सुश्री सीमा ह. पाटील (मनप्रीत)
मनमंजुषेतून
☆ “गारवा…” ☆ सुश्री सीमा ह. पाटील (मनप्रीत) ☆
सुखावतोस तू जेव्हा श्रावणातील सर होऊन, मग तिही सावळते भिजून तृप्त झालेली वसुंधरा होऊन, आणि मग गीत गाते तुझ्या सोबतच्या क्षणासोबत आपल्या सहवासाचे…
आणि मग वेडावतात या वेली, लता, तरु अगदीच भान हरपून.. लवलवणारी गवताची पाती, मध्येच डोकं वर काढून चिडवणारी रानफुलं सगळं कसं हिरवं हिरवं! जणू तुझ्या माझ्या मनाचं चांदणं होऊन एक एक करीत समोर यावं तसं!अशाच मंतरलेल्या सायंकाळी एक दोन करीत प्राजक्त आपल्या फुलांचा वर्षाव माझ्या आठवणीतील साठवणीवर करून पुन्हा त्यांना नव्याने गंधीत करीत असतो. आणि पहाटेच्या सुखस्वप्नातून जागे होऊन पुन्हा साखरझोपेत त्या गोड आठवणींना लपेटून घेऊन पावसाळी गारव्याचा आस्वाद घेण्याचा मोह सुटता सुटत नाही.
सूर्याची एक दोन किरणे जेव्हा कृष्णधवल नभातून वाट काढीत जेव्हा गवाक्षातून आत येऊन तुझा निरोप देण्यासाठी कानात कुजबुजतात तेव्हा कुठे दिवसाची सुरुवात करावी वाटते. आणि उठून दरवाजा उघडावा तर काय, समोर प्राजक्ताने आपले सर्व सुमनभांडार रितं करून अंगणात बेभान करणारी अस्तित्वरुपी सुगंधी कुपीच बहाल केली आहे याची जाणीव होते आणि हाच दरवळ संपूर्ण तिचा दिवस अगदी सुगंधी होऊन श्वासात घर करून राहतो जाणींवातला उधाणलेला किनारा होऊन !
… आणि विश्वास पटवून देतो गारव्याच्या रुपाने कर्तव्यातील पुनर्जन्माचा…
© सीमा ह. पाटील (मनप्रीत)
कोल्हापूर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈