सुश्री विभावरी कुलकर्णी
☆ अभिनंदन — ‘अविस्मरणीय दिवस‘ ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
अभिनंदन ! अभिनंदन !!
पुणे मराठी ग्रंथालय या नामवंत ग्रंथालयातर्फे पुस्तक – परीक्षणासाठी नुकतीच एक स्पर्धा घेण्यात आली होती. त्या स्पर्धेत आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखिका सुश्री विभावरी कुलकर्णी यांना द्वितीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रसिद्ध लेखक श्री. विश्वास देशपांडे यांनी लिहिलेल्या “ अष्टदीप “ या पुस्तकाचे त्यांनी केलेले परीक्षण पुरस्कार प्राप्त ठरले. आपल्या सर्वांतर्फे विभावरी कुलकर्णी यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील साहित्यिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
या यशाबद्दल आपल्या भावना व्यक्त करणारा त्यांचा हा लेख – –
अविस्मरणीय दिवस…..
२ ऑक्टोबर २०२४ माझ्या आयुष्यातील दिवस!
साधारण जून महिन्यात एक मेसेज प्राप्त झाला. पुणे मराठी ग्रंथालय यांच्या वतीने एक स्पर्धा आयोजित केली आहे. प्रथम या कडे दुर्लक्ष केले. कारण असे बरेच मेसेज असतात. पण पुणे मराठी ग्रंथालय यांचा मेसेज असल्याने आणि तेथील माझे अनुभव व आठवणी फार महत्वाच्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी जागेची अडचण असायची त्यांना हे ग्रंथालय म्हणजे फार आपुलकी व जिव्हाळ्याचे वाटायचे. कारण पुण्यातील अगदी मध्यवर्ती ठिकाणी आहे. सायकलवर अगदी ५/७ मिनिटात पोहोचता यायचे. आणि या ग्रंथालयात अत्यंत शांत व अभ्यास पूरक वातावरण असणारी अभ्यासिका होती. मी व माझ्या सारख्या अनेक विद्यार्थ्यांनी आपले भवितव्य तेथे अभ्यास करून घडवले आहे. त्यामुळे या संस्थेची पोस्ट असल्याने थोडे लक्ष दिले. त्या नंतर तीच पोस्ट ३/४ लोकांच्या कडून आली. त्यांनी जी स्पर्धा आयोजित केली होती त्याचा विषय होता पुस्तक परीक्षण. तसे मी मला वाटले तसे म्हणजे पुस्तक वाचून जे जे विचार मनात येतात ते पूर्वी पासून माझ्या डायरीत लिहून ठेवत असे. पण ते म्हणजे पुस्तक परीक्षण नव्हे! मग काही पुस्तक परीक्षणे बघितली आणि यात मला रंग उगवतीचे ग्रुप व हा ग्रुप ज्यांच्या साहित्य वाचनासाठी तयार करण्यात आला ते आदरणीय श्री देशपांडे सर यांची फार मोलाची मदत झाली. आणि सरांच्या मार्गदर्शनामुळे पुस्तक परीक्षण कसे लिहावे हे समजले. मी पहिले पुस्तक परीक्षण लिहिले ते पुस्तक होते आकाशझुला अर्थात सर्वांचे आवडते व सरांचेच पुस्तक. आणि हे परीक्षण आपल्या गृप वर पाठवले. आणि आश्चर्य म्हणजे ते बऱ्याच जाणकार मंडळींना आवडले. आणि मग पुस्तक परीक्षण लिहिण्याचा छंदच लागला. आत्ता पर्यंत वाचता वाचता २०/२५ पुस्तक परीक्षणे लिहिली आहेत. हे सांगण्याचे कारण म्हणजे या सगळ्याचे फळ, सरांचे अनमोल मार्गदर्शन आणि आपल्या गृप वर जे कौतुक केले जाते त्यामुळे आत्मविश्वास वाढतो. या सगळ्या मुळे मी स्पर्धेत भाग घेतला आणि अष्टदीप – लेखक श्री. विश्वास देशपांडे. या पुस्तकाचे परीक्षण केले. आणि ८/१० दिवसा पूर्वी एक पत्र मिळाले. त्यात त्यांनी माझ्या परिक्षणासाठी द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे असा उल्लेख केला होता. या ग्रंथालयाच्या परीक्षकांनी नंबर देणे म्हणजे आपण काही लिहू शकतो याची पावतीच! आणि चक्क ती मला प्राप्त झाली.
२ ऑक्टोबर २०२४ या दिवशी हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. पुणे मराठी ग्रंथालय या संस्थेचा या दिवशी वर्धापनदिन असतो. काल ११३ वा वर्धापनदिन होता. आणि त्यात आम्हाला सहभागी होता आले. अतिशय मंगल व पवित्र वातावरणात हा सोहळा पार पडला. अगदी संस्थेच्या दरवाजातच प्रत्येकाचे पेढा देऊन स्वागत केले जात होते. आणि सगळी मंडळी लग्न कार्याला यावे तशी आली होती. फार सुंदर वातावरणात बक्षीस स्वीकारताना फार समाधान व आनंद अनुभवला. हा आनंद आपल्या माणसांच्या बरोबर वाटावा असे वाटले, म्हणून हा लिखाणाचा प्रपंच! आता आवरते घेते नाहीतर पुरस्कार मिळाला म्हणून लिही, असे व्हायला नको.
© सुश्री विभावरी कुलकर्णी
मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक.
सांगवी, पुणे
– ८०८७८१०१९७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈