श्री मकरंद पिंपुटकर

??

कार्बन फुटप्रिंट आणि तुम्ही आम्ही – भाग – १  ☆ श्री मकरंद पिंपुटकर 

“बाबा, तुम्हाला माहित आहे का ? ते शेजारचे काका एकटेच (चारचाकी) गाडी घेऊन ऑफिसला जातात. त्यांच्या घरात कोणी असो नसो, त्यांचा AC ढणढणा चालूच असतो. त्यांची मुलं स्विगी झोमॅटोवरून भरमसाट अन्न मागवतात आणि त्यातलं बरंचसं अन्न न खाता तसंच फेकून देतात, अन्नाची नासाडी करतात. या सगळ्यांनी कार्बन फुटप्रिंट किती वाढतो माहितीये ?” 

मी आपला रविवार सकाळी चहासोबत वर्तमानपत्राचा आस्वाद घेत होतो, आणि आमचे चिरंजीव – कधी नव्हे ते (रविवार असूनसुद्धा) लवकर उठून त्यांच्या लॅपटॉपमध्ये डोकं खुपसून बसले होते – ते अचानक वदते झाले.

“बाबा रे, तू अशी संदर्भाशिवाय आकाशवाणी करत जाऊ नकोस रे. हे कार्बन फुटप्रिंट म्हणजे काय ? त्याचा काकांच्या गाडीशी, AC शी आणि अन्न वाया घालवण्याशी काय संबंध ? आणि कार्बन फुटप्रिंट वाढला म्हणजे चांगलं झालं का वाईट ?”

हा असा अजाण बाप माझ्याच नशीबी का यावा असा मला नेहमीसारखा हताश लूक देत, निरगाठ उकल तंत्राने, संदर्भासहित स्पष्टीकरण देत तो म्हणाला, “बाबा, एखादी वस्तू तयार करण्यासाठी अथवा एखाद्या सेवेचा वापर करण्यासाठी किती इंधन खर्च होतं आणि त्याच्या ज्वलनाने किती कार्बन डाय ऑक्साईड तयार होतो, याला त्या वस्तूचा / सेवेचा कार्बन फुटप्रिंट म्हणतात. ” 

“गाडी चालवण्यात इंधन जळलं हे समजू शकते. पण AC चालवल्याने आणि अन्नाची नासाडी केल्याने कसं काय इंधन जळतं बुवा ?” मी नि:संकोचपणे माझे अज्ञान प्रकट केले.

“अहो, दर वेळी प्रत्यक्ष इंधनच जळले पाहिजे असे नाही. बघा, AC साठी इलेक्ट्रिसिटी लागते की नाही, मग thermal power असेल तर त्याला कोळसा वापरला जातोच की नाही ? म्हणजेच AC साठी अप्रत्यक्षरीत्या का होईना इंधन जाळले जातेच.

अहो, हा खूप मोठा आणि क्लिष्ट विषय आहे. तुम्हाला समजावं म्हणून मी थोडक्यात सांगितला.

अन्नधान्य निर्मितीसाठी ट्रॅक्टर वापरला जातो, शेतीसाठी पाणी उपसा करायला पंप मोटार वापरले जातात, या सगळ्यात इंधन लागतंच. शेतमालामधून आपल्याला खाण्यायोग्य अन्न बनवण्यासाठी – जसे गहू दळण्यासाठी, आइस्क्रीम करण्यासाठी, श्रीखंड करण्यासाठी ऊर्जा लागतेच.

 शिवाय अगदी शेतकामासाठी बैल वापरले तरी त्यांना खायला प्यायला अन्न लागतं, त्यांचे ते अन्न निर्माण करायला परत ऊर्जा लागतेच की. ” चिरंजीव.

हे कार्बन प्रकरण लेकानं बरंच मनावर घेतलेलं दिसत होतं, बराच सांगोपांग अभ्यास केलेला दिसत होता त्यानं. “ते सगळं ठीक आहे, पण शेजारच्या काकांच्या एका घरामुळे जगाला असं काय मोठंसं नुकसान होणार आहे ? आणि ते त्यांच्या पैश्याने या गोष्टी करत आहेत ना ? त्याबद्दल तू आक्षेप घ्यायचं कारण काय ?” मी.

“बाबा, एका अर्थी तुमचे म्हणणे थोडेसे बरोबर आहे. उद्योगधंद्यांच्यामुळे प्रदूषण आणि कार्बन फुटप्रिंट प्रचंड वाढतो. त्या मानाने, घरगुती पातळीवर तेवढं नुकसान होत नाही. पण माणसांची लोकसंख्या लक्षात घेतली, तर हा गुणाकार अक्राळ विक्राळ होऊन उभा ठाकतो.

तासभर AC चालवल्याने जवळजवळ १ किलो कार्बन डायऑक्साइड फुटप्रिंट तयार होतो. आपल्या सोसायटीतील अशी १०० घरे धरली, शहरातील अशा हजारो सोसायट्यांचे गणित केलं, तर बघता बघता हा आकडा केवढा तरी अवाढव्य होत जातो.

तेच गणित गाडीचं. एक किलोमीटर अंतर कापायला पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या गाडीचा कार्बन फुटप्रिंट ०. २ किलो इतका आहे, तेच बस किंवा ट्रेनचा हा फुटप्रिंट प्रति किलोमीटर जेमतेम ०. १ किलो इतका – गाडीच्या निम्मा आहे. शिवाय ट्रेन – बस मधून एका गाडीच्या कितीतरी पट अधिक माणसे प्रवास करू शकतात. ” तो अतिशय गांभीर्याने सांगत होता.

मला या प्रकरणात उत्सुकता वाटू लागली. “बरं, जळलं इंधन, झाला निर्माण कार्बन डाय ऑक्साईड. पण त्यानं असं काय कोणाचं घोडं मारलं जाणार आहे ? आणि अशा एखाद्या गाडीने आणि एखाद्या AC ने असा काय तो मोठासा फरक पडणार आहे ?” मी विचारता झालो.

“बाबा, हा जो कार्बन डाय ऑक्साईड किंवा तत्सम वायू तयार होतो त्यांना ग्रीन हाऊस गॅसेस – हरित गृह वायू म्हणतात. सूर्यकिरणांनी आपल्या वातावरणात जी उष्णता आली असते, ती या वायूंमुळे आपल्या वातावरणातच अडकून राहते, त्यामुळे वातावरणाचे तापमान वाढते. Global warming, climate change होतं यामुळे बाबा ! ही खूप गंभीर बाब आहे. “

“पण याने तुला मला काय फरक पडतो ?” 

“अहो बाबा, या तापमान वाढीने उत्तर ध्रुवावरचे बर्फ वितळू लागले आहे, समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊ लागली आहे. सेशेल्स, मॉरिशस असे अनेक देश नजीकच्या भविष्यकाळात पूर्णपणे पाण्याखाली जाणार आहेत आणि अगदी मुंबईसह भारतातीलही किनाऱ्यावरील अनेक शहरांनाही धोका निर्माण झालेला आहे.

पाऊस पडण्याचे वेळापत्रक बिघडले आहे. गेली पाच दहा वर्षे आपल्याकडे, अगदी दिवाळीत, जानेवारी महिन्यातही बेदम पाऊस पडतो. Climate change मुळे उन्हाळे अधिक तीव्र होत चालले आहेत. यंदा तर पुण्यातसुद्धा तापमान ४०° च्यावर गेलं होतं.

हवामानाच्या या बदलांमुळे प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या अनेक जाती नामशेष होऊ लागल्या आहेत, हवेतील कार्बन डायऑक्साइड वायू नद्यांच्या, समुद्रांच्या पाण्यात विरघळल्याने पाणी आम्लधर्मी (acidic) झाले आहे, त्याने पाण्यातील अनेक वनस्पती व मासे यांना हानी पोचत आहे. जैवविविधता (biodiversity) धोक्यात आली आहे.

प्रदूषणाने हवेची गुणवत्ता बिघडली आहे, लोकांना श्वसनाचे आजार होऊ लागले आहेत. उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने उष्माघातासारखे प्रकार वाढू लागले आहेत. रोग पसरविणारे जीवाणू (pathogens) व विषाणू (virus) वाढू लागल्याने रोगराई वाढत आहे.

जमिनीची कृषी संबंधित उत्पादन क्षमता कमी होऊ लागली आहे, पाण्याच्या उपलब्धतेच्या अनियमिततेमुळे शेतीचे नुकसान होऊ लागले आहे.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
1 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments