सौ राधिका -माजगावकर- पंडित
☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-५ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆
अन्नपूर्णेची परिक्षा-
माझी आई म्हणजे साक्षात अन्नपूर्णा होती. कुणाचेही आदरातिथ्य करून त्यांना खाऊ घालण्यात तिला खूप आनंद मिळायचा. “अतिथी देवो भव” हे तिचंही ब्रीदवाक्य होते आणि वाईटातून चांगले शोधणारे असे तिचे सकारात्मक विचार होते.
लहानपणी आपण किती बेजबाबदार असतो. आपल्या मुळे कोणाला त्रास होईल हे असलं काही डोक्यातच येत नसे… असाच एक माझ्या बेजबाबदार पणाचा गंमतीदार किस्सा आठवला….. मी शाळेत जाण्याच्या गडबडीत होते. श्रावणातला शनिवार होता. आमच्या समोरच श्री जोगेश्वरी मंदिर होते. मंदिरात एक गरीब वयोवृद्ध ब्राह्मण बसायचे. वयोमानानुसार खूप खूप थकले होते बिचारे. बायको नाही आणि मुलंबाळंही नाहीत, एकटा जीव सदाशिव होता. सौ. आई दररोज देवीच्या दर्शनाला जायची व तेथील गुरुजींना डाळ- तांदूळ दक्षिणा म्हणून द्यायची.
एकदा शाळेत जाताना सौ. आईने मला त्या ब्राह्मणाला “दूध, केळी घ्यायला आमच्या घरी बोलावले आहे” असा निरोप द्यायला सांगितले. धांदल, गडबड, धांदरटपणा आमच्या पाचवीला पुजलेला. मी धावत पळत जाऊन मंदिरातील गुरुजींना सांगितले, “गुरूजी, मी मानगावकरांची मुलगी.. ते समोर दिपमाळेजवळ घर आहे ना तिथे आम्ही रहातो. माझ्या आईने किनई तुम्हाला आज जेवायला बोलावलंय. ” गुरूजी एकदम खुशीने हसले आणि म्हणाले, “आई, माते जोगेश्वरी… तुझी लीला अगाध आहे. आज उपासमार न होता क्षुधा शांतीची सोय झाली. ” ते काय पुटपुटले ते मला काहीच कळले नाही. शाळा गाठायची होती ना घंटेचा टोल पडायच्या आत, नाहीतर खा छडी. दप्तर आवरत मी धावतच सुटले. जवळच आप्पा बळवंत चौकात शाळा होती म्हणून बरे.
इकडे घरी वेगळाच प्रसंग घडत होता. जेवायच्या आधी आई कपडे वाळत टाकत होती. नंतर जेवायला बसणार होती. इतक्यात काठी टेकत गुरुजी आले. आत येतानाच ते म्हणाले, “माई, जेवायला वेळ आहे का अजून? अवकाश असेल तर मी जरा वेळाने येतो. मला घाई नाही. सावकाश होऊ द्या तुमचा स्वयंपाक”.
आई क्षणभर गांगरलीच. पण हुशार होती माझी आई. मी केलेल्या उपद्व्यापाची तिला तात्काळ कल्पना आली. मी ‘दूध-केळी घ्यायला या’ असं सांगायच्या ऐवजी ‘जेवायला या, ‘ असं परस्पर आमंत्रणच दिलं आहे हे तिच्या लक्षात आलं होतं. तिने गुरुजींना विनंती केली, “गुरूजी, स्वयंपाकाला थोडा वेळ आहे तर….. ”
गुरूजी तात्काळ म्हणाले, “अहो माई, सावकाश होऊ द्या. मला काही घाई नाही. मी असं करतो.. उरलेला जप मंदिरात जाऊन पूर्ण करतो. धावपळ करू नका. मी एक तासाने येतो, नाहीतरी आज उपवासच आहे मला. १२ नंतरच सोडेन म्हणतो. ” तरी आईने त्यांना दूध-केळी दिलेच आणि बजावले.. “ साडेबाराला नक्की जेवायला या. जेवायला उशीर झाला तर तुम्हाला पित्ताचा त्रास होईल. ”
आणि गुरूजींची पाठ वळताच आईने पदर बांधला व तिच्यातली अन्नपूर्णा जागी झाली. आईच्या सुगरणपणाची ती सत्वपरीक्षाच होती. त्या वेळी गॅस पण नव्हते. आईने पटकन दोन स्टोव्ह पेटवले. बटाटे, वरण भाताचा कुकर लावला. कणीक भिजवली. तोपर्यंत दुसऱ्या स्टोव्ह वर शिरा करायला घेतला. कुरडई, पापड, भजी तळली. चटणी, लोणची होतीच. कोशिंबीर, भाजी, आमटी पण झाली. पाटपाणी, रांगोळी, पानापुढे विडा, दक्षिणा पण ओली करून ठेवली, आणि ती पोळ्या करायला बसली. हे सगळं उठत बसत भराभर चाललं होतं. कारण त्या वेळी उभ्याचा ओटा वगैरे नव्हता.
“बसा नं जेवायला. माझ्यामुळे तुम्हाला मात्र जेवायला उशीर झाला. ” बोलता बोलता पान वाढलं गेलं. गरमागरम वरणभात, लिंबू, तूप, भजी, कुरडई, पापड, केशरी शिरा, गरम मऊसूत पोळ्यांनी सजलेलं भरगच्च ताट बघून गुरूजी प्रसन्न हसले. भुकेले होते बिचारे. आग्रहाचं सुग्रास जेवण जेऊन तृप्तीची ढेकर देत ते म्हणाले, “खूप छान, अतिशय रूचकर, चवीष्ट होतं जेवण. खरं सांगू माई, आमची मंडळी गेल्यापासून इतकं चवदार भोजन चाखायलाच मिळालं नव्हतं हो मला. अन्नदात्री सुखी भव!!” तृप्त मनाने विडा, दक्षिणा घेवून ते सावकाश जीना उतरून गेले पण.
आमच्या घराजवळ दोन दगडी दिपमाळ भक्कमपणे उभ्या होत्या. अजूनही आहेत म्हणा. तिथे गुरुजी थबकले. मागे वळून त्यांनी हात जोडले आणि वास्तुला हात जोडून आमच्या घराकडे बघून पुन्हापुन्हा आशिर्वाद दिला त्यांनी. इकडे सौ. आईच्या चेहऱ्यावरून समाधान ओसंडून वाहत होता. तिनेही हात जोडले आणि म्हणाली “अतिथी देवो भव:”.
त्या दिवशी माझी शाळा लवकर सुटली. जिन्यातच मला माझी मोठी बहिण कु. लीला ने गाठले आणि मी केलेल्या गोंधळाचा पाढा वाचून ‘तुझ्यामुळे बघ आईला केवढा त्रास झाला, ‘ असं म्हणून भरपूर झापलं.
मी तर रडवेली झाले. आता दोनच उपाय… सौ. आईचे पाय धरायचे, नाहीतर कांगावा करून भोकाड पसरायचे. अखेर मी आईची क्षमा मागितली. माझ्या क्षमाशिल आईने मुसमुसणाऱ्या मला जवळ घेतलं आणि म्हणाली…. “अगं गुरूजींना तू जेवायला सांगितलेस ना ते बरंच झालं. आज अनायासे ब्राह्मण जेवणाचे पुण्य मिळाले. प्रत्येक दाण्यावर देवाने खाणाऱ्याचे नाव लिहीलेले असते. ज्याचा शेअर असतो तो येवून घेवून जातो. आज अवचित अतिथी देव आले आपल्याकडे आणि माझ्या घरादाराला, तुम्हा मुलांना तृप्त मनाने आशिर्वाद देवुन गेले….. “
तर, असा सकारात्मक विचारांचा धडा सौ. आईकडून आम्हाला मिळाला. अशी होती आमची आई. दुसरी श्यामची आईच जणूं.
– क्रमशः भाग पाचवा
© सौ राधिका -माजगावकर- पंडित
पुणे – 51
मो. 8451027554
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈