श्री सुनील शिरवाडकर
☆ नवरंग … ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆
सकाळी सकाळी मोबाईल उघडला. कुठल्या तरी ग्रुप वर एका प्रसिद्ध मंदिरातील देवीचा फोटो आला होता. देवीला सुंदर पिवळ्या धमक रंगाची.. सोनेरी काठाची साडी नेसवलेली होती. त्यावरुन मला समजलं..
‘आजचा रंग पिवळा’
नवरात्रीचे नऊ रंग.. जिकडे पहावं तिकडे आज पिवळा रंग दिसणार. मोबाईल बघुन झाला.. सहज खिडकीबाहेर नजर टाकली. एक आजीबाई छान शुचिर्भूत होऊन काठी टेकत देवीच्या दर्शनासाठी निघाल्या होत्या. नववारी पातळात.. हो पिवळंच होतं ते. त्या आजींनी पण आता हा बदल स्विकारला होता. आज अगदी दुपट्या मधलं तान्हं बाळ देखील आज पिवळ्या झबल्यात दिसेल.
कुठल्या तरी वर्तमानपत्राने आवाहन केले.. आणि ही प्रथा सुरु झाली. हो.. प्रथाच. कोणी काहीही म्हटले.. कितीही विरोध केला.. टिका केली तरीही ही प्रथा आता नवरात्रीची परंपरा म्हणूनच ओळखली जाणार आहे. सेलीब्रेटींपासुन तर अगदी घरकाम करणाऱ्या स्रियांपर्यंत हे त्या त्या रंगांचं आकर्षण पसरलं आहे. परवाचीच गोष्ट.. परवाचा रंग निळा होता. एक अगदी गरीब.. झोपडीत रहाणारे.. हातावरील काम करणारं कुटुंब देवीच्या दर्शनासाठी आलं होतं. नवर्याने असाच चुरगळलेला, रंग उडालेला निळा टी शर्ट घातला होता. त्याच्या बायकोकडे पुर्ण निळी साडी नसावी. कारण प्राधान्य प्लेन.. गडद निळ्या रंगालाच असतं. तर त्याच्या बायकोने मग अशीच एक साडी निवडली.. त्यात अंतरा अंतरावर निळी फुले होती. त्यांच्या लहानग्याच्या अंगावर पण असाच निळसर आकाशी शर्ट होता.
सुरुवातीला फक्त स्त्रियांसाठी हे आवाहन केले गेले. त्यांनी त्या त्या रंगांच्या साड्या परिधान करून फोटो पाठवावे. कधी कोणाकडे त्या रंगाची साडी नसायची. मग ती त्या रंगाचा सलवार कमीज घालुन फोटो पाठवु लागली. हळुहळु पुरुष वर्ग पण यात सामील झाला. आज दिसेलच.. पिवळ्या रंगाच्या विविध छटांचे शर्टस्.. शर्ट नसेल तर टी शर्ट.. कुर्ते.. झब्बे.
गणपती विसर्जन झाल्यानंतर आठवड्याने या ‘नवरात्रीचे नऊ रंग’ चे वेध लागतात. मोबाईलवल कोणत्या दिवशी कोणता रंग असणार त्यांचं कोष्टक येतं. कोणता रंग कुठल्या वारी असा काही नियम नाही.. पण नवरात्रीतल्या शुक्रवारी मात्र हिरवा रंग ठरलेला असतो. कपाटातील साड्यांच्या आढावा घेतला जातो. त्या त्या रंगांच्या साड्या बाहेर काढल्या जातात. वर्षभर त्यांना हवा.. उजेड ही लागलेला नसतो. मग कुठली साडी ड्रायक्लीनींगला द्यायची.. कुठली साडी फक्त इस्त्रीला द्यायची हे बघितलं जातं. ही लाल साडी.. मागच्या वर्षी नेसलेली.. खुपचं खराब झाली आहे. मग काय?मग तश्याच रंगाची.. पण थोड्या वेगळ्या शेडची साडी धुंडाळली जाते. आणि ती सापडते पण. चला.. या नवरात्रीत या साडीवर काम भागवुन घेऊ.. कुठे नवर्याला खर्चात पाडायचं.. असाही विचार केला जातो.
नवरात्रात सर्व रंगांचे.. सर्व प्रकारचे कपडे पाहायला मिळतील. पण अजुन त्या त्या रंगांच्या जीन्स काही अद्याप पहायला मिळाल्या नाही. तसंच पॅंटस्.. पायजामे.. किंवा धोतरही अजुन पर्यंत विविध रंगांमध्ये फारसे बघायला मिळत नाही.
सोशल मीडियावर या ‘आजचा रंग.. ‘ वर टीका करणारेही बरेच जण आहेत. ही आपली प्रथाच नाही.. हा मार्केटिंगचा फंडा आहे वगैरे वगैरे. पण तरीही कोणीही त्याकडे फारसं लक्ष देत नाही. कारण मुळातच आपल्याला.. म्हणजे भारतीयांना सण उत्सव साजरे करणं.. त्या निमित्ताने नटणं.. सजणं वगैरे गोष्टी आवडतात. आणि या कारणाने अनेक जण नवनवीन खरेदी करतात. अनेकांना रोजगार मिळतो. बाजारपेठेत पैसा फिरतो.
आणि त्याही पलीकडे पाहीले.. तर असं रोजचं वेगवेगळ्या रंगांचं वातावरण नजरेला किती सुखावतं. रोजचं तेच तेच रुटीन.. गर्दी यातुन काहीतरी वेगळं हवं असतंच ना आपल्याला. मग त्यासाठीच तर असतात हे..
नवरात्रीचे नऊ रंग.
© श्री सुनील शिरवाडकर
मो.९४२३९६८३०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈