणवते. तसंच इंदिराबाईंनाही दुर्गाबाई म्हणजे त्यांच्या साहित्याचा आधार वाटतात. दोघीही मनस्वी, प्रखर स्वाभिमानी आणि विदुषी असल्या तरी दोघींचं एकमेकींवर जबरदस्त प्रेम! एकमेकींविषयी आदर आणि ओढ पाहून मला अनेकदा डॉ. आनंदीबाई जोशी आणि पंडिता रमाबाई आठवतात. अशा या इंदिराबाई आणि दुर्गाबाईंच्या पत्रांचे ‘पोस्टमन’ होण्याचे भाग्य मला लाभले!
इंदिराबाई म्हणतात, “सर्वसामान्य लोकांच्या भावनांना स्पर्श करण्याचं सामर्थ्य ज्याप्रमाणे माझ्या कवितेत नाही, त्याप्रमाणे ते माझ्या वाचनातही नाही. माझ्या कवितेची लोकप्रियता ही विशिष्ट लोकांपुरतीच आहे.” हे वाचून ‘जो संग तुझपे गिरे, और जख्म आये मुझे’ अशी माझी अवस्था झाली. आता तर माझा सर्वतोपरी हट्ट असतो की, प्रत्येक कार्यक्रमातून इंदिराबाईंच्या काव्यरत्नांचे हार पेटीत केवळ जपून न ठेवता, जास्तीत जास्त (अ)सामान्य रसिकांसमोर उलगडून दाखवावेत. हा माझा खारीचा प्रयत्न जरी असला तरी तो (सर्व)सामान्यांचेही हृदय पाझरवणारा आहे, हे मी प्रत्यक्ष मैफिलीत अनेकदा अनुभवले आहे.
कुणी निंदावे त्याला, करावा मी नमस्कार
कुणी धरावा दुरावा, त्याचा करावा मी सत्कार!
असे साधेसुधे सूत्र घेऊन जगणाऱ्या इंदिराबाईंच्या कविता म्हणजे तरलता, निसर्गरम्यता आणि भावनांनी ओथंबलेल्या तरल कवितांचा मोरपिशी स्पर्श! भावनांचे हळवे प्रकटीकरण म्हणजे इंदिराबाईंची लेखणी!
इंदिराबाईंची कुठलीही कविता वाचताना चित्ररूप डोळ्यासमोर येते, ही तिची ताकद आहे. त्यांची ‘बाळ उतरे अंगणी’ म्हणताना तर दुडुदुडु धावणारं गोंडस बाळ डोळ्यासमोर येतं. अक्कांचं खास वैशिष्ट्य म्हणजे निसर्गातील कुठल्याही अजीव वस्तूतसुद्धा अक्कांना चैतन्य दिसतं. त्यात बाळाच्या पायाला स्पर्श करणारी ‘मऊशार काळी मखमली माती’ आणि ‘चिमुकल्या अंगणाची बाळाभोवती राखण’ म्हणताना सजीव होऊन माती आणि अंगण बाळाभोवती प्रेमाची पखरण करतात असं जाणवतं.
‘किती दिवस मी मानीत होते,
ह्या दगडापरी व्हावे जीवन
पडो ऊन वा पाऊस त्यावर,
थिजलेले अवघे संवेदन
दगडालाही चुकले नाही,
चुकले नाही चढते त्यावर
शेवाळाचे जुलमी गोंदण,
चुकले नाही केविलवाणे
दगडफुलाचे त्यास प्रसाधन!’
दगडासारख्या निर्जीव गोष्टींमधेही सजीवपणा जाणवणारं किती संवेदनशील मन असेल अक्कांचं! गंमत म्हणजे ‘वंशकुसुम’ हा कवितासंग्रह तर पारिजातकाच्या फुलाला वाहिलाय त्यांनी!
‘काय बाई सांगू कथा, क्षण विसावा भेटतो,
गुलबाशीच्या फुलासंगे, पुन्हा दीस उगवतो..
काय बाई सांगू कथा, पाणी आणून डोळ्यात
एवढेच बोलली ती, घागरीला हात देत…’
या कवितेत तमाम ‘स्त्री’जातीची कथाच (नव्हे व्यथाच) अवघ्या चार ओळीत वर्णिलेली आहे. ‘अल्पाक्षरी’ कवितेत इंदिराबाई वैश्विक सत्य अगदी सहजपणे सांगून जातात.
‘दारा बांधता तोरण घर नाचले नाचले
आज येणार अंगणी सोनचाफ्याची पाऊले…
सूर्यकिरण म्हणाले, घालू दारात रांगोळी
शिंपू पायावरी दव, म्हणे वरून पागोळी…!’
अशा कविता म्हणजे अक्का आणि निसर्ग अशी नात्याची सुंदर गुंफण आहे. त्यांची प्रत्येक कविता, एखादं फुलपाखरू जसं अलगद फुलावर बसावं तशी, किंवा एखाद्या दवबिंदूप्रमाणे तरल आहे. दवबिंदूला जसे स्पर्श करतानाच, तो फुटून जाईल की काय, या भीतीनं या कवितेतील कवितापण जपायचा मी प्रयत्न करते, कारण प्रत्येक कविता ही त्या कवीचं ‘बाळच’ असते.
‘कसे केव्हा कलंडते, माझ्या मनाचे आभाळ
दिवसाच्या राखेमध्ये, उभी तुळस वेल्हाळ!’
यातील ‘तुळस वेल्हाळ’ म्हणजे अक्कांचा ऑटोग्राफच किंवा सहीच जणू! अक्कांची
‘किती उशिरा ही ठेच, किती उशिरा ही जाण
आता आजपासूनिया माझे, आभाळाचे मन’
ही आत्मस्पर्शी, आत्मभान असलेली कविता वाचून तर माझ्या डोळ्यात पाणी तरळलं. प्रत्येकानं आभाळाचं मन ल्यायचं ठरवलं, तर या धर्तीवर केवळ आनंदच उरेल नाही?
इंदिराबाईंच्या शांत, सौम्य स्वभावाचा आणखी एक वेगळा पैलू त्यांच्या प्रारब्ध या कवितेत जाणवतो. प्रारब्धालाही ठणकावून सांगणाऱ्या व प्रसंगी मन कठोर करणाऱ्या अक्का म्हणतात,
‘प्रारब्धा रे तुझे माझे,
नाते अटीचे तटीचे
हारजीत तोलण्याचे,
पारध्याचे सावजाचे…
जिद्द माझीही अशीच,
नाही लवलेली मान,
जरी फाटला पदर,
तुझे झेलते मी दान…
काळोखते भोवताली
जीव येतो उन्मळून,
तरी ओठातून नाही,
*_ तुला शरण शरण…!’_*
ही कविता कठीण प्रसंगी ताठ मानेनं उभ राहण्याचं बळ देते. तसंच, पती ना.मा. संत गेल्यावर लिहिलेली,
‘कधी कुठे न भेटणार,
कधी काही बोलणार
कधी कधी न अक्षरात,
मन माझे ओवणार
व्रत कठोर हे असेच,
हे असेच चालणार…’
यात अक्कांचं, सात्विक, सोज्वळ, तेजस्वी, ओजस्वी आणि निश्चयी व्यक्तिमत्त्व दिसून येतं. “चाकूने किंवा सुरीच्या टोकाने मनगटावर घाव करावेत आणि त्यातून आलेल्या रक्ताच्या थेंबाकडे बघत रहावं, तशा या माझ्या कविता आहेत.” अशी प्रतिक्रिया स्वतःच्या कवितेकडे पाहताना फक्त इंदिराबाईच लिहू शकतात.
‘मराठी काव्याला पडलेली एक सुंदर मोरस्पर्शी निळाई’ असं कवयित्री शांताबाई शेळके इंदिराबाईंबद्दल म्हणतात, तेव्हा मी अक्कांच्या निळाईत बुडून जाते आणि वाटतं…..
किती तुला आठवावे, किती तुला साठवावे,
जिवाभावा एक ध्यास, एकरूप व्हावे व्हावे!
सूर्याचे तेजःकण आणि चंद्राची शीतलता त्यांच्या लेखनात आहे. चंद्रसूर्याची साथ आपल्याला आयुष्याच्या अंतापर्यंत आहे, तशीच साथ मला इंदिराबाईंच्या तेज, रंग, रूप, गंध ल्यालेल्या कवितेची आहे. सोनचाफ्याच्या पावलांनी माझ्या घरी आलेल्या त्यांच्या कविता म्हणजे आनंदी पाखरंच आहेत! म्हणूनच इंदिराबाईंच्याच शब्दांत म्हणावसं वाटतं…..
गेली निघून हासत, घर भरले खुणांनी
सोनपाखरे टिपावी, किती वाकूनी वाकूनी…!
— समाप्त —
© पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈