श्री अमोल अनंत केळकर

??

ताक… लेखक – श्री पराग गोडबोले ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर

का कोणास ठाऊक, पण दुधाने तोंड पोळल्यामुळे ताकाची उगाचच बदनामी झालीये. पोळणारं दूध आणि समंजस ताक यांच्यात तसंही फक्त एक रंग सोडला तर बाकी काहीही साम्य नाही. ताकाचं पालकत्व तर दुधाकडेच, पण जन्मदाता आणि  हे अपत्य यांच्यात किती तो फरक!! जसा सूर्य आणि चंद्रात फरक.

दुधाची साय, सायीचं दही, ते घुसळून मग वर जमा होणारं लोणी आणि मग ती सगळी स्निग्धता काढून घेतल्यावर उरतं ते परमप्रिय ताक. त्याचं दुसरं नाव अमृत आहे म्हणे… मला आवडतं ताक. उगाच ताकाला जाऊन भांडं लपविण्यात काय हशिल? जेवण झाल्यावर आमटीच्या वाटीत घेतलेलं ताक म्हणजे निव्वळ नशा. थोडीशी आमटीची चव आणि थोडी ताकाची. भरपेट जेवणावर खात्रीचा उतारा. पचण्यासाठी.

पूर्वी जेवणाचा शेवट ताकभातानेच  व्हायचा. मला आठवतंय, माझा एक मामा मागचा भात घेतल्यावर त्यात ताकासाठी आळं करायचा, ताक वाढणारा/वाढणारी  आल्यावर आधी ओंजळ पुढे करून ताकाचा भुरका मारायचा, सणसणीत आवाज करत आणि मगच भातावर ताक घेऊन तो कालवायचा. कोण काय म्हणेल असा विचारही त्याला नाही शिवायचा. आज जरी तो  नसला, पण ताकभात खाताना त्याच्या भुरक्याची मात्र हमखास आठवण होते. असा भात जेवताना इतस्ततः पळणारं ताक निपटताना त्याची कोण तारांबळ उडायची तरीही तो ताकभात त्याच पद्धतीने जेवायचा.

ताकावर वेगवेगळ्या प्रकारचे साज चढवले की त्याची खुमारी प्रचंड वाढते आणि ते चढवण्यात आपल्या गृहिणींचा हातखंडा असतो. वादातीत.

आंबट ताकाला डाळीचं पीठ, मिरच्या, कोथिंबीर, जिरं, हिंग, हळद, लसूण  इत्यादी लेण्यांनी मढवले की त्याची कढी तयार होते. या कढीत गोळे घातले की तयार होणारं अफलातून रसायन म्हणजे क्या बात. थोडासा फडफडीत भात, सोबत लोणच्याची फोड आणि कढी हे ज्यानं अनुभवलंय तोच त्याची महती जाणो.

हेच ताक वापरून होते उकड. उकड म्हणजे एक वेगळंच प्रकरण. कोकणातला एक साधासा पण अप्रतिम पदार्थ. बोटांनी चाटूनपुसून खाऊन फस्त करावा असा. एक विशेष आणि खास न्याहारी. कितीही खाल्ली तरी कंटाळा न येणारी. ती चाखुनच तिचा अनुभव घ्यावी अशी. हेच  वापरून केलेली पालकाची ताकातली भाजी, डाळ किंवा शेंगदाणे घालून म्हणजे आणखी एक भारीतली चीज. ही सगळी व्यंजनं म्हणजे सुगरणीचा आत्मा आणि खाणाऱ्याचा खात्मा, निःसंशय !!!

पण ताकाचं एक सगळ्यात खास द्रावण म्हणजे मठ्ठा. लग्नात  जेंव्हा पंक्ती उठायच्या तेंव्हा मठ्ठा पंक्तीचा समारोप करायचा. ताक, मिरच्या कोथिंबीर, जिरं, थोडीशी साखर असं लावून तयार झालेला मठ्ठा म्हणजे मठ्ठा. त्याला कशाची उपमा द्यायची? जिलबी त्यात बुडवून ठेवायची आणि मग ती हलकेच तोंडात सोडायची.

मठ्ठा आणि जिलबी ही जोडगोळी म्हणजे मातब्बर जुगलबंदी. अगदी तोडीस तोड. जिलब्यांची रास संपवून वर वाटीभर पाक पिणारे बहाद्दर पण मी याची देही याची डोळा पाहिलेले आहेत. त्यांना नव्हती मधुमेह, cholesterol वगैरे राक्षसांची दहशत? का अज्ञानात सुख होतं? का  देवाक् काळजी म्हणत लढणारे लढवय्ये होते ते? त्यांनाच विचारायला हवं होतं.

नुसतं मीठ घालून ताक, जिऱ्याची पूड किंवा हिंग लावलेलं ताक, चाट मसाला घातलेलं ताक, सगळेच प्रकार निव्वळ अप्रतिम. तहानलेलं असताना पंचवीस रुपयांचं कोला नामक विष पिण्यापेक्षा ताक नामक अमृताला मी नेहमीच पसंती देत आलोय आणि आयुष्यभर देत राहीन हे नक्की.

हल्ली बरेच  पॅकबंद  ताकाचे प्रकार उपलब्ध आहेत बाजारात पण ते अडीनडीला ठीक. आईनं केलेलं, रवीनं घुसळलेलं, जीव ओतलेलं आणि लोण्याचा गोळा काढून पाण्यात सोडल्यानंतरचं ताक म्हणजे खरंखुरं ताक. त्याची कशाशीच तुलना नाही ही मात्र काळ्या दगडावरची रेघ, कधीच न पुसली जाणारी.

ता. क: बायकोला ताकास तूर लागू न देता हे लिहितोय, नाहीतर आईची स्तुती केली म्हणून माझी ताकाची रसद बंद व्हायची…

लेखक : पराग गोडबोले

मो. ९३२३२ ७७६२०

प्रस्तुती : अमोल केळकर 

#माझी_टवाळखोरी 📝

poetrymazi.blogspot.in,

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

kelkaramol.blogspot.com 

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments