सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
☆ आठवणींची बिल्वपत्रे … ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
श्रावण महिना आला की आपोआपच श्रावणी सोमवार आठवू लागतात. लहानपणी रत्नागिरीला आम्ही विश्वेश्वराच्या देवळात सोमवारी जात असू. ते देऊळ कॉलेजच्या मागच्या बाजूच्या उतारा खाली होते …. त्यामुळे कॉलेज अर्ध सोडून बरीच मंडळी देवदर्शनासाठी जात असत… श्रावणी सोमवार हा खूप आनंददायी वाटत असे, कारण शाळेला अर्धी सुट्टी! आणि दर सोमवारी उपास सोडायला आई नवनवीन गोड पदार्थ करत असे. अर्धी शाळा सुटली की आम्ही घरी येत असू, तेव्हा स्वयंपाक घरातून छान छान गोड वास येत असे. मग कधी सांजा तर, कधी खीर, कधी रव्याची खांडवी, घावन असे पदार्थ आई उपास सोडायला करत असे.
पुढे मोठं झाल्यावर शिक्षणासाठी सांगलीला राहिले, तेव्हा हरिपूरची श्रावणातली जत्रा हे आनंददायी ठिकाण होते. हॉस्टेलवर राहत असल्यामुळे आमच्याकडे अशा गर्दीच्या ठिकाणी जायला आम्हाला रेक्टर बाई परवानगी देत नसत, पण तरीही कधी गोड बोलून तर कधी बाईंना चुकवून आम्ही हरिपूरच्या जत्रेला जात असू! हरीपुर ला कृष्णा वारणेच्या संगमावर संगमेश्वराचे शंकराचे देऊळ आहे. अतिशय रम्य आणि पवित्र ठिकाण! समोर वाहती नदी, सगळीकडे पसरलेला प्रसन्न हिरवागार परिसर आणि त्यातच हौशे, नवशे आणि गवसे अशा सर्व प्रकारच्या लोकांची गर्दी! म्हणजे देवाला येणारे लोक! तसेच जत्रेला म्हणून येणारे आणि काही असेच छोटी मोठी चोरी मारी करायला येणारे गवसे लोक ही असायचे!
पिपाण्या, शिट्ट्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे आवाज आसमंतात घुमत असत. फुगेवाले, छोट्या मोठ्या वस्तू विकणारे फेरीवाले तिथे फिरत असत. रस्ता अगदी अरुंद होता, दुतर्फा चिंचेचे झाडं होती, वाहनांची, माणसांची खूप गर्दी असे, पण सर्व वातावरण उत्साहाने आनंदाने भरलेले असायचे.. हरीपुरची श्रावण सोमवारची जत्रा अजूनही आठवणींच्या कलशात एक खडा टाकून बसलेली आहे..
पुढे लग्न झाल्यावर श्रावणी सोमवारी शिवामूठ वाहण्यासाठी शंकराला जात असू.. प्रत्येक वेळी माझ्या मनात विचार येई की, हा भोळा शंकर कुठेतरी रानावनात गावापासून दूर असाच राहिलेला असतो ! त्याच्या प्राप्ती साठी पार्वती ने किती व्रतं केली.. कष्ट घेतले. बऱ्याच वेळा शंकराचे ठिकाण नदीच्या काठी किंवा रानावनात च असते…..
नंतर काही वर्षे मुलांच्या संगोपनात गेली आणि या शंकराची दर्शनं थोडी दुर्मिळ झाली! पण अशीच एक खास लक्षात राहिलेली ट्रीप म्हणजे भीमाशंकरची!
पुण्यापासून जवळ असलेले हे ठिकाण पाहायचं राहिलं होतं! भीमाशंकर डोंगराळ भागात असलेलं, फारशा गाड्या नव्हत्या. त्यामुळे जाणं तितकसं सोयीचं नव्हतं, पण एक वर्ष योग जुळून आला. श्रावणामध्ये मी माहेरी आले होते, त्यामुळे दोन्ही भाऊ आणि वहिनी असे आम्ही सर्वजण भीमाशंकर ला जायचे ठरवले. तसं पुण्यापासून हे ठिकाण लांब आहे. इथली आम्हाला काहीच माहिती नव्हती आणि तेव्हा स्पेशल गाडी वगैरे प्रकार नव्हता. सरळ एसटीच्या बससाठी स्टैंड वर आलो. भली मोठी लाईन लागलेली होती, तरीही आज नक्की जायचं असं ठरवून आम्ही रांगेत उभे राहिलो. एकदाची आम्हाला बस मिळाली. भीमाशंकरला उतरलो तेही भर पावसात! बरोबर एखादी छत्री होती आणि पुण्याहून येताना इकडे इतका मोठा पाऊस असेल याची कल्पना नव्हती. स्टँडवर उतरल्यावर प्लास्टिकची इरली विकणारी मुले
आमच्या भोवती जमा झाली. आम्ही लगेच दोन-तीन इरली विकत घेतली आणि ती डोक्यावर घेऊन रांगेमध्ये बारीक बारीक पडणाऱ्या पावसात उभे राहिलो. हा अनुभव आमच्यासाठी नवाच होता. आसपास बघितलं तर कुठेही हॉटेल वगैरे दिसत नव्हतं! तिथे काही तरी सोय असेल म्हणून आम्ही खाण्यासाठी डबे नेले नव्हते. त्यामुळे देवदर्शन झाल्यानंतर जेवण खाण्याचं काय करायचं हा मोठा प्रश्न वाटत होता!
पण तो विचार मागे टाकून आम्ही प्रथम देवदर्शनासाठी गेलो. वातावरण अर्थातच खूप प्रसन्न होतं! भीमा नदीच्या उगमाचे हे ठिकाण आणि तिथे असणारे शंकराचे वास्तव्य, देवळाच्या मागून भीमेचा उगम बघायला जाणाऱ्यांची गर्दी दिसली. आम्ही सुद्धा त्याच वाटेने वर वर चढत गेलो, पण येणारा पाऊस आणि अंतर या दोन्हीचा विचार करता कधी एकदा उगम पाहतोय आणि खाली येतो असं आम्हाला झालं होतं!
तासभर इकडे तिकडे फिरून झाल्यावर आम्ही परत मंदिरापाशी येऊन बसलो. तितक्यात माझ्या वहिनीच्या ओळखीचे एक जण तिला दिसले आणि शंकराची कृपा इतकी की आम्हाला त्यांनी जेवणासाठी त्यांच्या घरी नेले! तिथे गरम गरम आमटी- भात खाताना खरोखरच मन भरून आलं! जिथे कोणी नाही तिथे परमेश्वर आपला साथीदार असतो याची जाणीव झाली. आपली श्रद्धा पाहिजे एवढे मात्र खरे!
या गोष्टीला सहज 40 वर्ष झाली असतील.. त्यानंतरच्या काळात आम्ही बारा ज्योतिर्लिंगांपैकी जवळपास 11 ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतले होते. राहिला तो केदारनाथ! तो योग मात्र आला नाही, पण कसं कोण जाणे, पाटणला असताना तिथे असलेल्या शंकराच्या मंदिराला ‘केदारनाथाचे मंदिर’ म्हणत आणि त्याच्या आशीर्वादाने मला मुलगा झाला. त्याचेही नाव केदार ठेवले आणि नकळतच त्या केदारनाथाचे दर्शन मला झालं असं मला वाटतं.
दर श्रावणातील सोमवारी नकळतच ही शिवदर्शनाची आठवण होते … आणि या श्रावणातही आणखी एक आठवणींचा खडा माझ्या लेखन कलशात टाकला गेला !
जय भोलेनाथ !
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈