श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

? मनमंजुषेतून ?

☆ कृतज्ञता… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

मंडळी !!

आपली सनातन संस्कृती महान आहे याबद्दल आपल्या मनात शंका नसेलच. पण आपली संस्कृती महान आहे याचि प्रचिती कशी यावी?

गुढी पाडव्याला आपण नवीन वर्षाची सुरुवात करतो.

त्यानंतर पावसाळ्याच्या आधी वडाची पूजा. पर्यावरण समतोल राखण्यासाठी…..

त्यानंतर सरपटणाऱ्या प्राण्यांचे संगोपन व्हावे, रक्षण व्हावे म्हणून नागपूजा….

त्यानंतर नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा…

… इथे परत पर्यावरणाचे रक्षण हा भाव…

त्यानंतर गणपतीचे आगमन

त्यानंतर पितृ पंधरवडा….. !!

साधी कोणी आपल्याला क्षुल्लक मदत केली तर आपण त्याला किमान धन्यवाद देतो….

मग इथे तर आपले आईवडील आपल्याला तळहातावरील फोडासारखे जपतात, फुलझाडांसारखे वाढवतात, जगायला सक्षम करतात…. आज जे आईबापाच्या भूमिकेत आहेत, त्यांना कळेल की त्यांच्या आई बाबांनी त्यांच्यासाठी काय काय केले असेल….

आपल्याला चांगल्या कुळात जन्म मिळाला. ते कूळ चांगले ठेवण्यासाठी ( शुद्ध ) अनेकांनी आपल्याला मोह आणि माया बाजूला ठेवल्या असतील… अनेकांनी अनेक व्रते केली असतील, अनेक नियम पाळले असतील, तेव्हा कुठे ते शुद्ध राहिले असतील……

थोडा गांभीर्याने विचार करावा….

आज आपण कदाचित मुलाच्या भूमिकेत असू, तर उद्या आपण आई बाबांच्या भूमिकेत जाणार आहोत…..

आपला धर्म कर्म सिद्धांत मानणारा आहे. त्यामुळे मेल्यानंतर मनुष्याला दुसरा जन्म मिळतो यात शंका नाही. तसेच इथून पाठवलेले पैसे चलन बदलून अमेरिकेतील मिळू शकतात. इथून फोन केला तर परदेशातील आपल्या नातेवाईकांशी आपण बोलू शकतो, तर श्रध्देने केलेलं श्राद्ध आपल्या पित्रांपर्यंत पोचू शकते असा तर्क आपण करू शकतो….

मूळ मुद्दा असा आहे की आपल्या कृतज्ञ रहावेसे वाटते की नाही ?

आपल्या शास्त्रकारांनी याचा अभ्यास केला आणि विशिष्ट काळ निवडून, त्याला विशिष्ट पद्धती निर्माण केली.

एक उदा. पाहू. पंतप्रधान येणार असतील तर वेगळा शिष्टाचार असतो, पण अमेरिकेचे अध्यक्ष येणार असतील तर….. ?

श्राद्ध करून काय होते असे म्हणणारे लग्नात ज्या विधीला शास्त्रीय आधार नाही असे अनेक विधी खर्चाचा विचार न करताच करतात, तेव्हा नवल वाटते…

आपला धर्म सांगतो म्हणून आपल्याला योग्य वाटतील ती काही कर्मकांडे अगदी अट्टाहासाने करावी……… आधी करून पहावे आणि अनुभव घ्यावा.

महान तत्त्ववेत्ता रेने देकार्त म्हणतात त्याप्रमाणे “जुने कितीही सदोष वाटू लागले, तरी अगदी निर्दोष नवे हाती येइपर्यंत शहाण्याने हातच्या जुन्याचा त्याग करू नये. त्याची कडूगोड फळे आपण सध्या चाखत आहोत. सध्या आपल्याकडे प्रचलित असलेल्या शिक्षणपध्दतीचे ‘पुनरावलोकन’ करण्याची नितांत गरज आहे.

आपण सर्वजण जाणते आहोत. विवेकाने निर्णय करावा.

निव्वळ आपले पूर्वज नाही तर आजपर्यंत आपल्या, आपल्या देशाच्या जडणघडणीत ज्यांचा ज्यांचा हातभार लागला, त्या सर्वांच्या प्रति आपण कृतज्ञ असलेच पाहिजे.

उद्यापासून नवरात्र सुरू होत आहेत. आपल्याकडे कोणतेही शुभ कार्य करण्या आधी नांदी श्राद्ध करण्याची पद्धती आहे. (थोडक्यात thanks giving)

पूर्वजांचे स्मरण करून, स्मरण ठेवून आपण उद्यापासून शक्तीची उपासना केली तर ती अधिक फलदायी होऊ शकेल…. !

आपण प्रयत्न करू.

आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय !!!

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments