☆ मनमंजुषेतून ☆ महापंचमी रथोत्सव सोहळा ☆ सौ. अर्चना देशपांडे ☆
आई जगदंबेचे एक रूप म्हणजे गोव्यातील कवळे येथील श्री शांतादुर्गा देवी.
देवीचे मंदीर सुंदर व भव्य असून पोर्तुगीज व भारतीय स्थापत्य रचनेचे उत्तम उदाहरण आहे.
देवालयाच्या गाभाऱ्यात शांतादुर्गा देवीची मनमोहक आणि तेजस्वी मूर्ती आहे. शंकर आणि विष्णू यांचे भांडण मिटवून दुर्गेने त्यांना शांत केले म्हणून तिचे नाव शांतादुर्गा पडले.
शांतादुर्गा देवी संस्थानाचा वार्षिक जत्रा महोत्सव माघ शुद्ध प्रतिपदा ते माघ शुद्ध अष्टमी पर्यंत चालतो.
माघ शुद्ध पंचमीला पहाटे ४.३० वाजता देवीची मिरवणूक निघते. या वेळी सागवानी चार मजली रथ फुलांनी सुंदर सजविला जातो त्यावर विद्युत रोषणाई केली जाते. ती रोषणाई पाहून डोळ्यांचे पारणे फिटते. देवीचे आकर्षक मंदिर व दीपमाळेवरील रोषणाई मुळे शोभा अजूनच वाढते. प्रथम देवळातून मूर्ती पालखीतून मंदीरासमोर आणली जाते. नंतर टाळ आणि ताशांच्या गजरात आरती होते. देवळाला एक प्रदक्षिणा घालून पालखी महारथाजवळ आणली जाते. रथाच्या तिसऱ्या मजल्यावर मूर्ती बसवली जाते व मठाधिपती श्री स्वामींच्या हस्ते नारळ फोडून महारथ हलवला जातो. सात फुटाहून जास्त व्यास असलेल्या चाकांचा रथ दोरखंडांनी ओढला जातो. जो तो पुढाकार घेऊन , एकामेकांच्या साथीने भाविक जन रथाची देवळाभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतात. ठीक ठिकाणी भाविक रथाला स्पर्श करून श्रद्धेने दर्शन घेतात. प्रदक्षिणा पूर्ण झाली की सोन्याच्या पालखीतून मूर्ती मंदिरात नेतात पुन्हा मंदिरात आरती होते.
ह्या विलोभनीय दर्शनाने स्थैर्य व शांतता मिळते.
मंदिराची जागा हरिजनांनी देवस्थानला दिलेली आहे म्हणून षष्ठीला पालखीसोबत आलेल्या हरिजनांचा सत्कार व सन्मान केला जातो.
© सौ अर्चना देशपांडे
मो.नं ९९६०२१९८३६
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈