श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ अभिजात मराठी भाषा ☆ श्री सुनील देशपांडे

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणे ! 

म्हणजे नक्की काय झालं मला काहीच समजलं नाही.

उद्या जर कोणी मला म्हटलं की कोहिनूरला हिऱ्याचा दर्जा मिळाला तर? 

मराठी भाषा अभिजात आहे की नाही याबाबत संशय होता का ? 

ती अभिजात आहे की नाही हे कोणी ठरवलं ? सरकारने? 

सरकार केव्हापासून अस्तित्वात आलं…… पंचाहत्तर वर्षांपूर्वी.

मराठी भाषा साधारण अडीच हजार वर्षांपूर्वीची.

अडीच हजार वर्षांपूर्वीच्या भाषेला अभिजाततेचा दर्जा देणा-या सरकारचा दर्जा काय? 

तो आमच्या अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या भाषेपेक्षा मोठा आहे का? 

ज्ञानदेवांनी अमृताचा दर्जा दिल्यानंतर या भाषेला आणखी काही मिळावं अशी कशाला अपेक्षा असावी?

कशासाठी आम्ही हा दर्जा मागण्यासाठी रदबदली करत होतो ?

कुसुमाग्रज एकदा म्हणाले होते मराठी भाषा म्हणजे राजभाषेचा सोनेरी मुकुट डोक्यावर चढवून अंगावर लक्तरे गुंडाळून मंत्रालयाच्या दारात कटोरा घेऊन उभी आहे असे वाटते.

मराठी भाषा अभिजातच आहे परंतु तिचं अभिजातत्त्व टिकवण्यासाठी कोणी पुढे येत आहे का? 

संस्कृत भाषेला यापूर्वी अभिजात भाषेचा दर्जा मिळाला होता म्हणे! पण ती भाषा आता उरली आहे का? 

अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर ती लोप पावली तरी आम्हाला तिच्याशी घेणं देणं नाही.

आम्हाला फक्त तिला अभिजातत्त्व मिळाल्यानंतर केंद्राकडून जे काही तीन चारशे कोटी रुपये अनुदान मिळणार आहे तेवढ्यातच रस आहे का?

बरं निदान ते अनुदान मिळाल्यानंतर त्या अनुदानातून मराठी शाळा उभाराव्यात, किंवा सध्या चालू असलेल्या मराठी शाळा चिमणी पाखरांनी भरून जाऊन त्या चालू राहाव्यात यासाठी प्रयत्न होणार आहेत का?

अभिजात दर्जा मिळाल्यानंतर महाराष्ट्रामधील सगळ्या शाळात किमान दहावीपर्यंत मराठी शिकणे अनिवार्य होणार आहे काय? 

घराघरात, निदान किमान मराठी घरात, हो निदान मराठी घरात तरी मराठी म्हणजे फक्त मराठी बोलली जाणार आहे का? 

आमच्या मुलांना पहिलं अक्षर आम्ही ग शिकवणार की ए? 

लहानपणी अक्षर ओळखीसाठी जी वाचन प्रक्रिया होते, तेव्हा आमच्या मुलांना आम्ही मराठी पुस्तके आणून देणार का इंग्लिश? 

आम्ही मुलांना कॉन्व्हेंट मध्ये का घालतो, आम्ही मुलांना इंग्लिश मीडियम मधून का शिकवतो याचं समर्थन वेगवेगळ्या प्रकारे करणारी अनेक मराठी घरं आहेत. असतील‌. ती वाढत आहेत आणि वाढत राहतील.

एका हळूहळू लोप पावणाऱ्या आणि पुराणभाषा म्हणून भविष्यात मानली जाऊ शक‌णाऱ्या संस्कृत सदृश्य आणखी एका भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबाबत आपण अनंतोत्सव साजरा करूया.

हळूहळू एक एक मराठी शाळा बंद करूया.

घरामध्ये मराठी भाषेत बोलणं आपण विसरून जाऊया.

मित्र मंडळीं मध्ये सुद्धा आपण मराठी भाषेत बोलतो का? 

किमान समोर भेटलेला माणूस, अनोळखी माणूस, मराठी आहे हे माहीत असून सुद्धा त्याच्याशी मराठीमध्ये संभाषण करीत नाही.

अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मंत्रालयात आणखी एक सर्टिफिकेट फ्रेम मध्ये लागून कुठल्यातरी भिंतीवर अडकवलं गेलं असेल.

फोटो बिटो काढून होतील.

प्रसिद्ध होतील  आणि त्याचा उपयोग संपेल.

काही वर्षांनी ते तिथून निघून एखाद्या अडगळीच्या खोलीत पडणार नाही याची खात्री कोण देणार?

बघूया, ही घटना निदान श्रेय वादाच्या लढाईत तरी कुणाच्यातरी उपयोगी पडते का?

फक्त चार दिवस आपण सारे गाऊया

आनंदी आनंद गडे ssss.

© श्री सुनील देशपांडे.

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments