सुश्री शीला पतकी
मनमंजुषेतून
☆ आदर्श… ☆ सुश्री शीला पतकी ☆
संस्थेत कामाला जाण्यासाठी मी घरातून निघाले. साधारणपणे साडेबारा एक ची वेळ होती. मी गेटच्या बाहेर आले तर आमचे सर भेटले. मी म्हणाले, “सर कुणीकडे चाललाआहात?… “
ते म्हणाले, “शनी देवळाकडे… “
मी म्हणलं, “चला मी सोडते तुम्हाला… ” आणि मग रिक्षा केली. माझ्या शेजारी बसलेले माझे शिक्षक हे माझे पूर्वीचे मुख्याध्यापक, ज्यांच्या नावाने मी तो ट्रस्ट चालवते ते श्री तडवळकर सर होते.
मग रिक्षात बसून मी संस्थेत झालेल्या ऍडमिशन्स.. असलेले शिक्षक.. इंग्रजी माध्यमाचे प्रवेश बंद झालेले तुडुंब भरलेले वर्ग… याबद्दल मी सरांना माहिती देत होते. मी विस्तृत पणे काय योजना केली आहे ते विचारत होते हे… सर्व बोलणे समोरचा रिक्षावाला मुलगा लक्षपूर्वक ऐकत होता.
सरांना मी दत्त चौकात सोडलं आणि मी संस्थेत येण्यासाठी निघाले. त्यावेळेला रिक्षावाल्या पोराने विचारलं, “बाई तुम्ही शाळेत शिकवता का?.. “
मी म्हणाले, “हो. मी शिक्षिका आहे…. ” मी त्याला विचारलं “तू किती शिकला आहेस?. “
तो म्हणाला, “मी बारावी पास आहे. ” तो मुस्लिम समाजाचा होता. तो म्हणाला, “आमच्याकडे जास्त शिकत नाहीत, लगेच कामधंद्याला लावतात त्यामुळे पुढे इच्छा असून मी शिकू शकलो नाही. कारण घरात माणसं खूप आहेत, प्रत्येकाला कमवावंच लागतं. “
मग मी नापास मुलांवर करीत असलेल्या कामाची त्याला माहिती दिली. त्याला त्यामध्ये खूपच इंटरेस्ट आहे असे मला लक्षात आले. संस्थेजवळ रिक्षा आल्यावर त्याला मी पैसे दिले आणि त्याला म्हणलं “तुला शाळा पाहावयाची आहे का?”
तो म्हणाला, “हो मला खूप आवडेल…. ” मग मी त्याला संस्थेत घेऊन आले. प्रत्येक वर्गात त्याला फिरवलं. त्याची थोडी माहिती मुलांना दिली आणि मुलांना म्हणाले “बघा त्याची इच्छा असून त्याला शिकता येत नाही. तुम्ही नापास झालात तरी तुम्हाला पालकाने पुन्हा शिकण्याची संधी दिली आहे त्या संधीचं सोनं करा. “
मग तोही मुलांना म्हणाला… “अरे खूप चांगले चांगले शिक्षक तुम्हाला मिळालेले आहेत. आणि आई बाबा सुद्धाछान आहेत.. शिकल्यावर तुम्हाला चांगले काम मिळेल आणि तुमचे आयुष्य सुधारेल…. ” त्याच्या परीने तो दोन वाक्य बोलून गेला. चारही वर्गातून आल्यानंतर मी त्याला दारापर्यंत सोडायला गेले. काही झालं तरी तो तरुण पोरगा होता. त्याच्या मनामध्ये अशा आस्था निर्माण झाल्याच पाहिजेत.
त्याने मला मध्येच प्रश्नही विचारला “तुम्हाला याचा पगार मिळतो का?”
मी म्हणाले, “नाही, एक रुपया सुद्धा घेत नाही. ” त्याला त्याचे खूप आश्चर्य वाटले होते. दारापर्यंत आल्यावर तो मुलगा मागे वळला आणि झटकन माझे दोन्ही हात हातात घेतले, थोडासा झुकला आणि म्हणाला “आप महान पुरुष हो “… हे कुठेतरी बहुदा त्याने वाचलेले किंवा ऐकलेलं वाक्य असावं.
मला खूप हसायला आलं. तो प्रचंड भारावलेला होता. मी म्हणलं “नाही नाही, ‘महान स्त्री हू’ असं म्हण पाहिजे तर, पुरुष नको रे. “
त्यावर तो हसला “… वही वही… आम्हाला कुठलं एवढं चांगलं बोलता येते मॅडम, तुम्ही मला एवढ्या प्रेमाने शाळा दाखवली, लय छान वाटलं. लई मोठं काम करता हो तुम्ही, खरच मॅडम, तुम्ही महान आहात!… “
मी म्हणलं, “नाही, अरे प्रत्येकाने समाजासाठी असं थोडं काम करायलाच पाहिजे. अगदी तू तुझ्या रिक्षात सुद्धा एखादा गरजू आजारी म्हातारा माणूस फुकट नेऊन सोडलास किंवा अडवाअडवी न करता सोडलास तरीसुद्धा ते एक मोठं काम आहे हे लक्षात ठेव…. !”
त्याने पुन्हा एकदा माझ्यासमोर कमरेपासून मान झुकवली आणि हसत हसत तो रिक्षा घेऊन निघून गेला…….. !
मला वाटतं आपल्या तरुण मुलांना अशा कामांची ओळख करून देणे गरजेचे आहे, अशाने त्यांच्यामध्ये आपण असं काम करावं अशी भावना निर्माण होईल. त्यांच्यासमोर जो आदर्श असेल तो त्यांना नक्की भारावून टाकतो. शाहरुख खान, सलमान खान हे आज त्यांचे आदर्श झालेत, तेही कदाचित खूप चांगलं काम करत असतील, पण त्यापेक्षा ते जे पात्र साकारतात त्याच्यावर त्यांचे प्रेम असते, त्या पात्राच्या आदर्श भूमिकेवर नसते. आता तरुण मुलांचे हिरो बदलण्याची गरज आहे त्यासाठी त्यांना चांगले काही दाखवणे आणि ऐकवणे गरजेचे आहे असे मला वाटते तुम्हाला ही असेच वाटते ना?…. मग आपण एक छोटासा आदर्श त्यांच्यासमोर उभा करायला काय हरकत आहे…. !
© सुश्री शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈