श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “फॅमिली डॉक्टर” ☆ श्री मंगेश मधुकर 

क्लिनिकमध्ये एसी चालू होता तरी घाम फुटलेला कारण समोर डॉक्टर माझे टेस्ट रिपोर्ट तपासत होते.डॉक्टरांच्या म्हणजेच राजाकाकांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखेच शांत आणि गंभीर भाव.त्यामुळे धाकधूक वाढली.

‘मन चिंती ते वैरी न चिंती’ हेच खरं.आता काय ऐकायला लागणार?या विचारानं पोटात भीतीचा गोळा आला. 

“तब्येतीकडे फार दुर्लक्ष केलंलं दिसतंय” राजाकाकांनी विचारलं.

“हा थोडसं!!,”

“थोडसं नाही.भरपूर दुर्लक्ष केलंय.रिपोर्ट खोटं बोलत नाहीत”. 

“एनिथिंग सिरीयस”घाबरून विचारलं पण राजकाकांनी काहीच उत्तर दिलं नाही उलट चेहरा जास्तच गंभीर केला तेव्हा धाबं दणाणलं.माझा केविलवाणा चेहरा बघून राजाकाका हसायला लागले.

“अरे गंमत करतोय.उगीच टेन्शन घेऊ नकोस.रिपोर्ट नॉर्मल आहेत.बीपीचा त्रास सोडल्यास विशेष काही नाही.  गोळी सुरु करावी लागेल.”

“तुमची रिअॅक्शन बघून हादरलो ना.”

“सॉरी!!”

“हुssssश!!सुटलो.सगळं व्यवस्थित आहे ऐकून जीव भांड्यात पडला.आता टेंशन नाही.या तब्येतीच्या नादात बरीच काम राहिलीत.थँक्यू सो मच!!”

“ओ मिस्टर,एकदम उड्या मारू नका.१०० % फिट नाहीयेस.कसाबसा काठावर वाचलायेस.आता लक्ष दिलं नाही तर नंतर गंभीर परिणाम भोगावे लागतील.”

“म्हणजे”

“अजून चाळिशी गाठली नाहीस तरी ब्लडप्रेशरचा त्रास.हे चांगलं लक्षण नाही.पळापळ कमी कर.जरा जीवाला विश्रांती दे.लाईफ स्टाईल बदलावी लागेल.”

“येस!!सगळं करतो.आज महत्वाची मिटिंग आहे.आत्ता ऑफिसला गेलं पाहिजे.”

“पालथ्या घड्यावर पाणी!!जरा तुझ्या बायकोला फोन लाव.”

“का?काय झालं?आत्ता तर म्हणालात की सगळं नॉर्मल आहे म्हणून…”

“तुला हॉस्पिटलमध्ये एडमीट करतो म्हणजे गप्प बसशील.सक्तीचा आराम.कंपनीसुद्धा ऑब्जेक्शन घेणार नाही.चार दिवस मस्त निवांत रहा.फक्त मोबाईल मिळणार नाही.चालेल”. 

“प्लीज,प्लीज नको,मी काळजी घेईन.सर्व सूचना फॉलो करीन.बाकी तुम्ही आहातच.”

“हे बऱयं,स्वतः कसंही वागायचं आणि डॉक्टरांना सांभाळायला सांगायचं.मला सांग, भविष्यासाठी प्लानिंग केलं असशीलच.सेविंग,इन्व्हेस्टमेंट,प्रॉपर्टी वैगरे वैगरे….”

“ते तर केलचं पाहिजे ना.” 

“मग ज्याच्या भरोशावर हे सगळे करतोस त्या शरीरासाठी काही इन्व्हेस्टमेंट केलीय का?”

“समजलं नाही”

“बहुतेकजण स्वतःच्या तब्येतीसाठी काहीच करत नाही.स्वतःला गृहीत धरून मला काही होणार नाही.एकदम फिट आहे या भ्रमात राहतात आणि आजारी पडले की घाबरतात.एक गोष्ट कायम लक्षात ठेव अचानक कोणताही आजार होत नाही.आपलं शरीर वेळोवेळी सूचना देतं परंतु त्याकडं दुर्लक्ष केलं जातं.आवश्यक ती काळजी घेतली जात नाही आणि मग त्रास वाढल्यावर डॉक्टरांकडे जातो.तिथंही घाई असतेच.चटकन बरं व्हायचं असतं.”

“काका,मनातलं बोललात.मनकवडे आहात.”

“साधी गोष्ट आहे रे.तब्येत ठणठणीत तर सगळं चांगलं.नाहीतर काहीही उपयोग नाही.स्वतःच्या बाबतीत केला जाणारा बेफिकिरी हा फक्त तुझाच नाही तर अनेकांचा प्रॉब्लेम आहे.” 

“खरंय,कामाच्या टेंशनमुळे खूप दिवस डिस्टर्ब आहे. शांत झोप नव्हती. जेवण जात नव्हतं.डोकं दुखायचं,अस्वस्थ होतो.

खाण्या- पिण्याचं काही ताळतंत्र नव्हतं.कामाच्या नादात त्रासाकडं लक्ष दिलं नाही.आता असह्य झालं तेव्हा तुमच्याकडे आलो.

“अजूनही वेळ गेलेली नाही.आजपासून आधी स्वतः मग फॅमिली आणि नंतर कंपनीचा विचार करायचा. दिवसातली ३० मिनिटं तरी व्यायाम करायचाच.खाण्यावर कंट्रोल ठेव.मी सांगतो तसं वागलास तर काहीही होणार नाही.”जिवलग मित्रासारखं राजकाकांनी समजावून सांगितलं.काकांशी बोलल्यावर एकदम फ्रेश वाटलं.

राजाकाका, वयाची सत्तरी पार केलेली तरीही तरुणांना लाजवेल असा उत्साह, पूर्णपणे फिट, प्रसन्न आणि बिनधास्त डोळे झाकून विश्वास ठेवावा असं व्यक्तिमत्व.आमचे फॅमिली डॉक्टर.आजोबा नंतर बाबा आता मी आमच्या तीन पिढ्या त्यांच्याकडून औषध घेतोय.राजाकाका म्हणजे कुटुंबाचाच भाग.आमच्याप्रमाणे अनेकांचे फॅमिली डॉक्टर होते. 

आजच्या काळात अनेक डॉक्टर्स भरमसाठ फी घेतात,गरज नसताना वेगवेगळ्या टेस्ट करायला लावतात याची राजकाकांना प्रचंड चीड होती कारण काकांची डॉक्टरकी ही ओल्ड मेथड होती.पेशंटचं पूर्ण ऐकून त्याला हवा तेवढा वेळ देऊन त्रास समजून घ्यायचा.त्यावर आधी बिनखर्चाचे उपाय सुचवायचे आणि आवश्यकतेनुसार उपचार करायचे.नेमकी औषधं आणि काळजी घेतली तर पेशंट नक्की बरा होतो हा आजवरचा अनुभव.अगदीच आजार गंभीर असेल तरच आवश्यक तपासण्या करण्याचा सल्ला.पेशंट हॉस्पिटलमध्ये असेल तर कोणतीही व्हिजिट फी न घेता स्वतःहून भेटायला जाणार.

त्याकाळच्या  असलेल्या ‘फॅमिली डॉक्टर’ या संकल्पनेचं “राजाकाका” हे मूर्तिमंत प्रतीक. 

सुमारे २५ वर्षापूर्वी ‘फॅमिली डॉक्टर’ सगळीकडे होते. त्यांच्याकडे जाताना अपॉटमेंट वैगरेची भानगड नव्हती. पैसे असले-नसले तरी उपचार व्हायचे. औषधं मिळायची. कधी गरज पडली तर एक्स्ट्रा चार्ज न घेता डॉक्टर घरीसुद्धा यायचे. कौटुंबिक समारंभात डॉक्टरांचा सहभाग हा ठरलेलाच. इतर अडी-अडचणींच्या वेळी डॉक्टरांचा सल्ला घेतला जायचा. पेशंट आणि डॉक्टर एवढ्यापुरतं न राहता परस्परांशी प्रेमाचं ,जिव्हाळ्याचं आणि माणुसकीचं नातं होतं.

—–

आजच्या स्पेशालीस्ट,सुपर स्पेशालीस्टच्या जमान्यात ‘फॅमिली डॉक्टर’ संकल्पना जवळपास संपली.हॉटेलसारख्या टापटीप,चकचकीत क्लिनिकमध्ये डॉक्टर आणि पेशंट यांच्यात फक्त व्यवहार होतो.जेवढ्यास तेवढं बोलणं.आपुलकी वैगेरे काहीही राहिलं नाही.

“माणसापेक्षा पैसा मोठा झाला अन दवाखान्याचं दुकान झालं.” अशावेळी सगळ्यात मोठी उणीव भासतेय ती फॅमिली डॉक्टरांची.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments