सुश्री नीता कुलकर्णी
☆ “चातुर्मास कहाणी…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆
“आज श्रावणी सोमवार आहे मी शंकराच्या मोठ्या देवळात आत्ता जाणार… “
तिनी सुनेला सांगितले.
“अहो आई आत्ता खूप गर्दी असेल.. असं करूया… सोनल शाळेतून आली की आपण दुपारी तीन वाजता जाऊ या तेव्हा गर्दी कमी असेल”
“मला फराळ करायच्या आधी दर्शन घ्यायचे आहे…. “गर्दी असली तरी असू दे… मी जाणार… “
बजावलंच तिनी सुनेला..
“जाऊदे सुनबाई ती नाही ऐकणार”
“हो…. नाहीच ऐकणार.. “
….. असं नवऱ्याला सांगत ती निघालीच… ती शेजारच्या मैत्रिणीकडे गेली
” तू येणार नसशीलच तरी पण विचारते येणार आहेस का शंकराच्या देवळात दर्शनाला ?….. “
“अगं कस ग मला जमणार? सुनबाई दहाला ऑफिसला जाणार. नातं शाळेतून येणार, कामवाली…… “
” दे दे आयुष्यभर तू न येण्याची कारणंच दे “
आज ती जरा रागावलीच मैत्रिणीवर… आज एवढा श्रावणी सोमवार आहे हिला काही नाही त्याचं…..
निघायला साडेनऊ झाले. रिक्षानी निघाली. रिक्षा दुसऱ्याच रस्त्याला लागलेली बघून तिने विचारले,
“अरे रिक्षा इकडे कुठे?”
” आजी शंकराची रांग इकडे बोळात वळवली आहे. आज खूपच गर्दी आहे. श्रावणी सोमवार आहे ना.. “
” हो का? बरं.. “
तिने पूजेचे ताटं घेतलं. नारळ, हारं फुलं, साखर फुटाणे.. ती रांगेत उभी… बायका मुली मजेत होत्या. फोटो घेणं, गप्पा मारणं, व्हीडीओ काढणं चालू होतं. फोन चालू होते. रांग हळूहळू सरकत होती. पाऊण तास झाला होता. देऊळ अजून दूरच होत. हातातलं ताट जड वाटायला लागलं… मनातल्या मनात शिवमहिम्न म्हणायचं होत….. जय शिव ओंकारा आरती म्हणायची होती… पण गोंधळ गडबड आवाज… इतका होता की बस्स….. त्यामुळे मनाला शांतता नव्हती..
दीड तासानंतर देऊळ दिसलं. फुलांनी सजवलेलं लाइटिंग केलेलं आज वेगळच दिसत होतं.
आता रेटारेटी सुरू झाली. ताट हातात धरून हात भरून आला होता. लांबूनच दर्शन घेतलं.
समोरची शंकराची छोटी मूर्ती आज हारात बुडून गेली होती. नारळ तिथल्या गुरूजींनी बाजूला असलेल्या नारळाच्या ढिगात टाकला. हार देवाला स्पर्श करून तो पण बाजुला ठेवला….. जेमतेम एक मिनिट दर्शन मिळालं…
चार माणसं गर्दी हटवायला होते
” चला पुढे चला… ” म्हणत होते. ती आपोआप पुढे सरकली…
आज देवं नीट दिसलेच नाहीत…. केवळ दर्शनासाठी घरी कुणाचं न ऐकता अट्टाहासानी ती आली होती…
लांबूनच कसंतरी दर्शन झालं.. खरंतर दर्शन झालं असं उगीचच म्हणायचं…. रुखरुखच लागली तिला….
रिक्षा करून ती घरी आली. दमली होती. दमण्यापेक्षा दर्शन नीट झाले नाही… त्यामुळे मनाला समाधान वाटत नव्हते.
मैत्रिणीचे दार उघडे होते. समोरच ती खुर्चीवर बसली होती. मैत्रिणीची नात नाचत समोर आली
म्हणाली.. ” आजी बाप्पाचा प्रसाद घ्यायला ये…. “
घरातला शंकराचा फोटो मैत्रिणीने टीपॉयवर ठेवला होता. त्याला हार, फुलं घातली होती. समई, निरांजन तेवत होतं. प्रसाद समोर ठेवला होता.
मैत्रीण म्हणाली.. ” ये ग… बैस थोडा वेळ. तुला काॅफी करते. दमल्यासारखी दिसतेस… “
असं म्हणून मैत्रीण आत गेली.
ती थकून खुर्चीवर बसली. मनात विचार सुरू झाले… सकाळी पूजेनंतर वाचलेली खुलभर दुधाची कहाणी तिला आठवली…. इतकी वर्ष आपण ती कहाणी वाचायची म्हणून नुसतीच वाचली…
…. तिला आज ते मनोमन जाणवले.. त्यात लपलेला खोल मतीतार्थ आपण कधी समजून घेतलाच नाही.
तिला आठवली शुक्रवारची कहाणी…
… सहस्त्र भोजन घालणारा भाऊ गरीब बहिणीला जेवायला बोलवत नाही. तरी ती जाते. भाऊ तिला हाकलून देतो. काही दिवसांनी तिचं दळींद्र जातं. ती समर्थ होते. मग भाऊ तिला बोलवतो. जेवायला गेल्यावर ती एक एक पदार्थावर एकेक दागिना ठेवते…. या कहाणीतून तर केवढा मोठा बोध घेता येईल………
दानाचं महत्त्व सांगणाऱ्या कहाण्या, व्रत का करावं हे सांगणाऱ्या, देव प्रसन्न कसा होईल ?, जगात कसे वागावे ?, चूक नसताना दोष देऊ नये,….. प्रत्येक कहाणीतून केलेले विचार प्रबोधन तिला आठवायला लागले…. ललिता पंचमीची, महालक्ष्मीची, श्रीविष्णूची कहाणी आणि इतरही कहाण्या अर्थ समजून परत नीट वाचायला हव्या आहेत.. हे तिच्या लक्षात आले.
अरेच्या…. म्हणजे यासाठी होत्या का या कहाण्या….
“ देवा चुकले रे मी.. मैत्रिणीने मुलाबाळांचा, सुनेचा, नातवंडांचा आत्मा तृप्त करून मग पूजा केली होती. मनाचा गाभारा कसा भरायचा हे आज कळले रे… या कहाण्यात सांगितलेला बोध प्रत्यक्ष आचरणात आणायला हवा आहे. हे जाणवले…”
आज आपल्याला बऱ्यापैकी भान आलेलं आहे. आता आपण स्वतःला बदलायचचं…
उतायचं नाही मातायचं नाही आता हा सुदृढ विचारांचा वसा टाकायचा नाही … अस मनोमन तिने ठरवलं.
तरच ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण होईल……. हे तिच्या लक्षात आले.
मैत्रिणीनी कॉफीचा कप तिच्या हातात दिला. आणि नातीला म्हणाली,
“आजीला, तु पाठ केलेलं म्हणून दाखव”.. नात फोटोसमोर ऊभ राहून म्हणायला लागली..
” कैलास राणा शिवचंद्रमौळी “…
नातीने प्रसाद हातात दिला. तिने शंकराच्या फोटोला मनोभावे नमस्कार केला. चातुर्मासातल्या या नुसत्या कहाण्या नाहीत तर आपल्याला संपूर्ण जीवनात मार्गदर्शन करणाऱ्या आहेत हे तिला समजले….
‘आता पावलं त्या वाटेनी टाकीन रे…. ’..
तिने कबुली दिली….. कहाणी संपली…..
तिचे डोळे भरून आले होते…
☆
© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी
मो 9763631255
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈