डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ श्रावणसरी… – भाग – २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे

(ज्यांनी आपल्या आई-वडिलांना असं रस्त्यावर सोडलं आहे, त्यांच्या आयुष्यात येईल का हा पश्चातापाचा दिवस ? … करतील का ते कधी आत्मपरीक्षण ?? … देतील का ते कधी कबुली जबाब स्वतःला ??? 

… येईल का त्यांच्याही आयुष्यात “पतेती”…??? मी त्या नववर्षाची वाट पाहत आहे… !!!) – इथून पुढे 

…कॅलेंडर प्रमाणे पारशी नववर्ष सुरू झाले… तो दिवस होता 15 ऑगस्ट ! 

15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन ! 

वर्दीमधली माणसं जेव्हा देशासाठी शहीद होतात, तेव्हा त्यांच्याभोवती तिरंगा गुंडाळला जातो…!

हा सन्मान मिळायला तेव्हढं भाग्य असावं लागतं….! 

तरीही त्यापुढे जाऊन मी धाडसाने म्हणेन… देशभक्ती करायला फक्त वर्दीची गरज नसते…

ज्याला जे काम नेमून दिलं आहे, त्यांनं ते प्रामाणिकपणे करणं म्हणजे देशभक्ती… ! 

….. विद्यार्थ्याने गुरुजन आणि आई-वडिलांचे ऐकून शिक्षण घेणे आणि त्या शिक्षणाचा उपयोग देशाच्या भल्यासाठी करणे म्हणजे देशभक्ती !

….. डॉक्टरने, रुग्णसेवेला महत्त्व देऊन… Allopathy, Homeopathy, Naturopathy यासोबतच Sympathy आणि Empathy या पॅथींचाही वापर करणे म्हणजे देशभक्ती ! 

….. इतर कोणत्याही सरकारी / खाजगी सेवेत असलेले अधिकारी, कर्मचारी, सेवक या सर्वांचे बाबतीत सुद्धा हेच सांगता येईल…. !

….. रस्त्यावर न थुंकणे म्हणजे देशभक्ती…

….. चिरीमिरी न घेणे म्हणजे देशभक्ती…

….. मुली महिलांचा आदर करणे म्हणजे देशभक्ती…

….. आपल्याला जे नेमून दिलेलं काम आहे, ते मनोभावे करणं म्हणजे देशभक्ती….

अशा प्रकारची देशभक्ती केली तर, अंगावर घातलेलं कुठलंही वस्त्र, हे मग युनिफॉर्मच होईल ! 

वर्दी / युनिफॉर्म…. ही अंगावर घालायची गोष्टच नाही मुळी….. ती मनात घेऊन मिरवायची गोष्ट आहे… ! 

… फक्त दहा ते पाच नाही…. जन्मलेल्या तारखेपासून, मृत्यू होईपर्यंत सांभाळायची ती गोष्ट आहे… ! 

पूर्वी भीक मागणाऱ्या परंतु आता, शाळेत जाणाऱ्या अनेक मुलांना या महिन्यात आपण युनिफॉर्म घेऊन दिले आहेत…. शाळेच्या फिया भरल्या आहेत… ! 

उद्या हीच मुलं मोठी होतील…. पुढे इतर कोणत्याही क्षेत्रात जातील, देशाची भक्ती करतील….

आणि म्हणून, याच मुलांना, “भारत” समजून, युनिफॉर्ममधल्या पोरांकडे पाहून मी त्यांना कडक सॅल्यूट ठोकला…. जय हिंद… वंदे मातरम… असं म्हणत मग आम्ही झेंडावंदन केलं.. !!! 

आधार हरवलेली… अंधारात चाचपडणारी ही माणसं, जेव्हा स्वयंपूर्ण होऊन… स्वतःच प्रकाशित होतात, तो क्षण पौर्णिमेचा ! आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि मदतीने माझी अनेक माणसं या महिन्यात “प्रकाशित” झाली…. कदाचित यांच्याच प्रकाशाने रात्र उजळली… आणि मग 15 ऑगस्ट नंतर, श्रावणातली पौर्णिमा उगवली…

आली पौर्णिमा आली…. अल्लड, अवखळ धाकली बहीण म्हणून धावत आली, हातात राखीचे बंधन घेवून आली… रक्षाबंधन… !!! 

… रस्त्यावरील शेकडो आजी आणि ताईंनी मला राख्या बांधल्या. “जगात ज्याला जास्त बहिणी, तो खरा श्रीमंत”, अशी श्रीमंतीची व्याख्या ठरली; तर आज सगळ्या जगातला मीच एक श्रीमंत ! 

सर्वात श्रीमंत मीच असलो तरीही एका टप्प्यावर याचक सुद्धा मीच आहे….. इतक्या साऱ्या बहिणींना मी ओवाळणी तरी काय देऊ ? माझी पात्रता ती काय ? 

…. मग, कमरेत वाकलेल्या आजीला कमरेचा पट्टा देवून तिचा आधार झालो…

…. गुडघ्याच्या त्रासामुळे चालता येईना, त्या आजीला गुडघ्याचा पट्टा बांधून देवून, तीचा गुडघाच झालो…

…. आधाराशिवाय उभेच राहता येत नाही, अशा आजीला हातात काठी देऊन तीची काठीही झालो…

…. डोळ्याला दिसत नाही ? मग ऑपरेशन करून तिचा नेत्र झालो…

सुकलेल्या, वाळलेल्या, वठलेल्या झाडांवर पुन्हा पालवी फुटत नाही असं म्हणतात…

आईशपथ सांगतो, मी या झाडांवर त्या दिवशी हिरवीगार नाजूक पालवी उमललेली पाहिली आहे… ! 

हसताना यांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या मला, समुद्रातल्या एका संथ पण फेसाळलेल्या लाटेसारख्या भासतात… ! 

… रक्षाबंधनाच्या दिवशी, मी ही संथ लाट झालो… त्यांच्या काळजावर पडलेली मी एक छोटीशी सुरकुतीच झालो…. ! 

“नारळी भात” आमच्या नशिबात नसला, तरी अनेक याचकांना, कामाला लावून त्यांच्याकडून, जेवणाचे डबे तयार करून घेऊन; रस्त्यावरील गोरगरिबांना आणि हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असणाऱ्या याचकांना आमच्या “अन्नपूर्णा प्रकल्पाच्या” माध्यमातून देत आहोत.

त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून जाणीव झाली, श्रावण मास आत्ता चालू झाला गड्या…. !

… पण, हरलेल्या या चेहऱ्यांकडे पाहून मग माझ्या तोंडून शब्द निघाले…

श्रावणमासी हर्ष नसू दे

नसू दे हिरवळ चोहीकडे

सरसर शिरवे, भिऊ नको तू

आपोआप ते ऊन पडे

*

झालासा तो वाटतो सूर्यास्त

सूर्याला रे, अंत नाही गडे

तूच सूर्य हो, तूच प्रकाश हो

हो तू रे गरुड राजा, जो आकाशाशीं भिडे

(आदरणीय बालकवींची माफी मागून)

श्रावणातल्या पौर्णिमेचा चंद्र मनामध्ये जागा ठेवत, मग “श्रीकृष्ण जयंती” आली.

जे भिक्षेकरी; भीक मागणे सोडून देऊन काम करायला लागले आहेत; त्यांचा नवीन जन्म झाला असंच मला वाटतं…. माझ्यासाठी मग हेच बाळकृष्ण ! 

माझेच काही याचक लोक; आम्ही भिक्षेकरी (भिकारी) हाय, अजूनही असं काही वेळा उघडपणे सांगतात… मला त्यावेळी वाईट वाटतं… ! 

पण ज्या भिक्षेकर्‍यांनी भीक मागणं सोडून दिलं आहे; असे माझे “बाळकृष्ण” मग हा “कंस” फोडतात… तोडतात… भेदतात…

कंसातल्या भिकारी या शब्दाचा वध करून, स्वतःच तयार केलेल्या “बंदीशाळेतून” जेव्हा “गावकरी” म्हणून जन्माला येतात, तोच माझ्यासाठी जयंती सोहळा असतो… ! 

आम्ही दहीहंडी सुद्धा मांडली….. नव्हे रोज मांडत आहोत…

…. आमची दहीहंडी तीनच थरांची… भिक्षेकरी – कष्टकरी – गावकरी

तीनच थर आहेत, त्यामुळे वरवर दिसायला सोपी दिसते पण फोडायला त्याहून अवघड… ! 

ही दहीहंडी फोडायला आपण सर्वजण आम्हाला प्रोत्साहन देत आहात, पाठीमागून टेकू देऊन वरवर ढकलत आहात, सर्वतोपरी मदत करत आहात…. आम्ही ऋणी आहोत आपले ! 

आता आपल्याकडून एक वचन हवे आहे…..

‘आपण सर्वांनी भिक मागणाऱ्या व्यक्तीला भीक देणे बंद करूया… स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्याला मदत करूया… ! ‘ 

भीक आणि मदत या दोन शब्दामध्ये खूप फरक आहे….. आपल्या काहीही देण्यामुळे समोरची व्यक्ती जर परावलंबी होत असेल तर ती भीक….. पण, आपल्या कोणत्याही देण्यामुळे समोरची व्यक्ती जर स्वावलंबी होत असेल तर ती मदत ! …. पुण्य कमावण्याच्या नादात भीक देऊन एखाद्याला खड्ड्यात ढकलण्यापेक्षा, स्वावलंबी होण्यासाठी मदतीचा हात पुढे करून त्याला खड्ड्यातून बाहेर काढूया…

तरच ही तीन थरांची, दहीहंडी खऱ्या अर्थाने फुटेल… !!! 

जेव्हा ही दहीहंडी कायमची फुटेल, त्यावेळी मी रस्त्यावर येऊन जल्लोष करेन… नाचेन… गाईन आणि म्हणेन…. गोविंदा आला रे…. आला…. ! 

– समाप्त –  

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments