पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर
मनमंजुषेतून
☆ ‘‘नक्षत्रे अवतरली पोस्टात.. !’’ ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆
(पोस्टाची संगीतसेवा…)
९ ऑक्टोबर. जागतिक पोस्ट दिनानिमित्त एक सुखद आठवण आपल्या सर्वांबरोबर शेअर करताना खूप आनंद होत आहे…
३ सप्टेंबर २०१४, हा माझ्यासाठी फार सुंदर आणि ऐतिहासिक दिवस होता. ज्या भारतीय पोस्ट खात्याची, ‘जगातील सर्वोत्तम नेटवर्क’ अशी ख्याती आहे, अशा पोस्टाने माझ्या हातून एक मोठ्ठी ‘संगीत सेवा’ करण्याची मला संधी दिली!
भारतरत्न पं. रविशंकर आणि भारतरत्न पं भीमसेन जोशी तसंच सर्व पद्मविभूषण सन्मानप्राप्त – उ. अली अकबर खाँसाहेब, पं. मल्लिकार्जुन मन्सूर, पं. कुमार गंधर्व, पंडिता डी. के. पट्टमल, गंगुबाई हनगल आणि पद्मभूषण उ. विलायत खाँसाहेब अशा संगीतातील थोर विभूतींचे स्टॅम्प्स (पोस्टाची तिकिटे) आज माझ्या हस्ते प्रकाशित झाले आणि या सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मला मिळाली, हाच मी माझा मोठा सन्मान समजते.
स्वरसम्राज्ञी ‘भारतरत्न’ लतादीदींच्या पंच्याहत्तरीनिमित्त त्यांच्याच गाण्यांचा ‘तेरे सूर और मेरे गीत’ हा कार्यक्रम मी त्यांना मानवंदना म्हणून जेव्हा अर्पण करायचा ठरवला, त्या वेळी गंमत म्हणजे ‘जाने कैसे सपनों में खो गईं अखियाँ’ तसंच ‘कैसे दिन बीते’ व ‘हाये रे वो दिन’ ही अनुराधा चित्रपटातली तीन गाणी, माझी अत्यंत आवडती गाणी म्हणून सर्वांत प्रथम निवडली गेली… ज्याचे संगीतकार पं. रविशंकरजी होते. नृत्याचे बालपणीच धडे घेतलेल्या रवीजींच्या रक्तात जशी झुळझुळ झर्यासारखी लय वाहत होती, तशीच ती त्यांच्या शास्त्रीय सतार वादनात आणि स्वरबद्ध केलेल्या सुगम संगीतातही होती. त्यांनी अनेक सुंदर रागांचे मिश्रण करून राग सादर केले…. उदा. श्यामतिलक या रागातील ‘जाने कैसे सपनों में’ (श्यामकल्याण + तिलककामोद). शास्त्रीय संगीत काय किंवा सुगम संगीत काय, दोन्हींत त्यांनी अत्युच्च दर्जाचं काम केलंय. ‘कैसे दिन बीते’ या गाण्यातली सौंदर्यस्थळं तर, काश्मीरच्या सौंदर्य स्थळांपेक्षा कितीतरी सरस आहेत. उदा. ‘हायेऽऽऽ कैसे दिन बीते, कैसे बीती रतियाँ, पिया जाने ना’ यातील तीव्र आणि शुद्ध या दोन्ही मध्यमांचा (म॑धम॑, मगरेगऽसा) असा उपयोग रवीजींनी अफाट सुंदर केला आहे.
यानंतर मी पं. भीमसेनजींची एक छोटीशी आठवण सांगितली. १९८२ मध्ये मुंबई दूरदर्शनच्या ‘शब्दांच्या पलीकडले’ या कार्यक्रमात लतादीदींनी आणि माझे गुरू पद्मश्री पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी माझ्याकडून ‘तरुण आहे रात्र अजुनी’ ही गझल गाऊन घेतली होती. हे गाणं ऐकून पं. भीमसेनजींनी त्यांचे संवादिनीवादक, थोर कलावंत पं. अप्पासाहेब जळगावकर यांच्यामार्फत “अप्पा, काल टीव्हीवर बाळच्या कार्यक्रमात ही मुलगी फाऽऽरच सुंदर गायली!” असा मला निरोप पाठवून खूप मोठा आशीर्वाद दिला. वास्तविक शास्त्रीय संगीतात अत्युच्च स्थानावर असूनही, पंडितजींनी माझ्यासारख्या नवोदित गायिकेचं कौतुक केलं. असं कौतुक कोणत्याही कलावंताला कारकीर्दीच्या सुरुवातीला उंच भरारीचं बळ देतं!
अशीच एक सुंदर आठवण उस्ताद अली अकबर खाँसाहेबांची, १९८५ सालची! पंडित रविशंकर आणि उस्ताद अली अकबर खाँसाहेब यांनी संपूर्ण विश्वभर हिंदुस्तानी संगीताचा प्रचार आणि प्रसार केला. यात त्यांचा फार मोठा मोलाचा, सिंहाचा वाटा आहे. मी उस्ताद अली अकबर खाँसाहेबांच्या सॅनफ्रान्सिस्कोमधील अकॅडमीला भेट द्यायला गेल्यावेळी, त्यांनी मला कौतुकानं एक गोष्ट खिलवली…. काय बरं असेल ती चीज? आश्चर्याची गोष्ट म्हणजे… ती होती ‘चिकन जिलेबी’! अगदी वेगळा, पण खरंच खूप छान प्रकार त्यांनी मला प्रेमानं खिलवला..
पं. मल्लिकार्जुनजींची ही आठवण सांगताना मला खूप गंमत आली. मी आणि सुनील जोगळेकर १९८८ मध्ये, साखरपुड्याच्या बंधनात अडकलो आणि त्याच्या दुसर्याच दिवशी आम्ही एकत्र बाहेर जायचं ठरवलं. कुठं बरं गेलो असू? काही अंदाज? गेलो ते चक्क वानखेडे स्टेडियममध्ये सुरू असलेल्या, पंडित मल्लिकार्जुनजींच्या मैफिलीला! अवघ्या १५ ते २० मिनिटांत एक राग संपूर्णपणे, सक्षम उभा करण्याची त्यांची हातोटी! ती ‘मैफील’ आम्ही दोघांनीही अतिशय मनापासून, समरसून आनंद घेत ऐकली.
‘स्त्रियांनी गाणं’ हे ज्या काळात शिष्टसंमत नव्हतं, त्या काळात पंडिता डी. के. पट्टमल यांनी, बालपणापासून मैफिली गाजवल्या आणि स्त्रियांच्या गाण्याला उच्च स्थान व दर्जा मिळवून दिला. म्हणूनच मला वाटतं, आजच्या सर्व गायिकांनी त्यांच्याप्रती उतराई व्हायला हवं! मुख्यत्वे, त्यांनी गायलेली कृष्ण भजनं ऐकताना रसिकांचे डोळे नेहमी पाणवायचे, इतकी त्यात भक्ती होती, भाव होता, आवाजात सणसणीत ताकद आणि खर्ज होता, तेज होतं! हीच बाब, पंडिता गंगुबाई हनगल यांच्याविषयी खरी ठरते. नागपूरमध्ये झालेल्या ‘सप्तक’ या संस्थेच्या शास्त्रीय संगीताच्या संमेलनात मी ‘राग बिहाग’ गायले. माझ्यानंतर लगेचच गंगुबाईंचं गाणं होतं. मी स्टेजवरून उतरताना गंगुबाईंना नमस्कार केला. त्यांनी प्रेमभराने, माझ्या पाठीवरून हात फिरवत माझं कौतुक केलं व भरभरून आशीर्वाद दिले!
पं. कुमार गंधर्व यांनी वयाच्या आठव्या वर्षी अनेक दिग्गज गायकांची शैली आत्मसात करून ‘चमत्कार’ सादर केला. पं. कुमार गंधर्व यांची जशी ‘शास्त्रीय’ संगीताला देणगी आहे तशीच त्यांनी ‘लोकसंगीताचा’ उपयोग करून, संगीतबद्ध करून गायलेली निर्गुणी भजनं, ही देखील त्यांचीच ‘किमया’ आहे. तसंच नवनवीन राग, बंदिशी आणि रचना यांची त्यांनी केलेली निर्मिती ही भारतीय संगीताला मिळालेली अमूल्य ‘देणगी’ आहे. उदा. लगनगंधार, शिवभटियार इ…
उ. विलायत खाँसाहेबांचंही असंच भारतीय शास्त्रीय व सुगम संगीतातही मोठं योगदान आहे. ‘जलसाघर’सारख्या सुप्रसिद्ध बंगाली चित्रपटासाठी त्यांनी संगीत दिलं होतं, जे खूप गाजलं. सत्यजित रे यांच्यासारख्या दिग्गज दिग्दर्शकांबरोबर त्यांनी, सुगम संगीतातही अपूर्व असं काम केलं.
संगीत हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. ज्या मंडळींनी भारतीय संगीतविश्व समृद्ध केलं, तसंच तळागाळातल्या रसिकांपासून ते जगभरातील हिंदुस्थानी अभिजात संगीतावर प्रेम करणार्या रसिकांचं आयुष्यही समृद्ध केलं, अशा या सर्वश्रेष्ठ संगीततज्ज्ञांच्या नावे आज पोस्टाची तिकिटे ‘प्रकाशित’ झाली.
आज पोस्ट खात्याने अशा दिग्गजांचं स्मरण करून त्यांना मानवंदना दिली, ही संगीत क्षेत्रासाठी कितीतरी आनंदाची नि अभिमानाची गोष्ट आहे! त्यासाठी पोस्ट खात्याचं अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे! आपल्या भारतीय एकशे चाळीस कोटी जनतेला आपण शासकीय खात्यातील सर्वांत चांगलं खातं कोणतं? हा प्रश्न विचारला तर, एकमुखानं चांगलं बोललं जाईल, ते म्हणजे केवळ ‘पोस्टखात्या’बद्दलच!
मनीऑर्डर, instant money transfers, ATM, बचत खातं, पोस्टाचा बटवडा, इ. प्रचंड मोठी जबाबदारी पोस्टखात्यावर आहे. इतका जनतेचा आणि सरकारचाही पोस्टावर विश्वास आहे.
आजच्या इंटरनेट आणि एसएमएसच्या युगात, पोस्टानं आलेलं आणि हाती लिहिलेलं पत्र काय आनंद देऊन जातं, हे त्या पत्र घेणार्याला आणि वाचणाऱ्यालाच ठाऊक! गावोगावी तर अशिक्षितांसाठी पत्र वाचणारा आणि लिहूनही देणारा ‘पोस्टमन’ म्हणजे देवदूतच जणू!
आजही माझ्या ‘बालमोहन विद्यामंदिर’ या शाळेत मातृदिनाला आपल्या आईला, तिच्याबद्दलचं ऋण व्यक्त करताना विद्यार्थी अन्तर्देशीय पत्र / पोस्ट कार्ड लिहितो. ते पत्र वाचताना, प्रत्येक आईला किती अमाप आनंद होत असेल?
आज मला २७ वर्षांपूर्वीची आसामच्या, कोक्राझारमधील चाळीस हजार रसिकांसमोर, मी सादर केलेली शास्त्रीय संगीताची मैफिल आठवते. त्यात एक विशेष व्यक्ती होती आणि ती म्हणजे शिलाँगचे ‘पोस्टमास्टर जनरल’! त्यांची नी माझी कधीच भेट झाली नाही परंतु त्यानंतर, त्यांचं मला कौतुकाचं एक सुरेख पत्र आलं! त्यावर केवळ पत्ता होता…. पद्मजा फेणाणी, माहीम, मुंबई. आणि…… चक्क पत्र पोहोचलं! त्यावेळी “तू स्वतःला काय महात्मा गांधीजी समजतेस?” अशी घरच्यांनी गंमतीने माझी चेष्टा केली. त्या काळात गूगल मॅप नसतानाही पोस्टाची ही विश्वासार्हता आणि चोख काम…. याचं कौतुक करावं तेवढं थोडंच!
बालपणी आम्ही भावंडं एकत्र खेळताना, “मोठेपणी तू कोण होणार?” हा प्रश्न विचारला जाई. कुणी कंडक्टर, कुणी पोलीस, कुणी काही सांगे. पण स्टॅम्प्स गोळा करण्याचा छंद असलेला माझा एक चुलत भाऊ म्हणाला, “मी कोण होणार ठाऊक नाही, पण मी असं काम करीन की, माझ्या नावे पोस्टाचं तिकीट कधीतरी निघेल!” यावरून ‘स्टॅम्प’वर फोटो असण्याचं महत्त्व आणि प्रतिष्ठा कळते! या जन्मात, आम्ही राम आणि कृष्ण काही पाहिले नाहीत, परंतु संगीतातल्या अशा या सर्व दिग्गज मंडळींना मी पाहिलं, त्यांचं संगीत अभ्यासलं, त्यातल्या काहींचा आशीर्वादही लाभला, हे मी माझं भाग्यच समजते! या व्यक्ती स्टॅम्प्सच्या रूपाने आम्हाला व पुढच्या पिढ्यांना कायम स्फूर्ती देत राहतील, हे फार मोठं कार्य पोस्टाने केल्याबद्दल आणि माझ्या हस्ते या स्टॅम्प्सचे लोकार्पण करण्याचा मान मला दिल्याबद्दल, मी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.
© पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈