सुश्री नीता कुलकर्णी
☆ “गौरीमायला निरोप…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆
सोन्या रुप्याच्या पावलांनी गौरी घरात आल्या. प्रत्यक्ष त्या महालक्ष्मींच आगमन होतं घरी… किती भाग्याची गोष्ट आहे ना… सगळं घर त्यांना फिरून दाखवलं. दोघींना नीट बसवलं. दागिने हार घातले. आरती, मंत्रपुष्पांजली झाली. आल्या दिवशी साधी भाजी भाकरी ती दाखवून झाली. दूध देऊन दोघींना आराम करायला सांगितलं.
दुसऱ्या दिवशीची लगबग सुरू झाली. पुरणावरणाचा स्वयंपाक, भाजी, कोशिंबीर, भात वरण, दोघींचा चेहरा तृप्त दिसत होता. गौरी प्रसन्न हसतमुख दिसत होत्या. घरात आनंद उत्साह भरला होता.
तो दिवस गडबडीतच गेला. रात्री निवांत दोघींसमोर बसले… मनातलं तिला ओळखता येतच…. तरी सांगितलं… तिच्याशी बोललं की मन शांत होत.
तीन दिवसांच्या पाहुण्या म्हणून आलेल्या गौरी….. निघाल्या की परत…. मुरडीचा कानवला, दहीभाताचा नैवेद्य दाखवला. अक्षता टाकल्या… जाता जाता निरोप देताना म्हटलं..
…. “ आई… क्षणभर जरा थांब ग.. तुझ्या लेकीबाळींचा निरोप सांगते तुला… गौरी माय तू यायच्या आधीच आम्हाला शहाणं केलं होतंस.. त्यामुळे तुझं सांगणं सगळ्यांनी ऐकलं बरं का… त्यामुळे आम्ही अन्न वाया नाही घालवलं.. मोजकच केलं.. खूप जणींनी मला हे सांगितलं. त्यांचा स्वयंपाक लवकर झाला. एका ताईंची सवाष्ण दरवर्षी अडीच वाजता जेवायची. यावर्षी त्यांनी तुला बारालाच नैवेद्य दाखवला. तुझी आरती करून साडेबाराला घरच्यांना जेवायला वाढलं. खूप आनंदानी ताईंनी मला हे सांगितलं.
लेकी सुनाच घरच्या लक्ष्मी आहेत ते सर्वांना फार पटलं बघ… किती जणींनी पहिल्यांदाच तुझ्यासमोर बसून श्रीसूक्त, देवी अथर्वशीर्ष, नवीन नवीन आरत्या म्हटल्या. तुझी गाणी गायली.. तू ऐकली असशीलच तरीपण सांगते ग आई…
…. बऱ्याच जणी शहाण्या आणि सुज्ञ झाल्या. तू सांगितलं तसंच वागल्या… घरचे पण आनंदित झाले.
हळूहळू जमेल तसा थोडा थोडा बदल करत आहेत.. सगळ्याजणी…. रूढी, परंपरा, रीती, रिवाज यांचा पगडा मनावर अजून खूप आहे. नव्हे.. त्याचे दडपण आहे. बदल करताना मनात अजून भीती मात्र आहे ग……
… काय होतं आई खरं सांगू का… बदल केला आणि काहीतरी विपरीत घडलं की वाटतं आपण बदल केला म्हणूनच हे असं झाल. लगेच मनात संशय येतो देवी किंवा देव आपल्यावर कोपला तर नसेल…
आमचं कसं आहे.. आमची प्रगती, भरभराट झाली, चांगल्या गोष्टी घडल्या की आम्हाला वाटतं ते आमचं कर्तृत्व….. माझ्यामुळेच ते झालं.. मी कष्ट केले म्हणून ते झालं.. अस आम्ही म्हणतो..
तेव्हा” ही देवाची कृपा “अस क्वचितच म्हणतो….. पण विपरीत काही झालं की आम्ही आपलं देवावर ढकलून देतो… हे अगदी खरखुर आमच्या मनातल आज तुला सांगते बरं का…
…. पण आता नाही…. आता आम्ही शहाणे होऊ… तू सांगितलं आहेस तसेच वागू…. तसं तुला आश्वासन देते…. भेटूया आता पुढच्या वर्षी….. पुनरागमनायच…. “
.. असं म्हणेपर्यंत डोळे भरून आले होते. घर शांत झालं होतं. त्यांचं येणं आनंदाचं, सुखाचं समाधानचं असतं. घर भारुन टाकणार असतं. इतर कशाचीच आठवण या तीन दिवसात येत नाही. त्याच्याभोवतीच मन फिरत असतं. हे दिवस झटकन जातात..
…. आता लक्षात येतं… त्यासाठीच गौरी घरी येतात.. मन तृप्त करायला.. भरपूर सुख आनंद द्यायला…
राहिलेले दिवस त्यांच्या आठवणी काढत जातात.. सुखदुःख, राग, लोभ, करत संसार चालूच राहतो……
हात जोडून तिला सांगितलं…… “ गौरीमाय तू अपार सुख देणारी आहेस. तुझा आशीर्वादाचा हात सदैव आमच्या पाठीवर असू दे. हीच तुझ्या चरणी आमची प्रार्थना. तू साथीला असलीस की आम्हाला बळ येतं ग माय… “
.. तुझ्याच लेकीबाळी…
☆
© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी
मो 9763631255
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈