श्री नितीन सुभाष चंदनशिवे
मनमंजुषेतून
☆ नकाशात केंब्रिज शोधताना… ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे ☆
पुण्यात असतानाची गोष्ट आहे. एकटाच बॅचलर म्हणून राहत होतो. भाजीपाला विकायचे बंद झाले होते. एका चांगल्या कंपनीत मी वॉचमन म्हणून पर्मनंट झालो होतो. आणि त्याच कंपनीत राहत होतो. राहण्याची आणि खाण्याची माझी सोय फुकटात झालेली असल्यामुळे माझं चांगलं चाललेलं होतं.
मला आठवतंय त्या दिवशी तेरा मे तारीख होती. त्या दिवशी गावाकडून वडिलांचा मला फोन आला आणि वडील म्हणाले, “ हे बघ, येत्या सतरा तारखेला म्हणजे अजून चार दिवसांनी तुझं लग्न ठरवलेलं आहे. तयार रहा. ” एवढं बोलून डायरेक्ट वडिलांनी फोन कट केला. पुढं बोलायची संधी जरी मिळाली असती तरी त्याचा काही उपयोग नव्हता. वडिलांचे ठरले की ठरले. त्यात बदल होत नसतो. हे मला माहीत होतं.
चार दिवसांनी आपलं लग्न. कुणासोबत, मुलगी कोण? कशी आहे? कुठं असते. ?असे असंख्य प्रश्न मनात. मी ड्युटी वर होतो. माझी चाललेली तडफड मी कुणालाही सांगू शकतं नव्हतो. कारण मी वॉचमन होतो. माझी केबिन गेटवर होती. त्या केबिन मध्ये मी एकटाच असायचो.
ड्युटी संपल्यावर रात्री आईला फोन केला. मग आईने सांगितले, “मुलगी पिंपरी मध्ये असते. आपल्या खूप जवळच्या नात्यातील आहेत. आम्ही सर्वांनी मुलगी बघितली आहे. तुझी आजी आणि तिचे आजोबा ही सख्खे बहिण भाऊ आहेत. मुलगी चांगली शिकलेली आहे. उद्या पिंपरीत जा. तिथं भाजी मंडई मध्ये त्यांचा भाजीपाल्याचा गाळा आहे. त्यांचं आडनाव रूपटक्के. सुखदेव रूपटक्के म्हणून विचारत जा सापडतील. ” मी होय म्हणून फोन बंद केला.
दुसऱ्या दिवशी शिफ्ट बदलून घेतली. आणि सकाळी दहा वाजता पिंपरी गाठली. पिंपरीची ती भली मोठी भाजी मंडई बघून जीवात कालवा कालव झाली. त्याच गर्दीत आता नाव विचारत विचारत चालू लागलो. भांबावून गेलो होतो. आयुष्याचा जोडीदार पहिल्यांदा बघणार होतो. उत्सुकता होतीच पण त्याहून जास्त भिती. विचारात दंग होऊन माझी नजर गर्दी चिरत होती. एवढ्यात चालता चालता एका पोरीला माझा धक्का लागला. तिच्या डोक्यावर कोथंबिरीचं पोतं होतं. तिच्या गालावर कोथंबिरीची पाने चिकटली होती. जसा माझा धक्का लागला तसं तिने रागाने माझ्याकडे बघितलं आणि म्हणली, “ ये बाबा बघून चाल की जरा नीट.. ? डोळ्यात काय माती गेली का.. ? ” अजून काहीतरी तोंडातल्या तोंडात बडबड करून ती गर्दीत नाहीशी झाली.
भाजीवाले रूपटक्के हे नाव विचारत विचारत मी योग्य जागी पोहचलो. तिथं आजोबा आणि आजी दोघेजण मांडी घालून बसलेले होते. ज्या पोरीला धक्का लागला होता तीच पोरगी तिथं बाजूला खाली वाकून मक्याची कणसे रचत होती. मी आजोबांना आवाज दिला. “ ओ आजोबा, मी कवठेमहांकाळचा. चंदनशिवे यांचा मुलगा. हिराबाईचा नातू. तुमच्या बहिणीचा नातू. ” आजोबा ताडकन उभे राहिले. खाली बसलेल्या आजीने डोक्यावरचा पदर नीट केला. आणि माझ्या हातात हात देत बाजूच्या कणसे रचणाऱ्या त्या पोरीला आजोबा म्हणाले, “ दीपा अगं तुझा नवरा आलाय की, कंबरेत वाकलेली ती एका सेकंदात ताठ झाली. आणि माझ्याकडे एकटक बघायला लागली. तिच्या अंगावर मळलेला पांढरा फुल्ल शर्ट. त्याच्या आत तिने पंजाबी ड्रेस घातलेला होता. डोक्याला रुमाल गुंडाळून उभी राहिलेली ती. माझी नजर काही नजरेला मिळाली नाही. ती काहीच बोलली नाही. पसंत नापसंत या असल्या भानगडींची ओळख दोघांनाही नव्हती. आमच्या दोघांची कुटुंबे त्यावेळी मध्यम वर्गातही मोडत नव्हती. हातावर पोट असणारी गरीब माणसं आम्ही.
सतरा मे या दिवशी आमचं लग्न थाटामाटात झालं. मी पिंपळे निलख मध्ये भाड्याने खोली घेतली. आमचा संसार सुरू झाला. नंतर एकमेकांना आम्ही ओळखू लागलो. मी कवी आहे हे तिला कळलं. माझ्या कविता तिला ऐकवू लागलो. हळूहळू माझी कविता पसरू लागली. नोकरीतून वेळ काढून संमेलनात जाऊ लागलो. पण बऱ्याचवेळा नोकरी महत्वाची मानून अनेक संमेलने रद्द करावी लागत होती. अगदी महाराष्ट्र राज्यातून सगळीकडून मागणी यायला सुरवात झाली. पण नोकरी मुळे जाता येत नव्हते. कवितेचा कार्यक्रम नोकरीमुळे रद्द केला की डोळ्यातून पाणी सांडत राहायचं. आणि त्या पाण्यातून कविता ही ओघळून जायच्या.
नोकरीत मन रमत नव्हतं. सगळा जीव कवितेत अडकला होता. आतल्या आत घुसमट वाढत चालली होती. रोज कुणाचा तरी फोन यायचाच. कार्यक्रमाचे आमंत्रण असायचेच. पण नकार द्यावा लागायचा. एके दिवशी हिला मनातली घुसमट बोलून दाखवली. आणि एका क्षणात तिने मला उत्तर दिलं. “ द्या सोडून नोकरी.. मन रमत नाही तिथं थांबायचं कशाला.. माझं घर चालेल एवढं जर तुमच्या कवितेने मला दिलं तरी मी आनंदी राहीन.. ” मी तिच्याकडे एकटक बघतच राहिलो. आणि त्याच दिवशी मी राजीनामा दिला. नोकरी सोडली. आता नाही तर कधीच नाही. असा विचार करून राजीनामा लिहिला. विनाकारण इथ राहून घरभाडे भरावे लागणार. कार्यक्रम करतच फिरायचे आहे तर पुण्यात राहण्यापेक्षा गावी जाऊ तिथच राहू. आई वडील ही सोबत असतील. हे ही तिनेच सुचवले. आणि ज्या दिवशी नोकरी सोडली त्याच दिवशी पुण्याचा निरोप घेतला. आणि गावी आलो.. पर्मनंट नोकरी सोडून गावी आल्यामुळे मला अनेकांची बोलणी ऐकावी लागली. कित्येक नातेवाईकांनी तर मला नावे ठेवताना कसलीही कसर केली नाही.
या गोष्टीला आता दहा वर्षे झाली. माझी कविता दूरवर पोहचली. कार्यक्रम सुरू आहेत. तिने ही गावी येऊन शांत न राहता किराणा दुकान सुरू केले आहे. टेलरिंग व्यवसाय ही वाढला आहे. नाही म्हणले तरी आम्ही मध्यम वर्गाच्या यादीच्या शेवटच्या पानावर का होईना पण पोहचलो आहोत. आणि दोन मुले आमच्या पदरात आहेत. ती आई आणि मी वडील आहे.
हा सगळा प्रवास आज डोळ्यांसमोर उभा राहण्याचे कारण म्हणजे, आजच इंग्लड मधल्या केंब्रिज वरून मला फोन आला आहे. पंचवीस डिसेंबर या दिवशी केंब्रिज मध्ये मी माझी कविता घेऊन उभा राहणार आहे. आणि आयोजकांनी आम्हाला जोडीने बोलावले आहे. दोघांचाही तिकीट खर्च ते करणार आहेत. म्हणजे आम्ही दोघेही केंब्रिज मध्ये जाणार आहोत. ती पहिल्यांदाच विमानात बसणार आहे.
तिला जेव्हा हे सांगितले तेव्हापासून ती, गुगलवर केंब्रिज हे नाव सर्च करत आहे. आणि मी आमचा सगळा प्रवास आठवत तिच्याकडे एकटक पाहत आहे. तिने त्या क्षणाला माझ्या मनाची घुसमट ओळखून जर निर्णय घेतला नसता तर आज या क्षणाला मी केंब्रिजचे स्वप्न न पाहता त्याच केबिन मध्ये वॉचमन म्हणून बसलेलो असतो.
एखादा कलावंत असला तरी तो कलंदर असतो. त्याच्यातला माणूस विसरून त्याच्या आतला कलावंत सांभाळणारा जोडीदार जर त्याला भेटला तरच तो कलेला न्याय देऊ शकतो. मला हे मिळालं. म्हणूनच माझ्या घराच्या उंबरठयावर माझी कविता माझं स्वागत करण्यासाठी नेहमी उभी असते.
आयुष्यात आलेल्या या जोडीदाराची कविता, कथा, कादंबरी कधीच लिहिता येणार नाही. पण माझ्या कलाकृतीची प्रस्तावना मात्र तिच्याच काळजातून येत राहणार आहे.
© श्री नितीन सुभाष चंदनशिवे (दंगलकार)
संपर्क – मु. पोस्ट. कवठेमहांकाळ, जि. सांगली.
मो 7020909521
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈