सौ राधिका -माजगावकर- पंडित
☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-३ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆
आमची आई.. .
आईने केला कोंड्याचा मांडा. माझी आई सौ. इंदिरा द. माजगावकर, दुसरी श्यामची आई होती. इतके दिवस नाही पण आता संसारात पडल्यावर जाणवतय, आईने कसा संसार केला असेल ? घरात आई नाना, आम्ही चौघी बहिणी, एक भाऊ, माझे काका (अण्णा), आत्या (आक्का) इतकी माणसे होती. पण मिळवणारे एकटे नानाच होते. त्यातून शिक्षकांना अगदी अपुरा पगार, पण आईने कोंड्याचा मांडा करून संसार सजवला.
45 ते 50 चा तो काळ, रेशनचे दिवस होते ते! धान्य आणून स्वच्छ करून निवडून रेशनला लाईनीत उन्हातान्हांत उभं राहून जड ओझं घरी आणायचं, घामाघूम व्हायची बिचारी! शिवाय आम्हा मुलांचं सगळ्यांचं आवरून हे सगळं आई एकटी करायची. आई माहेरी धाकटी होती. शेंडेफळ म्हणून लाडाकोडात वाढलेली आई सासरी मोठी सून म्हणून आली, हे मोठेपणाच शिवधनुष्य वेलतांना तिची खूपच दमछाक झाली.
आईचं लग्न अगदी मजेशीर झालं, माझे मामा (दादामामा )आणि माझे वडील नाना दोघे मित्र होते. एकदा नाना अचानक दादा मामांना भेटायला म्हणून आईच्या घरी गेले. बाहेर ओसरीवर माझ्या आईचा सागर गोट्यांचा डाव रंगात आला होता, नाना म्हणाले, “अहो यमुताई (आईचं माहेरचं नाव) दत्तोपंत आहेत का घरात? हे कोण टिकोजी आले मध्येच. ‘ असं पुटपुटत सागर गोट्याचा रंगलेला डाव सोडून आईने गाल फुगवले आणि परकराचा घोळ सावरत दादा मामांना बोलवायला ती आत पळाली. तिला काय माहित या टिकोजीरावांशीच आपली लग्न गाठ बांधली जाणार आहे म्हणून. लग्नानंतर आपल्या मित्राला, म्हणजे मोठ्या मामांना, हा किस्सा आमच्या वडिलांनी आईकडे मिस्कीलपणे बघत रंगवून सांगितला होता. मग काय मामांच्या चेष्टेला उधाणच आलं,
आम्ही मोठे झाल्यानंतर ही गंमत आमच्यापर्यंत मामांनी पोहोचवली होती. तर अशी ही आईनानांची पहिली भेट. नंतर संसाराची निरगाठ पक्की झाली, आणि त्यांचे शुभमंगल झाले. नाशिकच्या जोशांची कनिष्ठ कन्या मोठी सून म्हणून माजगावकरांच्या घरांत आली. कर्तव्याची, कष्टाची जोड देऊन तिने नानांचा संसार फुलवला. आता ति. आई नाना दोघेही नाहीत पण आठवणींची ही शिदोरी उलगडतांना मन बालपणात जात, आणि त्यांच्या आठवणीने व्याकुळ होत… व्याकुळ होतं..
मातृ देवो भव पितृ देवो भव .
– क्रमशः भाग तिसरा
© सौ राधिका -माजगावकर- पंडित
पुणे – 51
मो. 8451027554
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈