सुश्री वर्षा बालगोपाल
☆ “विसर्जन…” — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆
आज बाप्पा तुझे विसर्जन
डोळ्यात पाणीच आले टचकन
१० दिवस कसे संपले ना झर्रर्रकन
अन तुझ्या शिकवणींचा विचार
डोळ्यांपुढे आला सर्रर्रकन….
खरंच बाप्पा तुझे येऊन जाणे परंपराच नाही
तर आयुष्याची किती मोठी शिकवण आहे ना…
बाप्पा, येणार तो जाणारच हाच तर पाठ तू देतोस ना?
जगामध्ये तुम्हीपण पाहुणेच आहात हेच नकळत सांगतोस ना?
दीड तीन पाच सहा सात… अनंतचतुर्दशी पर्यंत तुझे येथील वास्तव्य…
तसेच कोणाचे किती वास्तव्य आहे हे काळावर अवलंबून आहे
हेच खरमरीत सत्य तुला दाखवायचे आहे का रे?
गेल्यानंतरही आठवण रूपे मागे उरावे
त्यासाठीच सगळ्यांच्या संकटात धावून जातोस ना?
लोकांचे दुःख हरण करून त्यांना सुख देतोस ना?
ज्यांना कोणी नाही त्यांचा आधार होतोस ना?
अजून कितीतरी आदर्श तू जनमानसांपुढे ठेवतोस ना?
आणि बाप्पा जाताना तुला हसत हसत नाचत निरोप देतात ना?
मग विसर्जनचा खरा अर्थ आपला आत्माही सगळी विधायक कार्यें करून अनंतात समर्पित करावा असेच सुचवायचे आहे का?
– – हसत यावे, हसतच जावे, कीर्ती रूपाने मागे उरावे – एवढे भरदार कार्य करावे – सगळ्यांनी पुन्हा बोलवावे
बाप्पा या शिकवणींचा विसर नको पडू देऊ
एवढाच साधा भाव तुला अर्पण
पुनरागमनायच म्हणत करीतो तुझे विसर्जन…
बाप्पा मोरया रे
© सुश्री वर्षा बालगोपाल
मो 9923400506
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈