डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ सर तुम्ही मेल्यावर… ☆ डॉ अभिजीत सोनवणे

“ती”… पूर्वी मागून खायची…

आता ” तिला ” एका मेडिकल कॉलेजमध्ये स्वच्छता कामगार म्हणून काम मिळवून दिले आहे.

तिच्या मुलाला “आपण” दत्तक घेतलं आहे, सर्व शैक्षणिक खर्च गेल्या चार वर्षांपासून “आपणच” करत आहात. (मी नाही… !)

कामावर जाताना आज बुधवारी सकाळी ती चुकुन भेटली.

पर्वती पासून सदाशिव पेठेपर्यंत ती चालत जायची, घरातलं सगळं आवरून जाताना कामाला उशीर व्हायचा, केवळ या कारणासाठी तिला काढायला नको, म्हणून “आपण” तिला नवीन सायकल सुद्धा घेऊन दिली आहे.

मला रस्त्यावर भिक्षेकर्‍यांमध्ये बसलेला बघून ती सायकल थांबवून घाई घाईने माझ्याजवळ आली, म्हणाली; ‘सर राकी बांदायची होती, पन कामावर खाडा झाला आसता… म्हनून मी रकशा बंदनाला यीवू शकले न्हायी… स्वारी सर… ! तिच्या नजरेत अजीजी होती.

मी म्हटलं हरकत नाही; भाऊ बहिणीच्या नात्याला औचित्य किंवा मुहूर्त लागत नाही…. आत्ता बांद राकी… !

‘मी आनलीच न्हायी की वो सर, मला काय म्हाईत तूमी आता भेटताल म्हनून… ‘ ती पुन्हा खजील झाली.

मी सुद्धा इकडे तिकडे पाहिलं… माझ्याकडे ड्रेसिंग चे सामान होतं, त्यातली चिकटपट्टी घेऊन तिला म्हटलं, ‘हि घे चिकटपट्टी आणि बांद मला “राकी”… ‘

‘या बया… म्हणत, तोंडाला ओढणी लावत, तीनं मला हसत हसत “राकी” बांदली… ‘

यानंतर मी खिसा चाचपला…. हातात येईल ती नोट तिला ओवाळणी म्हणून टाकली…. !

तीने ती नोट निरखून पाहिली…. कपाळाला लावली आणि परत माझ्या खिशात ठेवत म्हणाली, ‘सर मला ववाळणी नको, माज्या पोराला साळंचा डीरेस घ्या… ‘

‘म्हणजे ? मी नाही समजलो… ?’

ती म्हणाली, ‘सर आवो तुमि साळेची फी भरली… वह्या पुस्तकं घ्येतली, समदं केलं पन त्याला साळेचा डीरेस घ्यायला इसरले तुमि… ‘

बोलू का नको ? सांगू का नको ? सांगितलं तर यांना राग येईल का ? या अविर्भावात चाचरत ती बोलली… !

मला माझी चूक लक्षात आली… शाळेची फी भरली… वह्या पुस्तकं घेतली… सॉक्स आणि बुट घेतले…. मग युनिफॉर्म कोण घेणार ? याचा युनिफॉर्म घ्यायचा कसा काय राहिला माझ्याकडून ? मी मनाशी विचार करत राहिलो…

‘मग आधी का नाही माझ्या लक्षात आणून दिलंस ?’ मी जरा वैतागून बोललो.

‘आवो सर आदीच ह्येवढं करता आमच्यासाटी, त्यात आजून किती तरास द्येयचा, आसं वाटलं म्हनुन न्हायी बोलले आदी… ‘

तिच्या या वाक्यानं मी खरं तर सुखावलो…

कुणाच्या करण्याची काही “किंमत” समजली तरच “मूल्य” समजते !

खर्च झाल्याचं दुःख नसतंच, हिशोब लागला पाहिजे… !

‘बया, कुटं हरवले तुमी… ?’ माझे खांदे हलवत तीने विचारलं…

मी भानावर आलो…

‘साळेचा डीरेस नसंल तर झेंडावंदलाला येऊ नगोस म्हणून त्याला साळेत सांगितलं हुतं सर… आनी म्हनून त्यो गेला पन न्हाय सर झेंडावंदलाला…. !’

‘साळेचा डीरेस नव्हता, म्हनुन त्याला वर्गाच्या भायर पन हुबं केलं सर… म्हनुन मंग आज तुमाला बोलले सर… ‘.. लहान मुलीने आपल्या वडिलांना काही तक्रार करावी, या स्वरात ती बोलत होती… !

युनीफॉर्म नव्हता म्हणून झेंडावंदन करू दिले नाही… ? देशभक्ती युनिफॉर्मवर ठरते का ??

या विषयावर खूप काही लिहायचं आहे, पण पुन्हा कधीतरी… !

माझ्या चेहऱ्यावरचे भाव कदाचित बदलले असावेत…. हे भाव बघून ती म्हणाली….

‘जावू द्या सर मी बगते… डीरेसचं काय तरी.. ‘

तिच्या या वाक्याने मी भानावर आलो…

मी म्हणालो, ‘ आता आणखी काही बगु नकोस…. घरी जाऊन पोराला घे आणि शाळेचा डीरेस घे…. कामावर आजचा खाडा पडला तर पडू दे… त्याचे पैशे मी देईन तुला… !’

ती चटकन उठली….

‘मला ववाळणी नगो…. पण माज्या पोराला शिकू द्या…. त्येला शाळेचा डीरेस घ्या… त्येला झेंडावंदनाला जाऊ द्या ‘ हे म्हणणाऱ्या अशिक्षित परंतु सुसंस्कारित माऊली मध्ये मला खरी “भारतमाता” दिसली.. !

मला ववाळणी नगो…. पण माज्या पोराला शिकू द्या…. त्येला शाळेचा डीरेस घ्या… या दोनच वाक्यात मला माझी “जीत” झाल्यासारखं वाटतं….

कारण लहान मुलांना दिवसाला साधारण एक हजार रुपये भीक मिळते, म्हणजे महिन्याभरात तीस हजार रुपये…

शिका रे, म्हणणाऱ्या मला मग कोणते पालक भीक घालतील… ?

तरीही यांच्याशी झालेल्या नात्यांच्या जीवावर मुलं दत्तक घेतो आहे आणि त्यांना शिकवतो आहे…

असो, तर आजच दुपारी शाळेचा “डीरेस” विकत घिवून ती आली आणि म्हणाली, ‘सर किती करताल ओ माज्यासाटी… मी लय त्रास देती तुमाला…. स्वारी सर…. !’

काय बोलू मी यावर…. ?

मी तिला म्हणालो, ‘माझ्या मूर्खपणामुळे 15 ऑगस्टच्या अगोदर त्याला युनिफॉर्म घ्यायचं मला सुचलं नाही…. आणि त्यामुळे तो झेंडावंदनाला हजर राहू शकला नाही… वर्गातून त्याला बाहेर राहावं लागलं….

त्याबद्दल आज मीच, तुझी आणि त्याची माफी मागतो गं माऊली, “स्वारी गं… !!!

‘बया… तुमि नगा स्वारी म्हणू सर…. ‘ असं म्हणत, डोळ्यातून पाणी काढत, तिनं माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं…

मी पोराकडे पाहिलं… नवीन कपड्याचे तीन जोड पाहून पोरगं “हरखून टूम्म” झालं होतं…

इस्त्री केलेल्या कपड्याचा एक जोड त्याने अंगावर घातला होता….

मी इंटरनॅशनल संस्थेत काम करताना असेच मस्त कडक इस्त्रीचे कपडे घालायचो… मला माझीच आठवण झाली….

आता मी नाही असे इस्त्री चे कपडे घालत, इच्छाच होत नाही… पण, मला त्याच्यामध्ये अभिजीत दिसला… !

पूर्वी तो आईबरोबर याचना करायचा… आज तो इस्त्रीचे कपडे घालून शाळेत जाईल…

मी त्याला सहज गमतीने विचारलं, , ‘बाळा शिकून पुढे मोठा होऊन काय करशील ?’

तो म्हणाला सर, ‘मला डॉक्टर व्हायचं आहे… ‘

मी म्हटलं, ‘बाळा, डॉक्टर होऊन काय करशील पण ?’

तो निरागसपणे हसला आणि म्हणाला, “सर तुम्ही मेल्यावर मी डॉक्टर होऊन, भिकाऱ्यांची सेवा करीन…. !!!”

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
1 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments