सौ. राधिका भांडारकर
☆ मनमंजुषेतून ☆ काॅलेजचे दिवस.. ☆ सौ. राधिका भांडारकर ☆
आमच्या वेळी १०+२ अशी शिक्षण पद्धती नव्हती.
अकरावी पर्यंत शाळा असायची.आणि मग काॅलेज जीवन सुरु.
शाळेच्या शेवटच्या वर्षापासूनच काॅलेजचे वेध लागले होते. काॅलेज म्हणजे खूप काहीतरी वेगळं, फुलपाखरी वातावरणाचं, जिथे गणवेष नसतो, खूप स्वातंत्र्य असलेलं म्हणजे मनात आलं तर वर्गात जायचं नाहीतर दांडी मारायची.. आणि दांडी मारली म्हणून कुणी शिक्षा करत नाही. आणि एखादे प्राध्यापक असतीलच जरा कडक तर आपल्या ऐवजी मैत्रीणीने present sir म्हटलं तरी आपला अटेन्डन्स लागतो…. कारण शाळेसारखे तिथे प्रत्येक विद्यार्थ्याला ओळखणारे शिक्षक नसतात. वगैरे वगैरे अनेक सूरसकथा ऐकलेल्या होत्या. आणि त्याचं अतीव आकर्षण होतं. आणखी एक, माझं शालेय शिक्षण कन्या शाळेत झालं. त्यामुळे आता मुलांबरोबर एकत्र वर्गात बसून शिकण्याची काय निराळी गंमत असते ते अनुभवायला मिळणार होतं.. मनाच्या खोल कोपर्यात कुठेतरी चोरटेपणाने येऊनही गेलं,”……भेटला एखादा स्वप्नातला राजकुमार तर…..”
तेव्हां काॅलेजच्या प्रांगणात पाऊल टाकलं तेव्हा या सगळ्या गंमतकथा घेऊन… शाळेचा तो तास आणि काॅलेजचे ते लेक्चर, पीरेड. शाळेच्या बाई काॅलेजच्या मात्र मिस.
त्या विवाहित असल्या तरी मिसच… इथे मास्तर नव्हते. इथे सर होते. ते आमच्या डोंगरे मास्तरांसारखे हातात काठी अन् ढगळपगळ कपडे घालणारे नव्हते तर छान सुटाबुटात टाय लावलेले असत..
काॅलेजची ती लेडीजरुम… तिथली मजा औरच होती. तिथे लाॅकर्समधे आपलं सामान ठेवायचं… कधी पीरिएड बंक केला तर मैत्रीणीशी केलेल्या खास गुजगोष्टी असायच्या.. कुणी छान गाणं म्हणत असेल तर तिला गाण्याचा आग्रह करायचा..
कधी मिस किंवा सरांंची नक्कल वगैरे….. मजाच वाटायची सगळ्याची… शिवाय कँटीन या संस्थेशी नव्याने ओळख झाली होती. रेस्टाँरंटमधे खाण्याची संस्कृती नव्हतीच तेव्हां… त्यामुळे मित्रमैत्रीणीं समवेत मुक्तपणे कधी वडा, कधी मिल्कशेक, नाहीतर कोक प्यायला धम्माल वाटायची…..अर्थात पुन्हा हे सर्व पाॅकेटमनीवर अवलंबूनही असायचंच….पाॅकेटमनी हा एक आणखी पाहुणा शब्द…..
आमच्या काॅलेजमधे सुदैवाने रॅगींग हा प्रकार नव्हता.
मुलांच्यात होतं थोडंफार….फिजीक्स लॅबमधे कुठल्यातरी एका प्रयोगात, एका पात्रात वाफ कोंडवून ठेवल्यामुळे, एक बिच्चारा, काॅलेजयुवकाचा झीरो स्मार्टनेस असलेला मुलगा भाजला होता….कुणीतरी मुद्दाम हे कृत्य केले होते हे नंतर कळले……त्यालाच सतावण्यासाठी..
एकेका वर्षानंतर काॅलेजात चांगलेच रूळलो…
अभ्यास,महत्वाकांक्षा,भविष्याचे विचार होतेच,..
सोबत कॉलेजची गेटटुगेदर्स…आंतरमहावाद्यालयीन नाट्यस्पर्धा…त्या तालमी यांचीही खूप मजा, आनंद, भोगला. काही नाती जुळली. काही तुटली.
काॅलेजच्या बोटॅनीकल गार्डन मधे जीवलग मैत्रीणींबरोबर केलेल्या शेअरींगचे क्षण,आजही तसेच्या तसे आठवतात. भावना बोथट झाल्या असल्या तरी त्या क्षणांनी जे दिलं ते अजुन तसंच आहे मनाच्या खणात…
शेवटचं वर्षं मात्र अभ्यासातच गेलं…आयुष्याची दिशा शोधण्याचं ते वर्ष….आता ही सगळीजणं दूर जाणार.. कुठे कधी कोण भेटणार… काही प्रेमी युगुलांची नाती जमलीही होती… जीवनाच्या वाटेवरचे सोबती भेटले होते… त्यांच्याविषयी कौतुकाबरोबर किंचीत असुयेची छटा होती….आपली वाट अजुन एकलीच…पण सोबत सोनेरी स्वप्नं होतीच की…..
पण असे हे काॅलेजचे रंगीन,सुनहरे दिवस कधी संपले ते कळलंच नाही…
त्यादिवशी फेसबुकवर एक फ्रेंड रीक्वेस्ट होती…
फोटोतला चेहरा नाही पटकन् ओळखला. पण नाव स्मरणात होतं…. नंतरच्या मेसेजमधे त्याने लिहीलं होतं, डोळ्यांवरुन मी तुला ओळखलं…. खूप आवडायचे मला……. गंमत वाटली मात्र… पण माझ्या संस्काराने मात्र रोखलं म्हणताना….
मलाही आवडायचास तू…………!!
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
खुप सुंदर लेख, किती प्रांजळ, आवडला!
छान