श्री मनोज मेहता
मनमंजुषेतून
☆ असंही अनोखं बक्षीस… ☆ श्री मनोज मेहता ☆
माझी फोटोग्राफी १९७२ ला सुरु झाली, डोंबिवलीतील फारसं कोणीच माझ्या ओळखीचे नव्हतं. पण दोन नावं कायमच लक्षात राहिली ती म्हणजे, श्री. मधुकर चक्रदेव व श्री. बापूसाहेब मोकाशी. कारण डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या उद्घाटनानंतर, ते आमच्या घरी आले होते. घरी येताच मला पाहून म्हणाले, काल तूच आला होतास ना फोटो काढायला ? माझ्या मोठ्या भावाला म्हणजेच क्रांतीला सांगत होते, एकदम तयार आहे हं तुझा भाऊ! रिबीन कापताना म्हणाला, माझ्याकडे बघू नका, रिबिनीकडे बघा, आम्हाला त्याचं खूप कौतुक वाटलं आणि पाहुणेही खूष झाले.
नंतर – नंतर डोंबिवली लायन्स क्लब मध्ये पण हेच दोघं, त्यामुळे माझी ओळख घट्ट झाली. बँक व लायन्स क्लब यांचे डोंबिवलीत भरपूर कार्यक्रम असत, यामुळे मला त्यांच्या कार्याची थोडी – थोडी ओळख होऊ लागली. असे करता करता लायन्स क्लबने एक हटके कार्यक्रम १९८० ला सुरु केला होता. डोंबिवलीत शालांत परीक्षेत ७५% व त्यापेक्षा जास्त मार्क ज्यांना मिळालेत त्या सगळ्यांचा आणि बोर्डात आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करायचा. हा उपक्रम खूप गाजू लागला, पुढे जाऊन ७८%, ८०%, ८५%, मला आठवतंय लायन्स क्लबला ९२% पर्यंत जावं लागलं ही डोंबिवलीच्या मुलांची हुशारी सर्व महाराष्ट्रात गाजली होती.
अहो, मी १९७६ ला झालेल्या ssc परिक्षेत गचकलो की, आणी मग त्वेशाने ऑक्टोबर मध्ये सॉलिड अभ्यास करून माझ्या शाळेत पहिला आलो होतो ना राव ! मी शाळेत पहिला आलो कारण सर्व विषय घेऊन मी एकटाच परीक्षेला बसलो होतो म्हणून हं ! तेव्हापासूनच मी धैर्यवान आहे. आणि वार्षिक स्नेहसंमेलनात मला बोलावून शाळेनी २५१/- रुपयांचं पाकीट दिलेलं स्मरणात होतं. हाच धागा पकडून मी ठरवलं किती मार्क मिळवतात ही मुलं, आपणही यांना छान बक्षीस देऊया.
१९८९ ला मी डोंबिवलीतील आद्य गुरुजी व प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ श्री. सुरेंद्र बाजपेई सरांना भेटून माझी कल्पना सांगितली. लगेच म्हणाले, व्वा मनोज व्वा, बढिया बक्षीस आहे. मी तुला रिझल्ट लागल्यावर डोंबिवलीतील सर्व बोर्डात आलेल्या मुलांची नावं, पत्ता व दूरध्वनी क्र. पाठवतो. इतके व्याप असताना लक्षात ठेवून रिझल्ट आल्यावर, केवळ तीन तासात शिपायाबरोबर सर्व माहितीचं पाकीट माझ्या घरी हजर असायचं. सर सर, मानाचा मुजरा तुम्हाला 🙏 हे मी इथं लिहितोय, तेही तुम्हाला आवडणार नाही. तुमच्या हयातीत असं लिहिलं असतं तर, ‘पुढच्या वर्षी माहिती पाहिजे की नको’, अशी जोरदार धमकीच मिळाली असती मला.🙏🏻
मग एक एक मुलांच्या घरी दूरध्वनी करून, मग त्यांच्या वेळेनुसार एक गुलाबाचं फुल व कॅडबरी घेऊन मला एकट्यालाच जणू आनंद झाल्यासारखा मी त्याला / तिला अभिनंदन असं ओरडून शुभेच्छा द्यायचो. मी मनोज मेहता, तुमचा फोटो काढायला आलोय हं ! काय सांगू तुम्हाला, बोर्डात पहिला येवो किंवा विसावा, अहो मला त्यांना हसवता हसवता वाट लागायची. आणि तेव्हा रोलकॅमेरा, ३-४ मस्त हसवून हसवून फोटो काढायचे आणि डेव्हलप करून त्यातील एक छान ८ X १० आकाराचा फोटो लॅमिनेशन करून ठेवायचो. त्यावर फक्त पुढे “शुभेच्छा” इतकंच लिहायचो. माझं नांव कुठेही नाही हं ! मग लायन्स क्लबचा कार्यक्रम असला की मी हे फोटो घेऊन त्यांनी बोलावलेल्या पाहुण्यांच्या हस्ते त्या मुलांना द्यायचो. हळूहळू माझी ही कीर्ती साऱ्या डोंबिवलीभर पसरली आणि चक्क मुलं अभ्यासाला लागली की! मला नक्की आठवत नाही साल, पण ९४/९५ असावं, डोंबिवलीतून ५२ मुलं बोर्डात ! पार्ल्याचा विक्रम मोडीत काढून इथेही डोंबिवलीकर मुलांनी बाजी मारली. मग मी ही घाबरलो नाही, बाजपेई सरांच्या कृपेने सर्वांच्या घरी जाऊन, तितक्याच उत्साहात मी फोटो काढले. आणि त्यावर्षी पाहुणे म्हणून श्री. विश्वास मेहेंदळे व श्री. अविनाश धर्माधिकारी हे होते. भाषणात मेहेंदळे म्हणाले मेहतांचं बरंय ‘आवळा देऊन कोहळा’ काढायचा. अन् त्यांच्या पाठोपाठ श्री. धर्माधिकारी बोलले, ‘ मेहेंदळे मी मुलांना भेट म्हणून दिलेला फोटो नीट पाहिला आहे, तुम्ही चुकीचा निष्कर्ष काढला. मेहतांचं हे मोठेपण आहे की त्यांनी कुठेही त्यांचं नांव लिहिलेलं नाही, अश्या प्रकारचं बक्षीस आजपर्यंत कोणीही दिलेलं माझ्या स्मरणात नाही, अशी माणसं सध्याच्या जमान्यात मिळणार नाहीत. मी काय व किती केलं, हे ओरडून सांगणाऱ्यांचीच संख्या वाढत आहे. म्हणून मेहताजी मी तुम्हाला नमस्कार करतो. ४०० मुलं व त्यांचे पालक व लायन्स मंडळी मिळून ७०० संख्येने भरलेल्या भरगच्च सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. नंतरची काही वर्ष लायन्स क्लब बंद होता. मग मी स्वतः माझ्या घरी बोर्डात आलेल्या मुलांना बोलावून बक्षीस द्यायचो. पुढे पुढे माझ्या घराचा हॉलही कमी पडू लागला. मग मी श्री. व सौ. पाठक यांना विनंती केली आणि त्यांनी सर्वेश सभागृह, नाश्ता व चहा विनामूल्य तर दिलाच, शिवाय मुलांना टायटन घड्याळं पण दिली. मंडळी त्यावर्षी माझे ज्येष्ठ पितृतुल्य मित्र, श्री. शं. ना. नवरे यांना पाहुणे म्हणून बोलावलं होतं. १८ विद्यार्थी व त्यांचे पालक व माझ्या घरची मंडळी व केवळ ४ मित्र असे आम्ही ५०/६० जणंच होतो. कार्यक्रम सुरु झाला आणि नवरे काकांनी एकेक मुलाला/मुलीला माझं बक्षीस द्यायला सुरुवात केली. बक्षीस देताना ते मुलांशी संभाषण करायला लागले. म्हणाले, आमच्या मनोजकडून तुमचं कौतुक खूप ऐकलं म्हणून मी आलो हं ! मी तुम्हांला बक्षीस देताना तुमचा चेहरा व फोटोतील चेहरा निरखून पाहात होतो. इतका सुंदर फोटो मनोजने काढून तुम्हाला दिला, कारण तुम्ही हुशार व छान आहात. आता गंमत अशी आहे, आमच्या मनोजनं दिलेलं असं बक्षीस तुम्हाला कोणीच देणार नाही, अन त्यानं दिलेलं हे बक्षीस कायम स्वरूपात राहिल. तर नीट ऐका हं, तुम्हाला दिलेल्या सुंदर फोटोतील चेहऱ्यापेक्षा, तुमचं जीवन तुम्ही अधिक सुंदर बनवून दाखवाल, असा मी तुम्हाला आशीर्वाद देतो.
मी कधीही मुलांच्या सत्काराचे फोटो व प्रसिद्धीच्या मागे पडलो नाही. बऱ्याच वर्षांनी हीच मुलं मला रस्त्यात भेटतात व पाया पडतात, आता तर त्यांनाही मुलं झालीत. पण मला व माझ्या कुटुंबासाठी हा कार्यक्रम म्हणजे टॉनिक होतं, ते नेमकं महाराष्ट्र शासनाने हिरावलं. आपला शालांत परीक्षेचा निकाल शाळेत बघण्याची आणि आवडत्या शिक्षकांना, मित्र मैत्रिणींना भेटायची इच्छा, आनंद, सगळं काही या ऑनलाईनने हिरावून घेतलं.
पण तो १७/१८ वर्षांचा माझ्या कुटुंबासाठी सुवर्णकाळच होता, बस्स त्या स्मृतीतच रमायचं आता !
© श्री मनोज मेहता
डोंबिवली मो ९२२३४९५०४४